राजेंद्र पां. केरकर
प्रत्येक गावात धेणलो उत्सव साजरा करण्याच्या परंपरेत आणि रीतीरिवाजात भिन्नता आढळत असते. वरगावातील माशेल येथील देवकीकृष्ण मंदिरात त्याला गोक्रीडानोत्सव म्हटले जाते. बालकृष्णाची फुलांनी सुंदर सजवलेली मूर्ती रथात स्थानापन्न करून मिरवणूक काढली जाते.
भारतातील अन्य प्रांतांप्रमाणे कृषिप्रधान गोव्यात गाईगुरांचे पालन केले जायचे. नवाश्म युगापासून गोव्यात शेती आणि गाईगुरांचे पालन सुरू झाले ते गोवा मुक्तीपर्यंत सुरू होते. शेतातली नांगरणी, पेरणी आणि मळणी आदी कष्टांची कामे हलकी करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना बैलांची जोडी सहाय्य करायची. घरातील दूध, ताक, दही, तुप, लोणी आदीची पूर्तता गाईमुळे व्हायची आणि त्यामुळे तिला गोमातेचे स्थान आदर आणि भक्तीने दिले जायचे.
शेतीला खत तसेच घरातल्या चुलीत इंधन म्हणून शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या उपयोगी पडायच्या. गाईगुरांच्या शेणाचा उपयोग घरातल्या भिंती आणि जमिनीसाठी केला जायचा. इथल्या रब्बी, सर्द शेतीसाठी बैल नांगरणी करायचे आणि त्यामुळे गाईगुरांचे पालन ही इथल्या प्रत्येक कुटुंबाची मुलभूत गरज होती. गाईगुरांनी भरलेला गोठा आणि धान्यांची समृद्धी हे त्याकाळच्या सधन कुटुंबाचे लक्षण होते.
५० वर्षांपूर्वी डोंगरातल्या माळरानावर, कपारीत राहणारी धनगर ही गाई-बकऱ्यांबरोबर प्रामुख्याने म्हशींचे पालन करणारी म्हणजे महिष पालक जमात होती. त्यांच्याकडे असणारी जानी गाय ही पवित्र मानली गेली होती. केपे, काणकोण, सांगे, धारबांदोडा इथल्या जंगलात राहणारी वेळीप-गावकर त्याचप्रमाणे अन्य ठिकाणच्या गावडे आणि ख्रिश्चन गावडे या जमातीही दुभत्या गाई-म्हशींचे पालन करायच्या. डोंगर उतारावरच्या कुमेरी शेतीद्वारे पाखड, कुळीथ, उडीद, नाचणी, वरी तसेच भोपळा, कारली, काकडी, वांगी, डोडकी, भेंडी यांची पैदासी करायची. गोव्यातले हे कष्टकरी जसे कुमेरी शेती करायचे तसेच नांगरणीद्वारे पावसाळी, वायंगणी त्याचप्रमाणे खाजन शेती करून आत्मनिर्भर होते.
त्यांच्या हाती पैसा खुळखुळत नसला, तरी दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक बाबींची पैदासी ते करायचे. त्यामुळेच धरित्री माता आणि मृण्मयी वारुळ सांतेर म्हणून त्यांनी पुजून सृजनशील मातीच्या अन्ननिर्मितीविषयी कृतज्ञता, आदर भाव व्यक्त करणे हा आपला धर्म मानला होता. त्यामुळे भाद्रपदात पार्वतीपुत्र गणपतीच्या मृण्मयी, नवरात्रात मातृशक्तीच्या मूर्तीचे, दसरा ते दिवाळीत संपन्न होणाऱ्या धिल्लो उत्सवात मौसमी फुलांनी अलंकृत मातीच्या गोळ्याचे पूजन करण्याला त्याने प्राधान्य दिले होते. आपल्याला दूध, दही, ताक, लोणी देणाऱ्या गाई आणि शेताची नांगरणी आणि भाताची मळणी करणाऱ्या बैलांची त्याचसाठी कार्तिक महिन्यातल्या बलीप्रतिपदेला पूजा करण्यात धन्यता मानली होती.
नरक चतुर्दशीला बांबूच्या कामट्यांच्या सांगाड्यात मौसमी गवत भरून तयार केलेल्या नरकासुराचे दहन केल्यानंतर मिणमिणत्या करंजेल तेलात कापसाच्या वातींनी भिजलेल्या पणत्या पेटवून घरोघरी साजरी होणारी दिवाळी, अंधारलेल्या रात्रीला प्रसन्न प्रकाशाची पर्वणी निर्माण करायची. त्यानंतर धन, संपत्तीच्या देवतेचे लक्ष्मी पूजन झाल्यावर येणारी बलिप्रतिपदा त्यासाठी दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी म्हणत त्याला कष्टकऱ्यांचा लोकोत्सवात परिवर्तित करायची. पौराणिक कथेनुसार...
वामनावतारात म्हणे श्री विष्णूने प्रजाहितदक्ष राजा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या महाबलीला पाताळात पाठवला आणि वर्षातून या प्रतिपदेला त्याला पृथ्वीलोकात येण्याची अनुमती दिली. शेतकरी आणि कष्टकरी जातीजमाती कल्याणकारी राजाच्या स्वागतासाठी सज्ज होतात. गोव्यात या दिवशी गोरवाचा पाडवा साजरा केला जातो आणि सकाळीच गाई-म्हशीना आंघोळ घालून, त्यांची गंध, कुंकूम, हळद अर्पण करून पूजन करताना, गळ्यात फुलांचे हार घालतात. काही ठिकाणी कौशीच्या सालीपासून रंगीबेरंगी गोंडे तयार करून, ते गुरांच्या गळ्यात घालण्याबरोबर फुगीच्या तांदळापासून केलेले घावणे किंवा भाकऱ्या बांधतात. हे बैल चरण्यासाठी माळरानावर गेल्यावर त्याच्या गळ्यातले धावणे किंवा भाकरी प्राप्त व्हावी म्हणून बैलाबरोबर कसरत करण्याचा प्रयत्न तरुणाई करते. गाई-गुरांना त्यादिवशी नवधान्यापासून तयार केलेला गोड नैवेद्य खास भक्षण करण्यास दिला जातो.
सकाळी शेणापासून गोठ्याची प्रतिकृती निर्माण करून, त्यात कारीटांची गुरेढोरे ठेवली जातात आणि तेथे गुराख्याची प्रतिमा तयार करून ठेवली जाते. त्यानंतर गंधपुष्प अर्पण करण्याबरोबर दीपप्रज्ज्वलन केले जाते. वेळिप- गावकरबहुल सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या गावांत दसऱ्यापासून दर रात्री कुमारिका आणि विवाहित महिलांच्यावतीने संपन्न होणाऱ्या धिल्ल्याच्या नृत्य, गायन लोकोत्सवाचा समारोप याच दिवशी होतो. दरदिवशी मौसमी फुलांनी सजवलेल्या मातीच्या गोळ्याचे विसर्जन पाणथळ्यावर केले जाते. फोंडा, तिसवाडी, डिचोली आणि सत्तरीतल्या आदिवासी बहुल गावांत धेणलो उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक लाकडाच्या चौकटीला तांबड्या, भगव्या पताक्यांनी किंवा रथाला गुढ्या, पताक्यांनी सुंदररित्या सजवून त्यात लाकडी बाळकृष्णाची मूर्ती प्रस्थापित केली जाते.
गावातील ठराविक देवाच्या मंदिराकडून सजवलेला हा धेणला काही ठिकाणी माथ्यावर घेऊन घरोघरी नेला जातो आणि पारंपरिक लोकगीताचे ढोल, तासो आणि कासाळ्याच्या वादनाच्या संगीतात उत्स्फूर्तरित्या गायन केले जाते. प्रत्येक गावात धेणलो उत्सव साजरा करण्याच्या परंपरेत आणि रीतीरिवाजात भिन्नता आढळत असते. वरगावातील माशेल येथील देवकीकृष्ण मंदिरात त्याला गोक्रीडानोत्सव म्हटले जाते आणि बालकृष्णाची फुलांनी सुंदर सजवलेली मूर्ती रथात स्थानापन्न करून मिरवणूक काढली जाते. तेथून जवळच असलेल्या घाडवसाच्या मंदिराकडून निघालेली धेणल्याची मिरवणूक वरगावात ठराविक जागी थांबते, त्यावेळी सुवासिनी गंधपुष्प अर्पण करून बालकृष्णाविषयी भक्तिभाव व्यक्त करतात.
पारंपरिक माधुर्यपूर्ण लोकसंगीतावर जाणारी ही मिरवणूक वैशिष्टयपूर्ण अशीच असते. तिसवाडीतला कुंभारजुवा गाव भातशेती, भाजीपाला यांची लागवड करणाऱ्या कष्टकऱ्यांचा आणि त्यासाठी त्यांच्या उत्साह, आनंदाला आलेले उधाण ढोल, तासो आणि कासाळेच्या जोशपूर्ण वादनातून पहायला मिळते. धेणलो, गोरवा पाडवो, बलिप्रतिपदा... याद्वारे या लोकोत्सवाला वेगळीच किनार लाभते, त्यातून गोमंतकीय माती आणि संस्कृतीच्या घमघमाटाची प्रचिती येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.