Congress in Goan Politics
जनमत कौल, सुरुवातीच्या निवडणुका, काँग्रेस पक्षाचे अस्तित्व हे विषय इतिहास अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जनमत कौल व तत्कालीन राजकीय घडामोडींच्या साक्षीदारांना अजून या विषयावर लिहावेसे का वाटत नाही? या चळवळीतील अनेक विषय व बारकावे अजून कोणी लिहिलेले नाहीत. काँग्रेस पक्षाचे अपयश, जॅक सिकेरा आणि युगोपचे राजकारण हे तर अभ्यासाचे महत्त्वपूर्ण विषय आहेत. काँग्रेस पक्षाचे गोवा मुक्तीनंतरचे अस्तित्व हा विषय अजून दुर्लक्षिलेलाच आहे...
कोकणी चळवळीचा कथित आढावा घेणारे पुस्तक उदय भेंब्रेंनी लिहिले आहे. त्यात नवीन काही नाही. काही वर्षांपूर्वी त्यातील बहुतांश लेख प्रसिद्ध झाले होते. आता त्यात थोडीशी भर घालून ते पुस्तकरूपात आणले आहे. त्यामुळे या पुस्तकात कोकणी चळवळीचा इतिहास असेल, त्यात इतिहासासंदर्भात बरेच बारकावे असतील.
जनमत कौलातील नियोजन, ख्रिस्ती चर्चची भूमिका, निधीची उपलब्धता, जॅक सिकेरा आणि ख्रिस्ती नेत्यांची कामगिरी, त्यानंतर ‘कोकणी प्रजेचो आवाज’चा संघर्ष, त्यावेळी पुंडलिक नाईक यांच्याकडे सोपविलेली नेतृत्वाची धुरा, आमदार असतानाही उदय भेंब्रे यांच्याकडे झालेले दुर्लक्ष, पुंडलिक नाईक यांच्या कामाची वैशिष्ट्ये, या चळवळीचे तटस्थ अवलोकन, आपापसांतील मतभेद, शिवाय त्यानंतरचे पक्षीय राजकारण यांबाबत अभ्यासकांना निश्चित उत्सुकता आहे. रवींद्र केळेकर, चंद्रकांत केणी, शंकर भांडारी, पुरुषोत्तम काकोडकर आदी पुढारी या गोष्टी लिहू शकले असते. त्यांना सवड झाली नाही.
काहींना सत्य लिहिण्याची, स्वतःच्या कामाचा तटस्थ आढावा घेण्याची प्रवृत्ती ही आत्मप्रौढी वाटू शकते. मुळात हे अवघड काम; परंतु इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अभ्यासक त्यातून आपापले निष्कर्ष काढतील. भविष्यातील अभ्यासकांना त्यावर लिहिताना हा इतिहास फायदेशीर ठरू शकतो.
भेंब्रे हे पत्रकार आणि लेखक असल्याने असे आत्मवृत्त तटस्थपणे लिहिणे त्यांना शक्य आहे. सध्या गोव्याचे अस्तित्व आणि अस्मिता या दोन्ही गोष्टी दोलायमान बनलेल्या असताना नव्या पिढीसाठीही हा इतिहास खूप महत्त्वाचा ठरेल.
परंतु आजचा माझ्या लेखाचा विषय त्यांनी पुस्तक प्रकाशनावेळी केलेले विधान, ज्यात त्यांनी जॅक सिकेरांवर दुसरा हल्ला चढविला आहे - त्याचा आढावा घेणे आहे. जॅक सिकेरा यांना संपूर्णतः जनमत कौलाचे पितामह म्हणता येणार नाही. त्यांचे काम मर्यादित होते, असे विधान भेंब्रे सतत करीत आले आहेत. त्यात त्यांनी परवा म्हटले, काँग्रेसबरोबर युनायटेड गोवन्स पक्षाने युती केली असती तर पहिल्याच निवडणुकीत ही आघाडी सत्तेवर येऊ शकली असती.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मान्य केला होता, असे भेंब्रे यांचे म्हणणे आहे; परंतु मला त्याबाबत संशयच आहे. कारण या पक्षाच्या मागे पुरुषोत्तम काकोडकरांसारखे हेकेखोर नेतृत्व होते. कोणाच्याही पाठिंब्याविना आम्ही स्वबळावर जिंकून येऊ शकतो, या तोऱ्यात हा गट वावरत होता. एवढेच नव्हे, तर निवडणुकीपूर्वी त्यांनी आपापसांत मंत्रिपदे, तसेच खात्यांचे वाटप केले आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान कसे असेल, याची रेकीही केली होती असे त्यावेळी छापून आले आहे.
इतिहास संशोधक पराग पोरोब माझ्या मताशी सहमती दर्शवितात. काँग्रेस गोवा जिंकल्याच्या तोऱ्यात वावरत होता. त्यांना युगोपने आपल्यात विलीन व्हावे असे वाटत होते. त्यांच्याशी जागा वाटप- समझोता करणे दूरच राहिले, असे ते म्हणाले.
काँग्रेसने वास्तवाचे भान ठेवून जरूर असा प्रस्ताव तयार केला, हे क्षणभर मान्य केले तरी त्याबाबत ते किती गंभीर होते, नेतृत्वात एकवाक्यता होती का, केवळ प्रस्ताव नव्हे; परंतु प्रसंगी वेगवेगळ्या पातळ्यांवर लॉबिंग करावे लागते, तसा प्रयत्न झाला होता का, याबाबत काही संदर्भ सापडत नाहीत.
जनमत कौलानंतर विलीनीकरणविरोधी शक्तींनी ऐक्य दाखवावे, असा एक विचार जरूर गोव्यात चर्चेला आला; परंतु ‘आघाडी’ बनवायची असते तेव्हा देवाण-घेवाण होते. जागावाटपात तडजोड करावी लागते. काँग्रेस पक्षाची ताकद कमी होती. त्यात जॅक सिकेरा ताठर भूमिका घेत होते, यात तथ्य आहे. शिवाय मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस पक्ष तडजोड करण्यास तयार नव्हता.
पुरुषोत्तम काकोडकर हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची रेकी करून आले होते, असे माधव गडकरींनी लिहिले आहे. काकोडकरांना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने युतीची चर्चा निष्फळ ठरताच निवडणुकीतूनच माघार घेतली; परंतु स्वातंत्र्यसैनिक ‘अपक्ष’ लढले आणि दारूण पराभवाला सामोरे गेले.
माधव बीर, पांडुरंग मुळगावकरांपासून पां. पु. शिरोडकर यांची अनामत रक्कम जप्त झाली. दुसरे - युगोप नेतृत्वाने त्यावर सम्यक विचार केला होता, असेही मानता येणार नाही. कारण युगोपचेही नेतृत्व अशाच एककल्ली आणि हेकेखोर जॅक सिकेरा यांच्याकडे होते. सिकेरा यांनी त्यापूर्वी जनहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर कधीही राजकीय भूमिका घेतली नव्हती. ते कधी कोणत्या चळवळीत सामील झाले नाहीत.
एवढेच नव्हे, तर मुक्ती लढ्यापासून फटकून राहिलेले, आपला व्यवसाय आणि उद्योग सांभाळताना पोर्तुगिजांशी हातमिळवणी केलेले, असे ते नेते होते. त्याउलट त्यांचे भाऊ फ्रँक सिकेरा हे स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यानंतर ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य बनले. त्यांच्या घरात पुरुषोत्तम काकोडकरांचा वावर असे व काँग्रेसच्या अनेक बैठकाही तेथे घेतल्या गेल्या. फ्रँक सिकेरा आणि जॅक यांच्यामध्ये वितुष्ट होते, हे वारसा मालमत्तेसंदर्भात, उद्योगांच्या भागीदारीतून घडले होते; परंतु त्यामुळे या दोन्ही भावांची तोंडे दोन दिशांना झाली.
त्यांचे निकटवर्तीय सांगतात, फ्रँक यांनी मुक्तिलढ्यात भाग घेतल्यामुळे मालमत्तेवर टाच येऊ शकते, अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे ही सर्व मालमत्ता जॅक सिकेरा यांची आहे, असा काहीसा लेखी करार दोघा भावांनी केला; परंतु तुरुंगातून सुटून आल्यानंतर फ्रँकला आपल्या धंद्यातील योग्य हिस्सा लाभू शकला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट आले. त्याचे पडसाद राजकारणावरही उमटले. एवढे की, फ्रँक काँग्रेसमध्ये असल्यामुळे जॅक सिकेरांनी राजकारणाची वेगळी चूल मांडली आणि ते युगोपचे कर्ता-करविता बनले.
सुरुवातीला हा पक्ष घडविण्यात अनेकांचा हातभार लागला असला तरी शेवटी जॅक आणि इराज्मो या पिता-पुत्रांचे त्यावर नियंत्रण राहिले. दोघेही हेकेखोर, उद्धट होते; परंतु जमेची बाजू म्हणजे दोघेही विलक्षण बुद्धिमान. इराज्मोने तर संसदीय कामकाजाद्वारे आपली मुद्रा राष्ट्रीय राजकारणावर उमटविली होती. जबरदस्त अभ्यासू विरोधी नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली; परंतु राजकारण बदलत होते. युगोपमध्ये असंतोष होता. हा पक्ष व्यापक बनविण्याची आवश्यकता होती. केवळ ख्रिश्चनांचा पक्ष म्हणून मर्यादा पडत होत्या - काँग्रेसने तरुण, तडफदार नेत्यांना पुढे आणले होते. त्यात इंदिरा गांधींचा करिश्मा वाढत होता. या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार आपले राजकीय धोरण ठरविण्यात पिता-पुत्रांना अपयश आले.
वास्तविक, जॅक सिकेरांपेक्षा पुरुषोत्तम काकोडकर यांची जबाबदारी मोठी होती. त्यांचा नेहरू घराण्याशी असलेला संपर्क, मुक्ती चळवळीतील काम व प्रतिमा यांमुळे त्यांनी अधिक नम्र बनून सिकेरांशी तडजोड करणे शक्य होते. मात्र, गोव्यातील बदलती स्थिती, बहुजन समाजातील खदखद, पोर्तुगीज आमदनीतही ब्राह्मण समाजाने पायाभूत सुविधांवर केलेला कब्जा, यांमुळे गोव्यात मोठी सामाजिक दरी निर्माण झाली होती.
ख्रिस्ती आणि हिंदू उच्च वर्णीयांचे जोखड झुगारून देण्याची बहुजन समाजाला आयतीच राजकीय संधी मिळाली होती. बांदोडकर यांनी राजकीय शहाणपण दाखवून बहुजन समाजाची देशातील पहिली राजकीय क्रांती सुरू केली. तिच्या पाऊलखुणा दिसत होत्या. या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करण्यास काँग्रेसला दारुण अपयश आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधी-नेहरूंच्या प्रभावाखाली देशात काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळत होते. त्याचीच ‘री’ गोव्यात ओढली जाईल, असा काहीसा समज काँग्रेस नेतृत्वाने करून घेतला. गोव्यात एकूणच समाजात स्वातंत्र्यसैनिकांबद्दल फारसे अनुकूल वातावरण नाही, याचाही अंदाज नेतृत्वाला बांधता आला नाही.
सिकेरांचे तसेच झाले. ख्रिस्ती समाजातील ते ब्राह्मणी प्रस्थ; परंतु हिंदू-बहुजन समाजात उच्चवर्णीयांबाबत असणारा तिटकारा ख्रिस्ती समाजात नव्हता. सिकेरांचे तळागाळाशी संबंध नव्हते; परंतु ख्रिस्ती माणसाची नस त्यांनी ओळखली होती. त्यादृष्टीने ते महत्त्वाकांक्षी आणि मतलबीही होते. ते पुरेसे धार्मिक नव्हते; परंतु चर्चमध्ये प्रार्थनेवेळी पहिल्या रांगेत बसून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल, हे त्यांनी कटाक्षाने पाहिले. त्यावेळचा त्यांचा दरारा, उच्च समाजातील ऊठ-बस, चर्च धर्मसंस्थेशी जवळीक, उद्योग विश्वातील कामगिरी ही निश्चितच एका वर्गाला आकर्षित करणारी होती.
लक्षात घेतले पाहिजे की, त्यावेळचा युगोप हा गोव्याचे वेगळे अस्तित्व, अस्मिता यासंदर्भात ठाम भूमिका घेत होता आणि महाराष्ट्रवादाला प्रखर विरोध, हे त्यांचे ब्रिद होते. त्याउलट काँग्रेसची भूमिका बरीचशी गोंधळाची होती. भाषा, अस्मिता, विलिनीकरण या प्रश्नांवरही त्या पक्षाची भूमिका बोटचेपी होती. त्यामुळे गोवावाद्यांच्या नजरेतूनही काँग्रेसबद्दल फारशी आस्था नव्हती. गोव्यात मधल्या काळात दोनवेळा जवाहरलाल नेहरू येऊन गेले आणि त्यांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमाव जमला; परंतु त्यांच्या पक्षाबद्दल गोव्यात जनमत अनुकूल नव्हते, ही जमीन परिस्थिती काँग्रेस नेत्यांना आजमावता आली नाही.
पहिल्या १९६३ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार जिंकून आला नाही. मगोप १६, तर युगोपचे १२ असे संख्याबळ निर्माण झाले. त्यावेळच्या काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी निवडणुकीचा निकाल हेच जनमत कौल आहे, असे मानून गोवा महाराष्ट्रात विरघळून टाकावा, असे मत बनविले होते. गोव्याला जनमत कौलही सहज लाभला नाही. काँग्रेस - नेत्यांचे मन वळविण्यात नेत्यांना नाकीनऊ आले. शेवटी हतबल होऊन पुरुषोत्तम काकोडकर यांना विजनवासात - ऋषिकेशला जावे लागले. त्यांची हत्या झाल्याच्या वार्ता पसरल्या, तेव्हा नेत्यांना जाग आली. या अशा नाट्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या ठाम भूमिकेबाबतही संशय घेण्यात आले.
जनमत कौलात राजकीय स्थिती नेमकी उलटी बनली. ‘दोन पानां’ना १६ मतदारसंघांत पाठिंबा लाभला, जे चित्र १९६३ च्या पहिल्या निवडणुकीपेक्षा उलट होते; परंतु त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मगोप पुन्हा स्पष्ट बहुमताने जिंकून आला. जनमत कौलात जीवाची बाजी लावून काँग्रेस नेत्यांनी काम केले असते तर त्याचे पडसाद निवडणुकीवर जरूर उमटले असते. स्थानिक नेतृत्वात ती जिगर, आक्रमकता यांचा अभाव होता का, हा अभ्यासाचा मुद्दा आहे. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. सर्वसामान्यांचे कैवारी अशी त्यांची प्रतिमा बनली. त्याउलट जॅक सिकेरा हे भाटकारांचे प्रतिनिधी होते. भाऊसाहेब जिवंत असेपर्यंत विरोधकांना कधी सत्तेची स्वप्ने पाहण्याचीही संधी प्राप्त झाली नाही. काँग्रेस हा थट्टेचा विषय बनला होता.
पहिल्या निवडणुकीत गोव्यात काँग्रेस पक्षाला शून्य जागा मिळाल्या आणि १३ टक्के इतकीच मते प्राप्त झाली. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविली नाही... त्यानंतर १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा लढविल्या; परंतु एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. त्यांच्या पदरात आणखी कमी केवळ १० टक्के मते पडली. पहिल्या निवडणुकीत हा पक्ष दमणची एकच जागा जिंकला होता; परंतु गोव्यात २८ पैकी १९ जागी बलाढ्य उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली होती, हे नजरेआड करता येणार नाही. त्यानंतर तिसऱ्या निवडणुकीत १९७२ मध्येही या पक्षाच्या आठ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
ज्यावेळी भाऊंचे निधन झाले, मगोप फुटला, शशिकला काकोडकर यांच्याविरोधात पक्षात बंड झाले, तेव्हा नवीन नेतृत्वाने कॉंग्रेस पक्षाचा ताबा घेतला होता. जुनी खोडे बाजूला पडली. बाबू नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सत्ताधारी बंडखोरांना प्रोत्साहन दिले. त्यावेळी डॉ. जॅक सिकेरांच्या नेतृत्वाखाली युगोपनेही जनता पक्षात प्रवेश केला होता. या १९७७ च्या निवडणुकीत युगोपचे सात माजी उमेदवार व मगोपचे प्रतापसिंग राणे यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली.
काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत जबरदस्त मोर्चेबांधणी करताना मगोपसह युगोपच्या अनेक तरुण चेहऱ्यांना मतदारांसमोर आणले होते. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात काँग्रेसविरोधी वातावरण असताना गोव्यात काँग्रेसचे दहा आमदार जिंकून आले. ताईंचे सरकार एका वर्षात कोसळले. त्यानंतर गोव्यात राजकीय गोंधळ उडाला. काँग्रेस पक्षाची इंदिरा व अर्स अशी शकले झाली. जानेवारी १९८० च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही.
कारण महत्त्वाचे नेते अर्समध्ये सामील झाले होते. त्यातील चौघांची अनामत रक्कम जप्त झाली. अर्स काँग्रेसने ३० पैकी २० जागा जिंकल्या. त्यावेळी दयानंद नार्वेकर, दिलखूष देसाई, वासू पै गावकर आदी बंडखोर जिंकून आले. हरिश झांट्ये यांनी डिचोलीत ताईंचा दारुण पराभव केला. संपूर्ण देशात इंदिरा काँग्रेसची लाट आणि गोव्यात अर्स काँग्रेसचे वाढलेले बळ, अशी स्थिती असता अचानक एका रात्रीत ‘आयारामांच्या’ अर्स काँग्रेसने इंदिरा काँग्रेसमध्ये उडी टाकली. अर्स काँग्रेसचे २० सदस्य, मगोपचे सात आणि तीन अपक्षांचा मिळून ३० जणांचा सामर्थ्यवान गट तयार झाला. पराभूत ताईंनीही काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. रमाकांत खलप गटाने ऐनवेळी माघार घेतली नसती तर मगोपचे विधानसभेतील अस्तित्वही संपुष्टात आले असते.
काँग्रेस पक्ष त्यानंतर सत्तेवर आला तो पक्षांतरावर स्वार होऊन. युगोप व मगोपच्या नेत्यांनी नेतृत्व हाती घेतले. जी काँग्रेस सत्तेवर आहे, तीच ‘मूळ’ काँग्रेस आहे का, असा प्रश्न पडत होता. परिस्थिती आज सत्तेवर असलेल्या भाजपसारखीच; परंतु गोव्यात सत्तेवर येण्याचा व सत्तेला चिकटून राहण्याचा तोच राजमार्ग ठरला व आज तोच ‘कायदा’ बनला आहे. काँग्रेसने गोव्यात सर्व तडजोडी केल्या, भ्रष्टाचाऱ्यांना मोकळीक दिली, जमीन रूपांतरांची सुरुवात केली; परंतु त्यामुळे हा पक्ष अनेक वर्षे सत्तेवर राहू शकला. दिल्लीत तो पक्ष ताकदवान होता, तोपर्यंत गोव्यात त्याचे अस्तित्व टिकून राहिले. नेते येत-जात राहिले. या काळात तो केवळ नेत्यांचा पक्ष बनला. या पक्षाने कार्यकर्ते जोपासले नाहीत. परिणामी संघटना कमकुवत राहिली. आज तर हा पक्ष विक्रमी काळ गोव्यात सत्तेवर होता, हे सांगूनही खरे वाटणार नाही, एवढे त्याचे अस्तित्व पुसट बनले आहे.
राष्ट्रीय पक्ष आवश्यकतेपेक्षा अधिक ताकदवान बनतात, तेव्हा ते छोट्या राज्यांच्या अस्तित्वासमोर अडचणी निर्माण करतात. आज भाजप तेच करतो आहे. एकेकाळी कॉंग्रेसने तेच केले व हे पाप चालविताना त्या पक्षाने राज्यातील प्रादेशिक पक्षांचा गळा आवळला.
प्रादेशिक पक्षांच्या हत्येचे रक्त कॉंग्रेसच्या हातांना चिकटले आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.