नीना नाईक
आजकाल नोकरी लावण्यासाठी पैसे मागायला लाज वाटत नाही, तेवढी लाज आपणच दिलेले पैसे परत मागताना वाटते. शेवटी नोट ती, किती तरी जणांकडून फिरून येते; कुणी, कधी, का, कशासाठी हे पोलिस सांगू शकत नाहीत. बिचारे गांधीजी कुठे कुठे पुरणार? त्यांच्या पुण्याईला लोकांनी ‘इथून तिथून मिथुन’ अशी करून टाकली आहे.
कायम सत्याची पाठराखण करणारे गांधीजी ज्या नोटेवर आहेत, ती नोटच असत्याला पाठीशी घालते. नोटेला वेग आणि ताकद आहे. ती वापरणारे ताकदवान सूत्रधार पडद्यामागे आहेत. ते नाचवत असलेल्या कठपुतळीची ‘पूजा’ चालू राहू दे. हे काही चांगले लक्षण नाही, तरी खोटे झिडकारणे आणि सत्य पुढे न आणणे, या उद्योगाची साखळी बेमालूमपणे सुरू आहे.
नऊ ग्रह या चंद्राभोवती फिरत आहेत. कधी अंधारातून बाहेर काढताना त्यांच्यासाठी चंद्राने भूमिका मांडली की ग्रह धन वापस करतील. म्हणून ग्रह प्रकाशात आले. मग ग्रह लुप्त होतील असे विधान नव्हते. चंद्र कलेकलेने पृथ्वी फिरवत आहे. आता कर्तृत्व मोठे होत चालचे आहे पण त्याच्या सावलीत उभ्या राहिलेल्या ग्रहांची दशा बदलणार. त्या राजा, राणीला इतिहासात बसवणार नि आपला इतिहास घडवून साम्राज्य चालवणार.
हे शुभवर्तमान खरे होईल, की नाही माहीत नाही. पण, त्यांना आता गमवायची भीती नाही. नोकरी आणि नोट यांचे भागाकार चालू आहेत. वजाबाकी झाली नाही. शब्द दिला की गांधीजींची घरवापसी होणार. प्रत्यक्षात कोटीकोटींची उड्डाणे करूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
मनाची शांती कशी जपणार? पैसे देणारे ठिय्या धरून फेर धरतात. पैसे घेणारा ‘नाच गं घुमा’ म्हणत नाचवत आहे. बहुरूपी पोतडीतून नवीन नवीन गोष्टी घेऊन येतात. घर आपले आहे, बसंती आपली, यंत्रणा आपली. मग, नार्को टेस्ट असो किंवा नरक की स्वर्ग हे जाहीर करणे न करणे, असो; हे मायबाप घरात कोण ठरवणार? ‘ख’ची बाराखडी खाणे, खाती, खडी.. सर्व एकच.
भांडी बाहेरून घासली तरी जास्त आतून घासावी लागतात कारण अन्न शिजवताना सर्व पूर्णत्वाला येण्यासाठी खूप ढवळावे लागते. जिन्नस खूप एकत्र यावे लागतात. गरम तेलात जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, मिरची, गरम मसाला, मीठ प्रमाणात असावे लागते.
शेवटी केलेली भाजी कशाबरोबर खाल्ली की ती रुचकर लागते हेही ठरवावे लागते. तडका नऊ पदार्थांचा झाला नि ही भाजी शिजली. पोटात गेली की पचवावी लागणार. नाही तर मळमळ बाहेर काढावी लागणार. असाहाय्य वेदना झाल्या की डॉक्टर लागणार.
पोट ते, घराला दरवाजा असतो तसा त्याला नसतो. मालमत्ता आली की आपण घराला बंद करताना कुलूप लावतो. मोठं कुलूप उघडायचे आहे पण छोटी किल्ली हे काम करते. काहीवेळा डुप्लिकेट चावी करावी लागते, हॉटेलमध्ये असते तशी. ती नेमकी चावी लागली की कोडे सुटते नि कुलूप उघडते. पोटाची स्थिती अवघड झाली, की उघडायला दरवाजा नसतो, डॉक्टर बोलवावा लागतो.
लक्ष्मी चंचल असते आज तुझ्याकडे उद्या कुणाकडे. कोडी कितीही मांडली तरी उत्तर द्यावे लागणार. कर्म आहे, भोगावेच लागणार. पत्रकारांना सर्व ठाऊक असते. उसने आव आणणारे पत्रकार भारी वाटतात. ते आपली सायकल घेऊन करिअर लावणार तर स्टँड काढला जातो.
त्यांचा नाईलाज. हे काळचक्र चालणार. गुप्तपणे राहून हालचाल करणार. मुखवट्यात गुंतून किती काळ राहणार? तो गाळून आणि गाडून टाकणे ही नीतिमत्ता. ती कधी बाहेर पडणार?
पैसा दिला नोकरीसाठी, तरी ‘इतका आला कुठून?’, असे विचारत ईडी मागे लागते. आता ती वेडी ज्यांनी घेतले त्यांच्या मागे लागत नाही, कशी? ‘हात दाखवून अवलक्षण’ या धर्तीवर ‘पैसे देऊन अवलक्षण’, अशी अवस्था झालेल्यांचे दु:ख ज्यांनी ते घेतले त्यांना नाही कळणार! असे म्हणतात, की प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, पापाचा घडा भरतो आणि तो भरला की जे व्हायचे ते होते. नियतीच्या पुस्तकात पापाची अजून किती पान शिल्लक आहेत हे तरी कळू दे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.