

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आपण ज्यांची नावे घेतली, त्यांच्याशी त्या-त्या वेळी साधलेल्या संपर्काचे पुरावे असलेला मोबाईल म्हार्दोळ पोलिसांकडे असल्याचा दावा मुख्य आरोपी पूजा नाईक हिने ‘गोमन्तक’शी केल्यानंतर, तिच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल चौकशीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे सोपवण्यात आल्याची माहिती म्हार्दोळचे निरीक्षक योगेश सावंत यांनी सोमवारी दिली.
सरकारी नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आपण लोकांकडून जे पैसे घेतले, ते आपण दोन अधिकाऱ्यांकडे दिले. त्या काळात याबाबत आपले त्यांचे मोबाईलवरून संभाषण होत होते. त्याचे रेकॉर्डिंग आपण आपल्या मोबाईलमध्ये केले होते. तेच या प्रकरणातील पुरावे आहेत. या प्रकरणात आपल्याला पहिल्यांदा अटक झाली, त्यावेळी आपला ‘तो’ मोबाईल डिचोली पोलिसांनी जप्त केलेला होता. त्यांनी तो म्हार्दोळ पोलिसांकडे सोपवल्याचे नंतर आपल्याला सांगण्यात आले.
त्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी तो मोबाईल आपल्याला दिल्याचे सांगितले. परंतु, म्हार्दोळ पोलिसांनी आपला मोबाईल आपल्याला दिलेला नाही, असे पूजा नाईकने रविवारी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
याबाबत म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांच्याशी सोमवारी संपर्क साधला असता, पूजा नाईकचा मोबाईल आम्ही पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे सोपवल्याचे सांगितले. फॉरेन्सिक लॅबकडून अद्याप आपल्याला याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही. पण, लॅबकडून लवकरच पुराव्यांबाबतची माहिती मिळवली जाणार असल्याचेही सावंत यांनी नमूद केले.
दरम्यान, गतवर्षी राज्यात गाजलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील आरोपी पूजा नाईक हिने वर्षभरानंतर मीडियासमोर येत या प्रकरणात लोकांकडून घेतलेली १७.६८ कोटींची रक्कम आपण एक मंत्री व दोन अधिकाऱ्यांना दिल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. परंतु, सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.
‘आप’चे नेते ॲड. अमित पालेकर म्हणतात, ‘कॅश फॉर जॉब'' प्रकरणात नाव आलेल्या मंत्र्याच्या समर्थकांनी रविवारी पवित्र आणि जागृत देवस्थान असलेल्या कटमगाळ दादा आणि नवदुर्गा देवस्थानाच्या ठिकाणी जमून गाऱ्हाणे गायले. ज्यांनी नोकरीसाठी पैसे घोटाळा उघड करणाऱ्यांना दैवी शिक्षा देण्याची मागणी केली.
खरेतर राजकीय संरक्षणासाठी पवित्र तीर्थक्षेत्राचा गैरवापर करणे, हा श्रद्धेचा अपमान आहे. देऊळ हे राजकारणाचे मैदान नाही. देव कोणाचेच वाईट करीत नाही. पूजा का बोलली? पूजा कशासाठी बोलली? पूजाने मंत्र्यांचे नाव का घेतले, हे पूजाला, मंत्र्याला आणि देवीला पूर्ण माहिती आहे. पूजाने कोणाला पैसे दिले, कोणत्या मंत्र्याला पैसे दिले, भाजपच्या कोणत्या नेत्याला पैसे दिले, हे सर्व पूजाला माहीत आहे.
पूजा नाईकची नार्को चाचणी करण्याची गरज आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केला असता, त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. ‘या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे’, इतकेच उत्तर त्यांनी दिले.
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात पूजा नाईकने नव्याने केलेले आरोप धक्कादायक आहेत. त्यामुळे या प्रकरणात तिची नार्को चाचणी व्हायलाच हवी, असे भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हे प्रकरण घडल्यानंतर तिने संबंधितांची नावे का घेतली नव्हती? आताच ती ही नावे का घेत आहे? असे सवाल करीत, ती ज्यांची नावे आता घेत आहे त्याबाबतचे पुरावेही तिने सादर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पूजा नाईकने ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात ज्या सुदिन ढवळीकरांचे नाव घेतले, त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. सरकारी नोकऱ्या देण्यासाठी सुदिन ढवळीकर पैसे घेतात असे आपण आणि गोमंतकीय जनतेनेही कधी ऐकलेले नाही. शिवाय ते असे करतील यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही असे म्हणत, उद्या अशा प्रकरणात कुणीही कुणाचेही नाव घेईल म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी उपस्थित केला.
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याअंतर्गत (बीएनएसएस) पोलिसांना चौदा दिवसांचा वेळ मिळाला आहे. या काळात संपूर्ण चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईल, असा विश्वास क्राईम ब्रॅंचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी १३ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. त्यामुळे उरलेले दहा दिवस २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहेत. त्यानंतर तरी पोलिस सत्य बाहेर आणण्यात यशस्वी होणार का? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
पूजा नाईकने कॅश फॉर जॉब प्रकरणात नव्याने केलेल्या आरोपांबाबत मी काही बोलू इच्छीत नाही. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सरकार या संदर्भात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल.
दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.