Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये शोषितांचे काय चुकले?

Pooja Naik: पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवणे हा स्वत:चा, स्वत:च्या शिक्षणाचा, स्वकर्तृत्वाचा अपमान आहे, हे जोवर आतपर्यंत जाणवत नाही, तोवर ‘कॅश फॉर जॉब’सारखी प्रकरणे होतच राहतील.
Cash For Job Scam
Cash For Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

शुभदा दीपक मराठे

नोकरी घोटाळा किंवा ‘कॅश फॉर जॉब’ एक महान षड्यंत्र आहे. या षड्यंत्रात प्रचंड प्रमाणात पैशांची उलाढाल झाली आणि त्याच्या जनक प्रामुख्याने एक महिला आहे. या कर्तबगार(?) महिलांत इतके धाडस येते तरी कुठून? ज्यांच्यांत समाज घडवण्याची सृजन शक्ती आहे, त्यांनी तो बिघडवण्याचे काम करणे, हे काही चांगले लक्षण नाही!

नोकरीचे आमीष देणाऱ्या महिलांची तर मला कीव येते. ‘पैशासाठी काहीही’ असेच तर नसेल ना? या घोटाळ्यातून महिला काही बोध घेणार आहेत किंवा नाहीत, हे मला माहीत नाही. पण प्रत्येक महिलेने मी नोकरी विकत घेणार नाही आणि विकत देणारही नाही, असा विचार केला तर किती बरे होईल! पण, या ‘जर तर’च्या गोष्टी आहेत. शेवटी एक प्रश्‍न अनुत्तरितच राहतो, यात भरडल्या गेलेल्या शोषितांचे काय?

‘गरजवंताला अक्कल नसते’ या उक्तीनुसार सरकारी नोकरीसाठी पैसे दिले जातात. लाच देणे हा गुन्हा आहे हे माहीत असूनही ते धाडस केले जाते.

उसने मागून, कर्ज काढून हे लाखो रुपये केवळ नोकरीच्या आशेने दिले जातात. याच पैशातून एखादा छोटा व्यवसाय सुरू करणे एवढे कठीण आहे का?

प्रारंभी छोटा व्यवसाय उभा केला तर आज ना उद्या त्यांचा फायदाच होईल आणि स्वतःचा व्यवसाय स्वतःचे कष्ट, कौशल्य यांचा वापर स्वत:साठी केल्याचा आनंदही त्याच्या व्यवसायाला उभारी देईल. कोणी म्हणेल, व्यवसाय चाललाच नाही तर? त्यामुळे हा धोका का पत्करावा? धोका कुठे नाही? जे पैसे आमीष म्हणून दिले जातात, त्यांचा कुठे पुरावा असतो?

या दिलेल्या पैशातून नोकरी मिळालीच तर नाही तर त्यातली फुटकी कवडीही परत मिळणार नाही. दिलेले पैसे परत मिळवण्याचा कुठलाच कायदेशीर मार्ग असणार नाही. कारण ‘पैसे देणे’ हाच गुन्हा आहे. लाच घेणाऱ्यापेक्षा, लाच देणारा जास्त गंभीर गुन्हेगार ठरतो. नोकरीही नाही, पैसेही गेले अशी अवस्था येते.

मग व्यवसाय करण्यात ते बुडाले तर काय वाईट आहे? उलट, व्यवसायात कष्ट करण्याची सवय ठेवली तर एक ना एक दिवस एक फायदाच होईल. झालेच नुकसान तर पूर्णपणे होणार नाही. कामात जसजसे कौशल्य वाढत जाईल, तसतशी व्यवसायाची भरभराटही होईल. नुकसान झाले, तरी मान खाली घालावी लागणार नाही. स्वत:चा व्यवसाय उभारायला काबाड कष्ट करावे लागतात.

पण, आजकाल कष्ट कोणाला हवेत? एकदाची नोकरी लागली की संपूर्ण आयुष्यभर मोकळे. ना जबाबदारी, ना खंत. ‘नोकरीशिवाय अन्य मार्गच नाही’, अशी युवापिढीची ही मनोवस्था निर्माण व्हायला आमची शिक्षणपद्धतीही काही अंशी जबाबदार आहे. शिक्षणाने परंपरागत व्यवसाय संपवले. घरोघरी असलेले व्यवसाय वाढवणे दूरच राहिले;

उलट ते सुरू ठेवण्याचीही सुशिक्षित युवकांना लाज वाटू लागली. सुतार, लोहार, कुंभार, ब्राह्मण, शेतकरी यांची मुले महिना पाच हजारांची फुटकळ नोकरी करतील, पण परंपरागत, घरंदाज व्यवसाय करत नाहीत. ही शिक्षण व्यवस्था ‘परीक्षार्थी’ घडवते ‘विद्यार्थी’ नाही.

झापडे बांधल्यासारखी एका चाकोरीतूनच शिक्षणपद्धत धावायला लावते. पालकही ‘सेफ झोन’मध्ये मुलांना पुढे ढकलतात. मुलाला कोणत्या गोष्टींची आवड आहे, ते हेरून त्याप्रमाणे त्याला शिक्षण घेण्यास अनुकूल असत नाहीत.

मुलांस स्वत:मध्ये असलेल्या उपजत गुणांचे व्यावसायिक मूल्य शिकवलेच जात नाही. अधिक चांगल्या पद्धतीने अर्थार्जन करण्यासाठी अन्य पर्याय त्याच्यासमोर ठेवलेच जात नाहीत. तसे ते उपलब्ध झाले तर तो केवळ सरकारी नोकरीच्या मागे धावणार नाही. स्वकर्तृत्वावर कमावण्याची हिंमत आपोआपच त्यांच्यात निर्माण होईल.

कमी जबाबदारीची, चांगली, सुरक्षित नोकरी मिळाली की मग सगळा संसार सुरळीत होतो व आयुष्याची बेगमी होते ही चाकोरीबद्ध मानसिकता तयार झाली आहे. ही विचारधारा सोबत घेऊन युवक आज वाट्टेल त्या मार्गाने सरकारी नोकरी मिळवण्याच्या मागे लागतो.

त्यासाठी लाच देणेही त्याला गैर वाटत नाही. मोठ्या व्याजावर कर्ज, नातेवाइकांकडून उसने घेऊन, दागदागिने विकून, घरावर कर्ज काढून ही लाच दिली जाते. त्यात अशा प्रकारची फसवणूक पदरी पडली की कमालीचे नैराश्य येते.

पैशापायी पैसे जातात, पत जाते, मित्र दुरावतात आणि नातीही तुटतात. मग दारू, ड्रग्ज ही व्यसने जडतात. अगदी पुढचे टोक गाठून युवक आत्महत्याही करतात. जे आधीच शोषित असतात त्यांचे आणखी शोषण होते व त्यांच्या जिवावर मजा मारणारे मात्र चैनीत दिवस घालवतात.

केवळ एका सरकारी नोकरीपायी हे सगळे अरिष्ट ओढवून घेण्यापेक्षा त्याच पैशांनी एखादा छोटा व्यवसाय सुरू करणे जास्त हिताचे. असे अनेक लहान मोठे व्यवसाय आहेत, ज्यात गोमंतकीयांनी लक्ष घालणे गरजेचे आहे; कारण हळूहळू हे व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती जात आहेत.

प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती-देखभाल, टेलर, ड्रेस डियाझाइनर, भाजी-पेपर विक्रेता, एसी दुरुस्त करणारे, पायलट, छोटा गाडेवाला, उसाचा रस किंवा फळे विकणे असे अनंत छोटे उद्योग अहेत जे आपले जीवन स्वावलंबी बनवतात.

प्रारंभी थोडीफार कमाई होत, काही वर्षांनी धंधात जम बसतो. शिवाय, कोणाची हांजी हांजी करायला नको, स्वतःच स्वतःचा बॉस, डोक्याला ताप नाही. काय जे अधिक उणे असेल ते आपलेच. म्हणून युवा पिढीने आपल्या आवडीच्या विषयात प्रावीण्य मिळवत, त्याचे रूपांतर व्यवसायात करावे. अशा उद्यमी गोमंतकीयांची आज समाजाला गरज आहे.

गोमंतकीय युवा नोकरीच्या मागे न लागता आत्मबळावर व्यवसाय करू लागल्यास, काही अंशी तरी नोकऱ्यांसाठी होणारी चढाओढ कमी होईल, नियंत्रणात येईल. लाच देणारे कमी झाले, की आपोआप घेणारेही कमी होतील. नोकरीसाठी पैसे देण्याची गरजच उरणार नाही. ‘कॅश फॉर जॉब’वाल्यांच्या नाकाला आपोआपच वेसण बसेल.

पण, हे लिहिण्याइतके सोपे निश्‍चितच नाही. यात अनेकांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे. पालक, मुले, शिक्षक, समाज, सरकार, प्रशासन या सर्वांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. पालकांना मुलांवर विश्‍वास ठेवावा लागेल.

मुलांना आत्मविश्‍वास व अपयश स्वीकारणे आत्मसात करावे लागेल. ‘सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित आयुष्य’ ही मानसिकता समाजास बदलावी लागेल. अपयशी गोमंतकीयास सांभाळून घेणे, त्याचा व्यवसाय होण्यास जमेल तशी मदत करणे, त्याला कमी न लेखता प्रोत्साहन देणे या गोष्टी समाजास आवर्जून कराव्या लागतील.

कोणताही व्यवसाय कमी दर्जाचा नसतो. प्रत्येक व्यवसायाला त्या त्या जागी महत्त्व असते. हे लक्षात घेणे फार महत्वाचे. समाजात एकी असणे हेही महत्त्वाचे. केवळ योजना काढली, पैसे पुरवले म्हणजे सरकारचे काम संपले असे होत नाही.

Cash For Job Scam
Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

जरी नोकरी देणे हे सरकारचे काम नसले तरी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. सरकारने सवलत देणे, मोफत देणे आधी बंद करावे. लोकांना लाचार बनवू नये. फुकटे निर्माण करणे हे सरकारचे काम नव्हे, तर क्रयशक्तीला चालना देणे हे सरकारचे काम आहे. राजकारण्यानी उच्च प्रतीचा राजधर्म पाळावा - त्याला वास्तवाची जोड असावी. युवावर्गाला स्वत:वर अवलंबून ठेवणे बंद करावे.

मला माहीत आहे, जे मी सांगत आहे ती आदर्श स्थिती आहे; वस्तुस्थिती नाही. पण, ती आदर्श स्थिती वस्तुस्थिती बनवणे इतके कठीण आहे का? ती होत नाही कारण आम्हांलाच ती झालेली नको.

Cash For Job Scam
Pooja Naik: पोलिसांना अधिक वेळ का हवा आहे? 'पूजा' प्रकरणी वाल्मिकी नाईक यांचा सवाल; Cash For Job मुळे गोव्याच्या बदनामीचा आरोप

राजेशाहीत ‘यथा राजा तथा प्रजा’ हे खरे होते; लोकशाहीत ‘यथा प्रजा तथा राजा’ हे खरे आहे. पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवणे हा स्वत:चा, स्वत:च्या शिक्षणाचा, स्वकर्तृत्वाचा अपमान आहे, हे जोवर आतपर्यंत जाणवत नाही, तोवर ‘कॅश फॉर जॉब’सारखी प्रकरणे होतच राहतील. आपण लोकच ती थांबवू शकतो. पण, तसे न करता ‘शोषित’ होणे स्वीकारले, हेच चुकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com