Chandranath Hill Goa History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Chandranath Hill Goa History: हिमालयापेक्षाही प्राचीन; गोव्यातील 'चंद्रनाथ पर्वता'चा विस्मयकारक इतिहास आणि चंद्रेश्वराचा वारसा!

Chandranath Hill Goa: सासष्टी, केपे आणि सांगे अशा तीन तालुक्यांच्या सीमा जेथे एकमेकांना भिडतात तेथे चंद्रनाथ पर्वत हिमालयाचा जन्म होण्यापूर्वीपासून अखंडपणे उभा आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Ancient hills of Goa : सासष्टी, केपे आणि सांगे अशा तीन तालुक्यांच्या सीमा जेथे एकमेकांना भिडतात तेथे चंद्रनाथ पर्वत हिमालयाचा जन्म होण्यापूर्वीपासून अखंडपणे उभा आहे. अवकाशातून कोसळलेल्या उल्केतून निर्माण झालेल्या सोमकांत शिळेचे पूजन कालांतराने चंद्रेश्वर म्हणून करण्यात आले. चंद्रेश्वर आणि भूतनाथ दैवतांच्या नावाने इथे तीर्थक्षेत्र उदयाला आले. आज या परिसरातल्या २२ गावांचा अधिपती म्हणून परिचित असलेल्या या चंद्रेश्वर देवाचे आशीर्वचन धारण करून या भूमीत तेजस्वी इतिहासाचा वारसा सांगणारी राजघराणी नावारूपाला आली.

प्राचीन काळात गोवा कदंबांच्या राजवटीपूर्वी दक्षिण गोव्यातल्या चांदोर येथे भोजांनी चंद्रपूर या राजधानीची जी स्थापना केली, त्यामागे ही चंद्रेश्वराची प्रेरणा कारणीभूत होती. आसपास दोन हजार वर्षांच्या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या चंद्रपूर या सभोवताली तटबंदी लाभलेल्या कुशावती नदी किनाऱ्यावरच्या या राजधानीच्या शहराची प्रेरणाशक्ती चंद्रनाथ पर्वतावरचा चंद्रेश्वर देव होता.

चंद्रपूरच्या उत्खननात महाकाय भग्न नंदी आणि त्याठिकाणी मंदिराचे अवशेष, कौले, विटा आढळलेल्या आहेत. या मंदिरापासून काही अंतरावरती तलाव होता. गोव्यात भोजवंशीय राजापासून सावंतवाडकर राजवटीपर्यंत जी ठिकठिकाणी शिवालये आढळलेली आहेत, तेथे लोकांनी पाण्याच्या उपलब्धतेसाठी तलाव खोदून, त्यांचे बांधकाम या परिसरात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या जांभ्या दगडांचा कल्पकतेने उपयोग करून केल्याचे स्पष्ट झालेले आहे.

जुवारीच्या बारमाही वाहणाऱ्या कुशावती तिरी वसलेल्या चंद्रपूर शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्याची प्रचिती या प्राचीन काळी राजधानी असलेल्या शहरावरती राज्य करणाऱ्या राज्यकर्ते आणि त्यांच्या प्रजेत असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांतून उमजते.

गोव्यातल्या समाजांनी पूर्वीच्या काळी नद्या आणि जेथे जेथे जलाशयांचे अस्तित्व आहे तेथे तेथे आपली गावे वसवलेली आहेत. सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी गोव्यातली जी गावे आहेत तेथील लोकमानसाला मान्सूनचा पाऊस चार महिने मुसळधार कोसळून हिवाळ्यानंतर पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत होते. पाण्याचा शोध घेत दाही दिशांना भटकंती करावी लागत असे.

मान्सूनच्या पावसात कोसळलेले हे पाणी नदीनाल्यांतून खळाळत अरबी सागरात जाताना त्यांनी पाहिले होते. जेथे वृक्षवेलींनी समृद्ध जंगले तेथे पाणी जमिनीत मुरते. जमिनीत मुरलेले हे पाणी झऱ्यांद्वारे बारमाही वाहत, वाहत आपली तृष्णा भागवत असते. हे पाणी पुढे वर्षभर टिकवण्यासाठी त्यांनी गावोगावी तलावांचे सामूहिकरीत्या शक्तीद्वारे खोदकाम केले आणि हे पाणी चवदार राहावे यासाठी त्यांनी जांभ्या पठारावरचे चिरे आणून, अत्यंत कल्पकतेने अशा जलाशयांचे बांधकाम केले. या तलावातल्या पाण्यात लोकांनी केरकचरा टाकू नये, घाण करू नये, त्याचे पावित्र्य, शुद्धता टिकावी म्हणून नियम तयार करून त्यांची अंमलबजावणी केली होती.

मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी तलावांतल्या साठलेल्या गाळ, चिखल आणि अन्य घटकांचा उपसा व्हावा, तलावाच्या बांधकामाची डागडुजी व्हावी म्हणून आराध्य दैवताची स्थापना त्यांनी तलावाभोवताली केली होती. एके काळी सुजलाम् आणि सुफलाम् असलेला सासष्टीला चांदोर गावात कुशावती वाहते. चांदोरपासून काही अंतरावरती चंद्रनाथ पर्वत आहे. या पर्वतावरती असलेल्या वृक्षवेलींचे रक्षण व्हावे, डोंगराच्या अस्तित्वाला बाधा येऊ नये, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रक्रियेला बाधा येऊ नये म्हणून इथल्या समाजांनी चंद्रेश्वर-भूतनाथाची स्थापना उल्कापात होऊन सोमकांत शिला म्हणून नावारूपास आलेल्या परिसरात केली होती.

संपूर्ण परिसरच गिरीशाचे रूप म्हणून पाहिला जात असल्याने जंगल तोडीस कोणी धजत नसे. त्यामुळे कुशावती नदी तुडुंब पाण्याने भरून वाहत असे. गावांतल्या तलावांना बारमाही पाणी उपलब्ध असायचे. गोवा कदंब राजवटीत जेव्हा भाजलेल्या विटांपासून घरांचे बांधकाम करण्याला चालना मिळाली आणि त्यामुळे चंद्रनाथ आणि परिसरातल्या जंगलात वृक्षतोड सुरू झाली. पावसाळ्यात जंगलतोड झाल्याने जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत वाढ झाली आणि कुशावती गाळाने भरून तिच्यातल्या नैसर्गिक जलमार्गात अडथळे निर्माण झाले. होड्या, गलबते चंद्रपूर राजधानीत येणे मुश्कील झाले आणि त्यामुळे गोवा कदंब राजकर्त्यांना आपली राजधानी तिसवाडी गोपकपट्टण म्हणजे आजच्या गोवा वेल्हा येथील जुवारी नदीकिनारी करावी लागली. भरभराटीला

आलेली राजधानी विस्मृतीत गेली. धर्मांधांनी महाकाय नंदी आणि प्राचीन मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्याच्याशी निगडीत असलेला तलाव राजधानीच्या शहराच्या विध्वंसाबरोबर कालांतराने विस्मृतीत गेला. गोव्यातला सगळ्यात महाकाय नंदी ज्या चंद्रपूर राजधानीत सापडलेला आहे, तेथील शिव मंदीर हे निश्चित या शहराच्या स्थापत्यकलेच्या वैविध्यपूर्ण संचितांची प्रचिती देणारे असेच असले पाहिजे. आज हे शिवालय जेथे अस्तित्वात होते, त्याच परिसरात आढळलेला महाकाय नंदी इथल्या मंदिराच्या गतवैभवाची कल्पना देत आहे.

पूर्वीच्या काळी मशाली पेटवून मंदिरासमोरील एकाच जागी दरवर्षी वाद्ये वाजवून, नृत्य, गायन सादरीकरण व्हायचे. त्यातून कालांतराने महाभारत, रामायणातील कथासूत्रावरती नाट्याभिनय करण्याची परंपरा निर्माण झाली असावी आणि त्यातून काला जन्माला आला असावा. घुमट, शमेळ, कासाळे झांज आदी वाद्यांच्या साथसंगतीतून निर्माण झालेल्या संगीताच्या पार्श्वभूमीवरती हे सादरीकरण होऊ लागल्यावर त्यात अधिक रंगत निर्माण झाली.

पोर्तुगीज येण्याअगोदर कुडाळ ते कारवार इथपर्यंत प्रदेश अशा कालोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून एकासूत्रात बांधला गेला. काला करणाऱ्या लोककलाकारांच्या समुदायाला ‘मेळे’ ही संज्ञा प्राप्त झाली. असो मेळे ठिकठिकाणी जाऊन कालोत्सव सादर करू लागले. सांगे, धारबांदोडा, केपे आणि सासष्टी या तालुक्यांच्या सीमेवर असलेला पर्वत चंद्रेश्वर-भूतनाथ देवस्थानासाठी शेकडो वर्षांपासून नावारूपास आला होता. या चंद्रनाथ पर्वतावरती १७६८साली जेव्हा महारथ त्यावेळी तेथे दशावतारी काल्याचे सादरीकरण करण्यात आले, असा उल्लेख आढळतो.

चंद्रनाथ पर्वतावर एकेकाळी जे चंद्रेश्वराचे मंदिर बांधण्यात आले होते, त्याचे गर्भगृह निर्माण करताना अशाप्रकारे रचना केली होती, की दर पौर्णिमेला चंद्राची किरणे बरोबर तिथल्या शिवलिंगावर पडायची आणि त्यामुळे तेथून पाणी पाझरायचे. पौर्णिमेच्या चंद्राची किरणे शिवलिंगावर पडत असल्याने, हा देव चंद्रेश्वर म्हणून लोकमान्य ठरला. गोव्यातील आदिवासी आणि जंगल निवासी त्याचप्रमाणे कृषी व्यवसायांशी निगडीत जातीजमातींनी चंद्रेश्वराला आपल्या कुलदैवताचे स्थान दिले होते. त्याच्याच कृपाशीर्वादाने नृत्य, नाट्य, गायन, वादन, भजन आदी कलांशी संबंधित कष्टकरी समाजही नावारूपाला आला. या समस्त समाजांचा प्रणेता चंद्रेश्वर म्हणजे कल्याणकारी परम तत्त्वाचे निसर्गातले रूपच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Social Media Ban: "आता बस्स झालं!" गोव्यात लवकरच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? मंत्री खंवटे घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

Viral Video: अंधश्रद्धेचा आधार अन् फिल्मी ड्रामा; बेडवर सापाची कात सोडून गायब झालेल्या 'त्या' तरुणीचा इन्स्टावर खुलासा, म्हणाली, "नागीण बनली..."

Dabolim Airport: "दाबोळी विमानतळ बंद होणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावून सांगत विरोधकांची केली बोलती बंद

AUS vs ZIM: क्रिकेटचा नवा 'जायंट किलर'! झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवले; विश्वचषकात मोठा उलटफेर VIDEO

व्यापारी करारांचा मास्टरस्ट्रोक! मंदीच्या अंधारात भारत 'तारा' बनून चमकणार; फिच रेटिंग्सनं दिला भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा कौल

SCROLL FOR NEXT