तेनसिंग रोद्गीगिश
समुद्राच्या वाळलेल्या फेसातून चित्पावन निर्माण करून त्यांना अमरत्वाचे वरदान दिल्यानंतर, परशुराम तिथून निघून गेले. पण चिपळूणच्या त्या वृद्ध ब्राह्मणाची पोथी त्यानंतर काय घडले तेदेखील सांगते. चित्पावन वाढले, ते कधीही मरण पावले नाहीत. परंतु, ते मानवजातीसाठी त्रासदायक बनले.
पक्ष्यांनी इंद्राला त्यांच्या अत्याचारांची आणि कामुकतेची जाणीव करून दिली. चित्पावन इतके उन्मत्त झाले होते की, ते अमरत्वाच्या वराविषयीही शंका घेऊ लागले. एके दिवशी त्यांपैकी एकाने मृत असल्याचे भासवले आणि त्याला सर्व विधींसह डोंगरावर परशुरामाच्या मंदिरात नेण्यात आले. परशुराम कोपला, त्याने आपले वरदान मागे घेतले. मृत्यूचे नाटक करणारा माणूस खरोखरच मृत झाला होता आणि चित्पावन आता अमर उरले नव्हते. (संदर्भ : क्रॉफोर्ड, १९०९: लेजेंड्स ऑफ द कोकण, ३०)
कथेचा हा भाग आपल्याला जवळजवळ काहीही मौल्यवान सांगत नाही, फक्त एक गोष्ट सांगते ती म्हणजे, त्यांना परशुरामांचा आशीर्वाद मिळाला होता, परंतु ते त्याच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. यामागे काही लोकपरंपरा असू शकते; परंतु सध्या आपल्याला ती काय आहे हे माहीत नाही. निश्चितच ही लोकपरंपरा आपल्याला चित्पावन आणि कोकणच्या इतिहासाची कल्पना देऊ शकते.
त्यांच्या उत्पत्तीच्या आणखी तीन कथा आहेत. एक म्हणजे वादळात किनाऱ्यावर टाकलेल्या काही अरब खलाशांच्या मृतदेहांना परशुरामाने पुन्हा जिवंत केले आणि त्यांना चितेतून पावन झालेले म्हणून चित्पावन म्हटले. (संदर्भ : क्रॉफोर्ड, १९०९: लेजेंड्स ऑफ द कोकण, २४) दुसरी कथा सह्याद्रिखंडातील परशुरामक्षेत्रोत्पतीची आहे.
देवकार्य व पितृकार्य करण्यासाठी ब्राह्मणाच्या शोधात असलेल्या परशुरामांना समुद्रकिनाऱ्यावर काही मच्छीमार दिसतात. परशुराम त्यांना ‘शुद्ध’ करतात आणि त्यांना चित्पावन बनवतात. (संदर्भ : सह्याद्रिखंड २.७.२८) तिसरी कथा ‘शतप्रश्नकल्पलतिका’मध्ये आहे. काही ‘म्लेंच्छ’ समुद्रप्रवासी एका ब्राह्मणाला कोकण किनाऱ्यावरून घेऊन गेले आणि त्याचा संबंध त्यांच्यातील महिलेशी आला व त्यातून सध्याचा चितपावन समुदाय निर्माण झाला. (संदर्भ : पाटील, २०१० : कॉन्फ्लिक्ट, आयडेन्टिटी अँड नॅरेटिव्हस् - द ब्राह्मण कम्युनिटिज ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम द सेव्हेन्टींथ थ्रू नाइन्टीन सेंच्युरीज, ११०).
‘म्लेंच्छ’ हा शब्द परदेशी किंवा रानटी लोकांसाठी वापरला जातो. इतर ग्रीक भाषांतही तो वापरला जात असे. जोशींच्या मते, ‘शतप्रश्नकल्पलतिका’नेच ब्राह्मणांच्या एका गटासाठी प्रथमच चित्पावन हा शब्द वापरला होता, ज्यांची ओळख त्यापूर्वी ‘कोकणस्थ’ अशीच होती. (संदर्भ : जोशी, २०१६: ग्रीक नाविक ते पेशवाई, ९)
चित्पावनांच्या उत्पत्तीबाबत चारही मूळ कथांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे महासागर. परिणामी चित्पावन उत्पत्तीला समुद्रापलीकडून झालेल्या परकीय आक्रमणांशी जोडणारी काही गृहीतके मांडण्यात आली आहेत. भारताचा पश्चिम किनारा आणि आफ्रिका, जवळ पूर्व आणि मेसोपोटेमिया यांच्यातील अगदी सुरुवातीच्या काळापासूनचे व्यापक व्यापारी संबंध पाहता, अशी शक्यता नाकारता येत नाही.
एका गृहीतकानुसार चित्पावन ग्रीक वंशाचे आहेत. स्वत: चित्पावन असणारे पी. व्ही. जोशीही याला मान्यता देतात. (संदर्भ : जोशी, २०१६: ग्रीक नाविक ते पेशवाई, ९). पहिले म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील आणि उत्तर आफ्रिकेतील, लाल समुद्राच्या सीमेवरील देश आणि एडनच्या आखातातील देशांमधील भरभराटीचा व्यापार.
इजिप्तमध्ये ग्रीक वास्तव्याची नोंद किमान ७व्या शतकापासून आहे. ईसापूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडरने इजिप्त जिंकले आणि अलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली. इजिप्त आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यामधील व्यापारात ग्रीक लोक प्रमुख होते. प्रामुख्याने जहाज बांधणारे, मालक आणि खलाशी म्हणून. या व्यापारासाठी एडन आणि नंतर येमेनजवळील सोकोत्रा ही प्रमुख बंदरे होती. अरबांनी इजिप्त जिंकल्यानंतर, इ.स. ७व्या शतकात, इजिप्तमधून ग्रीक लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्यांपैकी बरेच जण सोकोत्रा बेटावर गेले, कारण ते इजिप्तच्या अरब शासकांच्या अखत्यारित नव्हते आणि ते स्थान त्यांच्या व्यापारासाठी योग्य होते.
जोशी यांच्या मते, यापैकी काही नंतर सुपीक जमिनीच्या शोधात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले; सोकोत्रा येथून थेट समुद्रापलीकडे, विशेषतः दापोली/मुरुडच्या आसपासच्या परिसरात. त्यांच्या विद्यमान व्यापार संबंधांमुळे हे सोपे झाले. स्थलांतर ७व्या शतकाच्या आसपास झाले असावे. जोशींच्या मते हाच कालावधी चित्पावनांच्या उत्पत्तीचा आहे. हे गृहीतक चित्पावनच्या बहुतेक मूळ कथेशी जुळते. हे मिथक इतिहासावर आधारित आहेत की ही गृहीतक आख्यायिकांशी जुळते हे सांगणे कठीण आहे. तथापि, हे गृहीतक केवळ चित्पावनच्या ग्रीक उत्पत्तीची शक्यता व्यक्त करते; संबंध सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही.
जोशींच्या गृहीतकाचा एक पूर्वीचा भाग मनोरंजक आहे, जी ग्रीक लोकांच्या सोकोत्रा ते कोकण येथे स्थलांतराची प्रस्तावना आहे. जोशींच्या मते, या व्यापारामुळे अनेक सारस्वत सोकोत्रा बेटावर स्थलांतरित झाले आणि ग्रीक लोकांमध्ये मिसळले. जोशींच्या मते, हे त्यांचे वंशज आहेत, जे ७व्या शतकात कोकण येथे परत स्थलांतरित झाले. (संदर्भ : जोशी, २०१६: ग्रीक नाविक ते पेशवाई, २४).
पहिल्या शतकाच्या सुरुवातीला सोकोत्रामध्ये भारतीयांची लक्षणीय लोकसंख्या होती, हे ‘द पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’द्वारे सिद्ध होते. मजकुरानुसार सोकोत्राचे रहिवासी ‘अरब, भारतीय आणि ग्रीक यांचे मिश्रण’ होते आणि ‘कधीकधी इजिप्तचे अरब आणि आफ्रिकेतील लोक यांना भारतातील व्यापारी कच्छमधून येऊन भेटत’. (संदर्भ : शॉफ, १९१२: द पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी, १३५).
पेरिप्लस सोकोत्र या शब्दाचा अर्थ ‘सुखदायी द्वीप’ असा होतो. सोकोत्रामध्ये भारतीयांची उपस्थिती खूप जुनी असल्याचे दिसते. ईसापूर्व ३३०मध्ये अलेक्झांडरने ‘जगातील सर्वोत्तम कोरफड मिळवण्यासाठी’ सोकोत्राच्या मोहिमेदरम्यान तेथील स्थायिक भारतीयांशी संघर्ष केला.
कोकणी सारस्वतांनी कधीही मोठ्या प्रमाणात परदेशात व्यापार केल्याचे ज्ञात नाही. म्हणून जोशी ज्यांना सारस्वत म्हणतात ते बहुधा तेच होते ज्यांना आपण काठियावाडी चाड्डी म्हणतो. त्यांचा परदेशी व्यापाराचा मोठा इतिहास आहे. पेरिप्लसने सोकोत्रातील भारतीय व्यापाऱ्यांचे वर्णनदेखील त्यांच्याशी जुळते. सोकोत्रातील इंडो-ग्रीक व्यापाऱ्यांचे जोशींनी दिलेले वर्णन आपण पूर्वीच्या लेखांत उल्लेखिलेल्या ‘नौवित्तक’ (खूप श्रीमंत जहाज मालक, व्यापारी) असलेल्या श्रेष्ठींशीही चांगले जुळते.
या सर्व गोष्टींवरून अशी शक्यता निर्माण होते की चित्पावन हे खरोखरच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील जहाज मालक, व्यापारी होते जे सोकोत्रामध्ये स्थायिक झाले आणि ग्रीक लोकांमध्ये मिसळले. अखेर ७व्या शतकात कोकण येथे परत स्थलांतरित झाले. पण, हे गृहीतक आहे; त्याला सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.