Moths and butterflies in Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Moths in Goa: मान्सूनमध्ये कदंबाच्या झाडावर रात्री फुलांचा रस पिणारे, एकच आठवडा जगणारे एटलास मोथसारखे 'गोव्यातील पतंग'

Moths and butterflies in Goa: मान्सूनच्या पावसात वृक्षवेलींनी भरभरून नटलेल्या परिसरात पतंगांचे जगणे सुफल होते. फुलपाखरांप्रमाणेच त्यांचा जन्म अंड्यातून होतो.

Sameer Panditrao

अ‍ॅड. सूरज मळीक

गोव्यातील जंगलसमृद्ध भागांत नानाविध फुलपाखरांबरोबर त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या पतंगांचे दर्शन आपल्याला होत असते. परंतु त्यातील पतंग कुठले आणि फुलपाखरू कुठले, हे सहसा आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे जी सुंदर दिसतात ती फुलपाखरे आणि ज्यांचे रंग फिके, राखाडी असतात ते पतंग असाच जणू काही समज झालेला आहे.

खरं तर फुलपाखरांपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रजाती पतंगांच्या आहेत व त्या वैविध्यपूर्ण आकार व रंगाने समृद्ध आहेत. दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पतंगांविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरातील देशात ‘राष्ट्रीय पतंग सप्ताह’ आयोजित केला जातो.

मान्सूनच्या पावसात वृक्षवेलींनी भरभरून नटलेल्या परिसरात पतंगांचे जगणे सुफल होते. फुलपाखरांप्रमाणेच त्यांचा जन्म अंड्यातून होतो. अंड्यातून सुरवंट बाहेर पडते, त्याच झाडाची पाने खाऊन मोठे होते, त्यानंतर रेशमी सुतामध्ये गुंडाळून कोशितामध्ये त्याचे रूपांतर होते व त्यामधून काही आठवड्याने पतंग स्वरूपात त्याचा जन्म हो. त्यामुळे फुलपाखराप्रमाणे त्यांनाही विशिष्ट जीवन वनस्पतीची गरज असते.

डोके, छाती व उदर असून त्यांनादेखील फुलपाखरांप्रमाणेच सहा पाय असतात. तरी त्यांच्यामध्ये बराच फरक दिसून येतो. फुलपाखरे दिवसा सक्रिय असतात, तर पतंग रात्रीचे सक्रिय होतात अशी सरळ सोप्या शब्दात त्यांची ओळख करून देणे चुकीचे ठरत नाही.

जंगलातील जीवमात्रांचा दिनक्रम दिवस व रात्र यानुसार जणू विभागलेला असतो. कित्येक पक्षी, प्राणी व कीटक रात्रीचे सक्रिय असल्यामुळे जंगलामध्ये रात्रीचे परागीकरण, शिकार, पक्ष्यांचे गायन सुरू असते. त्याचप्रमाणे पतंगांचे नातेही रात्री फुलणाऱ्या फुलांशी, रात्री सक्रिय असणाऱ्या बेडूक, सरडे, पक्षी या भक्षकांशी आहे. त्यामुळे सूर्य मावळल्यानंतरच त्यांचा जणू दिनक्रम सुरू होतो.

दिवसभर सूर्यकिरणांपासून ऊर्जा घेऊन उडणारी फुलपाखरे झोपी जातात. तेव्हा पतंग आपल्या वैविध्यपूर्ण रंगरूपातून निसर्गातील अचंबित करणाऱ्या आविष्काराचे दर्शन घडवतात.

जसजसा सूर्य पश्चिमेच्या दिशेने जायला लागतो, तसतसे संध्याकाळीच काही पतंग घरातील भिंतीवर येऊन कधी हजर होतात कळतच नाही. त्यामुळे पावसाळ्यात तर एकदाचे कसे त्यांना बाहेर पळवायचे यासाठी प्रयत्न चालू असतात. अर्धा दिवस काळोख आणि अर्धा दिवस उजेड असणे हा निसर्गाचा नियम आहे. पतंगांसाठी रात्रीचा अंधार महत्त्वाचा असतो. चंद्राचा सौम्य उजेड जणू त्यांना मार्गदर्शन करत असतो. परंतु आज रात्रीचेसुद्धा तारे दिसेनासे झालेले आहेत. मानवनिर्मित उजेड त्यांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांना त्यांच्या निसर्गातील कार्यापासून दूर नेत आहे.

पावसाळ्यात तर त्यांची संख्या वृद्धिंगत होते. पावसाळ्यात उमलून आलेली नवीन पाने त्यांच्या सुरवंटासाठी खाद्य असते. अनेकदा रात्रीचे घरात शिरलेले पतंग कुठे तरी कोपऱ्यात चिकटून काही दिवस तिथेच राहतात. गोव्यात ‘कॉमन आउल’ हा मोठ्या आकाराचा पतंग गोमंतकीयांच्या विशेष ओळखीचा.

कारण त्याची वेषभूषाच चक्क घुबडासारखी असते. त्याच्या मरून रंगाच्या पंखावर दोन पांढरे ठिपके असतात. दुरून पाहिल्यावर ते जणू घुबडाच्या डोळ्यांसारखेच दिसतात. ठिपक्यांमध्ये चोचीसारखा आकारसुद्धा असतो. त्यामुळे त्याच्याकडे पाहताना कुणी तरी मोठा प्राणी आपल्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहत असल्याचा भास होते.

भक्षकांपासून आपला बचाव करण्यासाठी केलेला हा त्याचा वेश आहे. दिवसा कधी कधी तो झाडाच्या खोडावर बसलेला आढळतो. आपल्या पंखांच्या रंगामुळे तो खोडाच्या रंगाशी इतका मिसळून जातो की फक्त त्याच्या पंखावरील पांढरे ठिपके डोळ्यांसारखे भयानक दिसतात.

मान्सूनमध्ये बहरलेल्या कदंबाच्या झाडावर रात्रीच्या वेळी फुलांवर तुटून पडलेल्या पंतंगांचे दर्शन हमखास घडते. एका एका फुलावर समूहाने बसून फुलातील रस पिण्यात ते मग्न झालेले असतात. तेव्हा रात्री सक्रिय असणाऱ्या सरड्यांबरोबर वटवाघूळ त्यांना खाण्यासाठी हजर होतात. वटवाघळांना कदंबाची फुले तर आवडतातच. त्यामुळे या पतंगाच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे वटवाघळांचे काम उल्लेखनीय आहे.

फुलपाखरे कितीही आवडीची असली तरी ‘मून मोथ’सारखा पंतगा नजरेस पडल्यावर आपल्याला जो आनंद होतो तो त्याच्या विलोभनीय रंग आणि आकारावरूनच. त्याला चंद्रावरून नाव दिलेले आहे. कारण त्याचा पंढरा शुभ्र रंग दुरूनच नजरेत भरणाऱ्या चंद्रासारखा असतो. त्याच्या लाल रंगाच्या स्पृशा त्याला अजून मोहक बनवितात.

त्याची शेपूटदेखील लांब आणि देखणी असते. कोशितामधून बाहेर आल्यावर तो काहीही खात नाही. त्यामुळे आपली ऊर्जा वाचवून ठेवण्यासाठी एकाच ठिकाणी शांत बसून मादी फुलपाखराला आकर्षित करीत असतो.

जगातील सर्वांत मोठा पतंग ‘एटलास मोथ’ तर फक्त एक आठवड्याइतकाच वेळ जगतो. या कालखंडात तो मादी फुलपाखराच्या शोधात निघतो आणि प्रजनन झाल्यावर तो मरून जातो. त्याचे पंख तर अद्भुतच. त्याचे चारही पंख मधून पारदर्शक असतात. म्हणजेच त्याच्यातून पंखाच्या मागे काय आहे ते पंखांमधून दिसते. त्याच्या पंखावरील दोन्ही टोकांना बघितले तर सापाशी जुळणारे चित्र दिसते. म्हणूनच त्याला सापासारखे डोके असलेला पतंग म्हणून ओळखले जाते.

‘गोल्डन एम्परर मोथ’ तर आपल्या पिवळ्या पंखावरील लाल ठिपक्यांनी फुलपाखराच्या लावण्यालाही मागे टाकतो. रात्री आपल्या घराच्या बाहेरील पांढऱ्या भिंतीवर उजेडात कित्येक लहान मोठ्या पतंगांचे आकर्षक रूप आपल्याला दिसू शकते.

पतंग हे रात्रीचे कार्यशील असले तरी काही पतंग असे आहेत जे दिवसा उडतात. तर काही फुलपाखरे अशीही आहेत जी संध्याकाळ झाल्यावर उडताना नजरेस येतात. ‘ब्ल्यू टायगर मोथ’ हा पतंग सकाळ ते संध्याकाळ उडताना दिसतो.

सर्वसाधारण पतंग आपले पंख सरळ रेषेत उघडे करून बसतात. आजूबाजूला हालचाल झालेली लक्षात येताच तो पानांवर न बसता पानाखाली जाऊन बसतो आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्पृशा टोकास फुलपाखरांसारख्या मुद्गलाकार किंवा अंकुशाकार नसून धाग्यासारख्या असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

India Justice Report: देशात न्याय वितरणात गोव्याची स्थिती बिकट, CM सावंत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; इंडिया जस्टिस रिपोर्टमधून खुलासा

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

Health Tips: वारंवार जुलाब लागणं असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

SCROLL FOR NEXT