राज्यस्थानमधील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश निश्चितपणे नेते व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावणारे आहे. मात्र, पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत अंतर्गत गटबाजीला विराम देऊन काँग्रेस आपली ताकद दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे.
काँग्रेससारख्या (Congress) गेल्या दीड दशकांपासून बहुतांश काळ मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या पक्षात यंदा इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीपासून त्यांच्या जयंतीपर्यंत बऱ्यापैकी जान फुंकली गेली. इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीच्या दुसऱ्याच दिवशी, रामलीला मैदानावर एक नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने केलेल्या प्रचंड शक्तिप्रदर्शनापासून इंदिरा गांधींच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी लागलेल्या राजस्थान पंचायत निवडणुकांच्या निकालापर्यंत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामुळे चर्चेत राहिलेल्या काँग्रेसने देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
पण या यशाचे प्रतिबिंब दोन-अडीच महिन्यांनंतर होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये उमटले तरच काँग्रेसने कात टाकली असे म्हणता येईल.
काँग्रेस पक्षाचे सलग दोन दशकांहून अधिक काळ नेतृत्व करणाऱ्या आणि जवळपास सहा दशके देशाच्या राजकारणाचा सर्वांत जवळून अनुभव घेणाऱ्या सोनिया गांधींच्या ‘बिलाँगिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. लवकरच हे पुस्तक मराठीसह विविध भाषांमध्येही अवतरणार असल्यामुळे येणाऱ्या काळात या पुस्तकाचा प्रभाव आणखी वाढू शकतो. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या बदलत्या राजकारणाचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकाच्या प्रेरणेतून काँग्रेसजनांच्या विचारधारेवर बारा-पंधरा वर्षांपासून साचलेली धूळ झटकली जाऊन त्यांच्यात उत्साह संचरला आहे.
काँग्रेसजनांच्या मनात आणि देशाच्या राजकारणात सोनिया गांधी या नावाचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे या पुस्तकाच्या निमित्ताने दिसून आले. सोनिया गांधी यांचे पुस्तक बाजारात येण्यापूर्वीच एक नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी सणासुदीच्या मोसमात सत्ताधीश भाजपच्या टीकेचा पर्वा न करता रामलीला मैदानावर इंडिया आघाडीतील मित्र पक्षांच्या सहकार्याने मोदी सरकारविरुद्ध जंगी शक्तीप्रदर्शन केले होते. हे आंदोलन रामलीला मैदानाच्या इतिहासात झालेल्या सर्वांत मोठ्या आंदोलनांपैकी एक ठरले.
सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या एका आठवड्यात दोन लाख प्रती विकल्या जात असतानाच पुढच्याच आठवड्यात नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या विदेश दौऱ्यांमुळे राहुल गांधी राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. मोदी सरकारच्या धोरणात्मक उणिवांवर बोट ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी शिकागो आणि कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थ्यांशी साधलेल्या थेट संवादातील टीकेचा नकारात्मक सूर सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना रुचला नाही.
पण दुसरीकडे राजकारण, अर्थकारण आणि जागतिक राजकारणावर टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीशिवाय कुठलाही आडपडदा न ठेवता अस्खलित इंग्रजीत बेधडक आणि मुद्देसूद मतप्रदर्शन करणारा आपला नेताही पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस ठरू शकतो, या कल्पनेने आता काँग्रेसजनांना राहुल गांधींचे मनोमन कौतुक वाटू लागले आहे. मात्र, राहुल गांधींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची कवडीचीही जाण नसून ते चीन आणि पाकिस्तानधार्जिणे असल्याची टीका भाजप नेते न चुकता करीत असतात. तरीही राहुल गांधी यांच्या रस्त्यावरच्या आंदोलनातील, रामलीला मैदानावरसारख्या जंगी सभांमधील आणि चर्चेच्या व्यासपीठावरच्या कामगिरीमुळे त्यांच्याविषयीची सर्वसामान्य काँग्रेसजनांच्या मनातील नकारात्मकता संपत चालली आहे.
अर्थात, अशोक गहलोत, भूपिंदरसिंह हुड्डा, दिग्विजय सिंह, कमलनाथ, डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या, भूपेश बघेल, पी. चिदंबरम, शशी थरुर, कुमारी शैलजा, तारिक अन्वर, प्रतिभा सिंह, टी. एस. सिंह देव, चरणदास महंत, शक्तिसिंह गोहिल, भरतसिंह सोळंकी, अखिलेश प्रसाद सिंह, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, चरणजित सिंह चन्नी, प्रतापसिंह बाजवा, सुखजिंदर सिंह रंधावा, अजय राय, प्रमोद तिवारी, हरीश रावत, अधीर रंजन चौधरी, प्रदीप भट्टाचार्य यांच्यासारख्या जनमानसावर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या अनुभवी आणि बुजुर्ग नेत्यांनी ‘पप्पू’चा शिक्का यशस्वीपणे पुसून काढणाऱ्या राहुल गांधींच्या बदललेल्या प्रतिमेवर अद्याप प्रशस्तीची मोहोर उमटवलेली नाही.
त्यातील बहुतांश नेत्यांनी केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राहुल गांधींपासून फटकून राहताना पक्षाची घसरण रोखण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. पण सोनिया गांधींच्या पुस्तकामुळे काँग्रेस समर्थकांमध्ये संचरलेला उत्साह आणि राहुल गांधींच्या झपाट्याने बदलणाऱ्या प्रतिमेमुळे आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही पक्षापासून दूर राहण्याच्या धोरणावर फेरविचार करावा लागणार आहे. आता सोनिया गांधी-राहुल गांधी यांचे नेतृत्व काँग्रेससाठी आशादायक ठरू पाहात असल्याचे चित्र तायर होत आहे.
समाजवादी पक्ष, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचा अपवाद वगळता देशातील बहुतांश प्रादेशिक पक्षांना अस्तित्व टिकविण्याचा प्रश्न भेडसावत असताना काँग्रेसला गमावलेला जनाधार परत मिळविण्याची संधी आहे. अन्य विरोधी पक्षांमधील एकाही नेत्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे सामर्थ्य उरले नसताना राहुल गांधी यांनी सातत्याने मोदी सरकारला आव्हान दिले आहे. ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटीमुळे जेन-झीमध्ये संतापाची लाट निर्माण होऊन त्यातून कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाल्यानंतर देशाच्या राजकारणात मागच्या सहा महिन्यांत बरीच उलथापालथ झाली. या उलथापालथीचा राजकीय लाभ प्रामुख्याने सत्ताधीशांविरुद्ध निवडणुका लढणाऱ्या विरोधी पक्षांनाच मिळाला.
त्यातून सत्ताधीशांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनांचा फायदा मैदानात लढणाऱ्या मुख्य विरोधी पक्षांनाच मिळतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये झालेल्या विधान परिषदेच्या तसेच राजस्थानमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती आली. राजस्थानच्या ३७ पैकी २३ जिल्हा परिषदांमध्ये तसेच राज्यातील ४१९ पैकी २७५ पंचायत समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेसने सत्ताधारी भाजपचा धुव्वा उडविला. भाजपला केवळ पाच जिल्हा परिषदांमध्ये बहुमत आणि ६३ पंचायत समित्यांमध्ये विजय मिळविता आला.
केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन असलेल्या भाजपविरुद्धचा रोष या निकालांतून दिसून आला. हे यश निश्चितपणे मनोधैर्य उंचावणारे आहे. तरीही त्यातून बोध घेऊन अंतर्गत गटबाजीला विराम देत काँग्रेस पक्ष पंजाब, उत्तराखंड आणि गोवा विधानसभेच्या निवडणुकीत एकजुटीने उतरेल काय, या प्रश्नाचे उत्तर अजिबातच सोपे नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.