पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांचा चेहरा पुढे ठेवून गांधी कुटुंबातील तिन्ही महत्त्वाच्या सदस्यांनी दिल्लीतच राहून देशभरातील काँग्रेसजनांशी नियमित संवाद साधला आणि त्यांच्या भावना समजून त्यानुसार पक्षसंघटनेला उभारी दिली तर काँग्रेस पक्षावर ओढवू पाहणारी विभाजनाची आपत्ती टळू शकेल.
नजीकच्या काळात काँग्रेस पक्षात मोठे विभाजन होईल, अशी शंकावजा भविष्यवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या निकालानंतर केलेल्या भाषणात वर्तविली. ‘विकसित भारता’आधी देश ‘काँग्रेसमुक्त’ व्हावा, ही इच्छा पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी बोलून दाखवली होतीच. आता ही भविष्यवाणी. त्यांच्या राजकीय भाष्याकडे दुर्लक्ष करणे विरोधकांना परवडणारे नसते.
काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती असलेले राहुल गांधी यांनी वेळीच सावध होऊन विभाजन टाळण्याच्या उपाययोजना कराव्यात म्हणून पंतप्रधान मोदी यांनी हे विधान केले आहे की, राहुल गांधींनी काहीही केले तरी ते काँग्रेसमधील मोठी फूट रोखू शकणार नाहीत, असे त्यांना म्हणायचे आहे, याचा उलगडा यथावकाश होईलच.
गेल्या बारा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या यशात राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसचे ‘योगदान’ सर्वात मोलाचे ठरले आहे. अशी व्यक्ती आणि पक्ष आपल्यासाठी भविष्यातही उपयुक्त ठरावा, असे कोणाला नाही वाटणार? २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधीच मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून केंद्रस्थानी राहावेत.
पण अठराव्या लोकसभेत ९९ जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष पुढच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याच्याही लायकीचा राहू नये, अशा अंतस्थ हेतूने पंतप्रधानांनी हे भाष्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या दशकभराच्या प्रवासात दिशाहीन झालेला काँग्रेस पक्ष आता अशा वळणावर पोहोचला आहे, जिथून पुढे पक्षाची वाटचाल कमालीची धूसर झाली आहे. काँग्रेसमधील संभाव्य फूट दृष्टिपथात आल्याची खात्री पटल्याने पंतप्रधान मोदी यांनी असे ठाम विधान केले असावे. निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची, पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषणच करायचे नाही, हे राहुल गांधींच्या काँग्रेसचे वैशिष्ट्य ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीत देशातील साडेदहा लाख मतदानकेंद्रांवर मतदान सुरू असताना ‘व्होटचोरी’ पकडू शकतील, अशा किती मतदानकेंद्रांवर काँग्रेसचे निष्ठावान प्रतिनिधी कार्यरत आहेत, याची राहुल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना फिकीर नाही. के.सी.वेणुगोपाळ, सचिन राव, कनिष्क सिंह, के.राजू, कौशल विद्यार्थी, अलंकार सवाई, के.बी.बायजू, अलंकार सवाई, प्रवीण चक्रवर्ती, सुनील कानुगोलू, राजीव गौडा आणि बी. श्रीवत्स यासारख्या जनाधार नसलेल्या तथाकथित व्यावसायिकांच्या सल्ल्याने निर्णय घेणाऱ्या राहुल गांधींच्या राजकारणाला जुनेजाणते काँग्रेसजन विटले आहेत.
ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खाते आणि प्रलोभनांचा अवलंब करुन भाजपने ८० टक्के काँग्रेस पक्ष पोखरुन काढल्याचे दिल्लीतील अनेक अनुभवी काँग्रेसनेते खासगीत मान्य करतात. पक्षातील हा असंतोष पाच वर्षांपूर्वी ‘जी-२३’ नेत्यांच्या जाहीर रोषातून व्यक्त झाला. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून केलेल्या तात्पुरत्या मलमपट्टीची परिणामकारकता पराभवांच्या मालिकेमुळे संपली आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे आपली राजकीय कारकीर्द कुंठीत झाल्याची खंत शशी थरुर, पी. चिदंबरम, सचिन पायलट, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद, आनंद शर्मा यांच्यासारख्या अनेक नेत्यांना आहे. अनुभव, ज्येष्ठता आणि गुणवत्तेचे राहुल गांधी शत्रु आहेत, अशी अनेकांची कडवट भावना झाली आहे. अशा नाराज नेत्यांना भूपेंद्र हुड्डा, अशोक गहलोत, डी. शिवकुमार, कमलनाथ यासारख्या अनुभवी नेत्यांची आतून आणि कपिल सिब्बल, गुलामनबी आझाद यांच्यासारख्यांची बाहेरून साथ मिळाल्यास काँग्रेसचे १९९९ नंतर मोठे विभाजन होण्याची पंतप्रधानांची भविष्यवाणी खरी ठरायला वेळ लागणार नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने जगभरात पाठविलेल्या खासदारांच्या सात शिष्टमंडळांमध्ये शशी थरुर, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद, अमर सिंह, गुलामनबी आझाद आणि आनंद शर्मा या आजीमाजी काँग्रेसजनांची निवड मोदी सरकारने कोली होती, तीदेखील काँग्रेसश्रेष्ठींच्या संमतीशिवाय. आनंद शर्मा यांचा अपवाद वगळता काँग्रेसने दिलेल्या पर्यायी नावांना मोदी सरकारने केराची टोपली दाखवली आणि निवड झालेले काँग्रेस खासदारही पक्षनिष्ठेला तिलांजली देत शिष्टमंडळांसोबत रवाना झाले.
राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यासारखे गांधी कुटुंबाचे तीन सदस्य नेतृत्व करीत असताना काँग्रेस सर्वांत निष्क्रिय अवस्थेला पोहोचली आहे. मल्लिकार्जुन खर्गेंचा चेहरा पुढे ठेवून गांधी कुटुंबातील या तिन्ही महत्त्वाच्या सदस्यांनी दिल्लीतच राहून देशभरातील काँग्रेसजनांशी नियमित संवाद साधला आणि त्यांच्या भावना समजून त्यानुसार पक्षसंघटनेला उभारी दिली तर काँग्रेस पक्षावर ओढवू पाहणारी विभाजनाची आपत्ती टळू शकेल. पण त्यासाठी राहुल गांधींना सहकाऱ्यांशी हेकटपणाने वागणे सोडावे लागेल.
सोनिया गांधी यांना काँग्रेसजनांशी भेटीगाठी सुरु कराव्या लागतील आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना स्वतःचा करिष्मा ओसरण्यापूर्वी तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करावा लागेल. २०१३च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात भाजप चाचपडत असताना अमित शहा यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांशी दिवसरात्र संपर्क आणि संवाद साधून लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटना उभी केली आणि भाजप-रालोआला ८० पैकी ७२ जागा जिंकून देत केंद्रात पूर्ण बहुमताची सत्ता मिळवून दिली.
तशाच निष्ठेने आणि तडफेने संख्याबळाच्या बाबतीत देशातील केवळ दहा प्रमुख राज्यांमध्ये पक्षबांधणीचे काम केले तरी मोदींच्या भाजपला काँग्रेसचे आव्हान पेलणे मुश्कील होईल. पण हे सर्व समजूनही उमजत नसलेल्या राहुल गांधींच्या नेतृत्वकाळात ते शक्य झालेले नाही. जबाबदारीतून मुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसविषयी आस्था उरत नाही आणि त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी पक्षालाही कृतज्ञता नसते. पदमुक्त होताच घरी बसून भाजप किंवा राज्यातील प्रादेशिक पक्षांत संधी शोधणारे काँग्रेसचे नेते शेकडोंनी आढळतील. काँग्रेसजनांपर्यंत पोहोचण्यासाठी गांधी कुटुंबाला फुरसत नसल्यामुळे काँग्रेसचा पाया खचतोय.
अशा स्थितीत महाराष्ट्रात जे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडत असताना घडले तेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये विभाजन करण्यासाठी घडविले गेले तर? राहुल गांधी ज्या मुख्य निवडणूकआयुक्त ज्ञानेशकुमार यांना ‘व्होटचोरी’त सामील झाल्याच्या आरोपावरुन लक्ष्य करीत आहेत, त्यांचा काँग्रेसच्या संभाव्य विभाजनावरील निकाल निर्णायक ठरेल. ‘व्होटचोरी’चा आरोप करणाऱ्या राहुल गांधींविरुद्ध उभे झालेले २७२ माजी लष्करी अधिकारी, नोकरशहा आणि न्यायाधीशांच्या समूहाने ज्ञानेशकुमार यांना बळ दिले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेच्या सभापतींचे निर्णयही काँग्रेसच्या विरोधात गेले तर? सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी आता फक्त अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल आणि पी. चिदंबरम अशा मोजक्याच दिग्गज वकिलांची ताकद उरली आहे. सिब्बल यांचा काँग्रेसशी संबंध उरलेला नाही. अभिषेक मनु सिंघवी यांचे राज्यसभेत पुनर्वसन झाले असले तरी कार्यकाळ संपताच त्यांना गमावण्याचे संकट निर्माण होऊ शकते.
पी.चिदंबरम मनाने काँग्रेससोबत नाहीत, याचे संकेत देण्याची एकही संधी ते गमावत नाहीत. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अशा विभाजनाची ट्रायल यशस्वीपणे पार पडल्यानंतर काँग्रेससमोर कुठल्याही क्षणी पक्ष आणि चिन्हासह अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राहुल गांधी यांनी सध्याच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करता कामा नये.
- सुनील चावके
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.