Cultural evolution in Goa
Goa NightlifeDainik Gomantak

Goa Opinion: ‘नीज' गोयकाराचा ‘न्हीज' गोयकार होण्याच्या मार्गावर का आहे?

Cultural evolution in Goa: गोमंतकीय जीवनशैली, रीतीरिवाज, धर्म, कायदे-कानून इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकून, कलेची ही परंपरा जपून आमच्या पुढील पिढ्यांचे जीवन समृद्ध होईल.
Published on

विकास कांदोळकर

आज गोव्यात सर्वच कलाक्षेत्रांत आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. गोव्याच्या पाककलेत नारळ, कोकम, विनेगर, मासे, भाज्यांची जागा चायनीज फूडने घेतली आहे. तरुण पिढी घरात न जेवता धाब्यावरील जेवणात धन्यता मानत आहे. विद्यार्थिवर्ग भाषा, सामाजिक जीवन, विज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या शैक्षणिक क्षेत्रापासून दूर जात नोकरी मिळवण्याच्या आशेने तांत्रिक शिक्षणाकडे किंवा मोठमोठ्या कंपन्यांच्या मोहजालात अडकून जीवनाच्या ऱ्हासास कारणीभूत होत आहे.

गोमंतकीय समाज धार्मिक सलोख्यापासून धार्मिक कलहाकडे जाताना दिसत आहे. सद्यस्थितीत त्यांचे लक्ष ‘शिगमो’, ‘इंत्रूज’, गणेशचतुर्थी, दिवाळी, नाताळ या सणांपासून दूर करून, तरुणाईला विपरीत ऊर्जा देणाऱ्या ‘सूर्याला जाळण्या’चे नृत्य सादर करण्याकडे आकर्षित केले जात आहे.

पुरातन काळापासून स्थापत्य कलेत नैसर्गिक वस्तू वापरून निसर्गाशी अभिप्रेत असलेला समतोल बिघडवून, अनैसर्गिक स्रोतांचा भडिमार सुरू असतानाच गोव्यातील शेती, बागायती व मच्छीमारी क्षेत्रे नष्ट करून बेसुमार सिमेंट काँक्रीटची जंगले उभारली जात आहेत.

‘ताबलां’, विटीदांडू, ‘टिकटें’, लगोऱ्या, ‘गड्डे’, ‘नाल्लानी’, ‘बियांनी’, ‘खांबयानी’, ‘बडयांनी’, इत्यादी पारंपरिक खेळांची कला नष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर फुटबॉल, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, हॉकी, पोहणे या खेळांचे महत्त्वसुद्धा कमी होत आहे. श्रीमंतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या क्रिकेटचे सामने गावांतील वाड्यावाड्यांवर होत असल्यामुळे बरेच पालक चिंतित दिसतात.

गोव्यात मांडवी नदीवर तरंगणाऱ्या जहाजांवर आणि इतर भागांत जुगारी अड्ड्यांची वारेमाप वाढ होऊन रमी, पोकर, ब्लॅकजॅक, रौलेट, बक्करटसारख्या खेळांच्या कलेला महत्त्व आलेले सर्रासपणे दिसून येते. गोव्यात पूर्व काळात पोटाची खळगी भरण्यासाठी देवदासी बनत, आता उच्चस्तरीय ‘पर्यटकदासी’ सर्रासपणे आढळून येतात.

शास्त्र कलेत गोमंतकीय विद्यार्थ्यांचा कल कमी दिसून येत असून संगीत, कला क्षेत्रात भारतीय गायन, भजन, कीर्तन, ‘मांडो’, ‘देखणी’, ‘धूलपोड’, तियात्र या कलांच्या नाकांवर टिच्चून नशाबाजारचे ‘EDM‘ म्युझिक फेस्टिवल होत आहेत. माऊली मंदिर, धारगळ-पेडणे येथे तीन दिवस संवादी संगीत संमेलन झाले. भारतीय संगीत क्षेत्रातील बुजुर्ग कलाकारांनी आपली कला या संमेलनात सादर केली, पण प्रेक्षकांची उपस्थिती अगदीच नगण्य!

तर याच माऊली मंदिराच्या मागील भागात स्थानिक लोकांचा विरोध असलेल्या ‘सनबर्न फेस्टिवल’ला तोबा गर्दी !!! लोक अभिजात नृत्यकला, सामाजिक आणि पारंपरिक नृत्ये तसेच फुगडी, ‘देखणी’, ‘धालो’, ‘मांडो’, इत्यादींपासून दूर होत निम्नस्तरावरील नशाबाजीला उत्तेजन देत असलेल्या, सामाजिक, शारीरिक व आर्थिक दुष्परिणामांची चिंता न करणाऱ्या बीभत्स नृत्यांकडे आकर्षित होत असलेले दिसतात. चर्च व देवळे ही स्थानिक कलांची माहेरघरे पर्यटकांची ‘आहेर’ घरे होत असताना असाहाय्यपणे पाहणे गोमंतकीयांच्या नशिबात आले आहे. आजवर देवाश्रयावर आणि सदस्यांनी ‘पटी काढून’ टिकवलेली गोव्यातील उत्सवी रंगभूमी आर्थिक विवंचनेमुळे डबघाईस येत असल्याचे वारंवार दृष्टीस पडत आहे.

Cultural evolution in Goa
Goa Opinion: 'सामान्य गोवेकर जेव्हा बिल भरायला बाहेर पडतो तेव्हा..'; फाइल’विरहित प्रणालीची आवश्यकता आणि अवस्था

थोडक्यात ‘गोपकपट्टण’, ‘गोवापुरी’, ‘गोमंतक’, ‘गोराष्ट्र’ आणि ‘गोवा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, या जागतिक प्रसिद्धी असलेल्या राज्याचा समृद्ध सामाजिक आणि आर्थिक इतिहास त्याच्या विविध प्रांतांत आढळणाऱ्या उत्सव, परंपरा तसेच वक्तृत्व, साहित्य, नाट्य, नृत्य, गायन, स्थापत्य, हस्तकला, पाककला, इत्यादी विविध कलांच्या माध्यमांतून दिसून येतो.

Cultural evolution in Goa
Goa Opinion: गोव्यातील रस्ते वारंवार खराब का होतात? नेमका कुठे होतो गोंधळ; वाचा

‘नीज गोयकाराचा’(मूळ गोमंतकीयाचा) ‘न्हीज गोयकार’ (निद्रिस्त गोमंतकीय) होण्याच्या मार्गावर असताना, दैनिक गोमंतकचे संपादक महोदय राजू नायक यांनी मला गोव्यातील संस्कृती - कलाक्षेत्रावर लेख लिहिण्यास सांगणे यात त्यांचा काही खास हेतू असावा. गोव्यातील अस्तित्वात असलेल्या, नसलेल्या किंवा दारुण स्थितीत असलेल्या कला गोव्यात प्राचीन काळापासून चालत आलेल्या विविध संस्कृतींचा ठेवा असून त्यांच्या सूक्ष्म अभ्यासातून व गोमंतकीय जीवनशैली, रीतीरिवाज, धर्म, कायदे-कानून इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकून, कलेची ही परंपरा जपून आमच्या पुढील पिढ्यांचे जीवन समृद्ध होईल तर या लेखमालेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com