अॅड. सूरज मळीक
दरवर्षी हजारोंच्या संख्येत फुलपाखरे गोव्यात का स्थलांतरित होतात? गोव्याचे रमणीय दृश्य जगभरातील पर्यटकांना ओढ लावत असते त्याचप्रमाणे इथली पोषक वनसंपदा फुलपाखरांना आकर्षित करत असते. फुलपाखरांचे पंख नाजूक असतात खरे, पण त्यांची इच्छाशक्ती अमर्याद असते. त्यामुळे मुसळधार पावसाने गोव्याचा निरोप घेतल्यावर हजारो किलोमीटर अंतरावरून ही फुलपाखरे गोव्यातील पश्चिम घाटाच्या डोंगरात येऊन स्थायिक होतात.
मान्सूनचा पाऊस सुरू झाला की गोव्यातील निळा वाघ, गडद निळा वाघ ही फुलपाखरे पूर्व किनारी मैदानाच्या दिशेने जातात. सुरुवातीला मैसुर, नंतर कृष्णागिरी व इतर ठिकाणावर प्रवेश करतात. तिथे जाऊन ती आपले जीवनचक्र पूर्ण करतात. पूर्व किनारी मैदानावरील फुलपाखरांची सुरवंटे जेव्हा वनस्पतीची पाने खाऊन संपवतात तेव्हा पुढच्या पिढीला खाण्यासाठी मुबलक अन्न वनस्पती उपलब्ध नसतात.
त्यामुळे ती गोव्यातील पर्वतरांगेत स्थलांतरित होतात. तोपर्यंत मान्सूनच्या पावसाने त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक वनस्पतींची भरभराट केलेली असते. हे झाले फुलपाखरांचे स्थलांतर. प्रतिकूल परिस्थितीतून बचाव करण्यासाठी फुलपाखरे अजून एक प्रक्रिया पार पाडतात ती म्हणजे ‘डायपॉज’.
सामान्य भाषेत त्याला निद्रावस्था असे म्हणतात. काही फुलपाखरे सुरवंट, कोष किंवा प्रौढ फुलपाखराच्या स्थितीत आपली जीवन प्रक्रिया थांबवते. जेव्हा पोषक हवामान उपलब्ध होते तेव्हा ती या निद्रावस्थेतून बाहेर पडतात. हिमालय, युरोप व इतर थंड ठिकाणावरील हवामान अतिशय प्रतिकूल असते त्यामुळे फुलपाखरे ‘डायपॉज’ या स्थितीत जातात. दक्षिण भारतामध्ये हवामान फक्त काही दिवसांसाठीच प्रतिकूल असल्यामुळे स्थलांतरित होणेच योग्य ठरते.
परंतु गोव्यातील वाघेरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या केरी गावात तीन फुलपाखरांनी अनेक अभ्यासकांच्या मनात प्रश्न उत्पन्न केलेले आहेत. तीन फुलपाखरे पटकोळणी रोपाच्या पानाखाली बसलेली आहेत. आज तीन महिने ओलांडले तरी ही फुलपाखरे तशीच आहेत. हालत नाही, डुलत नाहीत, त्यांना कुणाची पर्वाच नाही.
जगाचे भान हरपून ती इतकी गाढ झोपी कशी गेली? खाणे पिणे बंद, दिवस रात्र एकाच जागी बसून तप करण्याचा हा कसला प्रकार? माणसाला एक दिवस अन्न मिळाले नाही तर तो संतापतो. फुलपाखराचा एकंदर जीवनकाळ एक आठवडा ते एक महिना इतका असतो. ही फुलपाखरे तर तीन महिने तग धरून जिवंत आहेत.
या तीनही मादी फुलपाखरे असून ती एकाच जागी बसलेली आहेत. एखादे फुलपाखरू उडून गेले तरी ते पुन्हा त्याच जागी परत येते. फुलपाखराच्या सुरवंटाला मुबलक खाद्य मिळाले नाही म्हणून ती दुर्बल झालेली आहेत का जागतिक पर्यावरण बदलाचे हे प्रतिबिंब आहे, हे सांगणे कठीण. परंतु तिथे एक फुलपाखरू आकारानेच अगदी लहान जन्माला आलेले आहे ही अचंबित करण्यासारखी बाब आहे. निसर्ग अभ्यासकांच्या मनात हे कोडेच राहिलेले आहे.
घोटेलीतील लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका पौर्णिमा केरकर यांच्या लहानशा बागेत ही फुलपाखरे आढळली आहेत. येथे एक चिनी पटकोळणीच्या झुडपात त्यांनी आसरा घेतलेला आहे. ही फुलपाखरे रंग आणि आकारामध्ये कॉमन क्रो फुलपाखराशी साधर्म्य दर्शवीत असून ती सर्वत्र आढळतात. या फुलपाखराचे नाव ग्रेट एग फ्लाय असे आहे. एखाद्या बागेत फुलपाखराने जन्म घेणे म्हणजे बागेच्या समृद्धतेचा हा नमुना आहे. याच्यापेक्षा सुंदर आनंद अजून काय असू शकतो.
ही बातमी जेव्हा नामांकित शास्त्रज्ञ कृष्णमेघ कुंटे यांच्याकडे पोहोचली तेव्हा ते म्हणाले ही फुलपाखरे अंशतः निद्रावस्था (पारशियल डायपॉज) या स्थितीत गेली आहेत. थंडी आणि काही गरमीच्या महिन्यात ती या प्रक्रियेत जातात. बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसाइटीशी संलग्न संशोधक आयजॅक केहिमकर म्हणाले फुलपाखराच्या वर्तनासंदर्भात आजपर्यंत अशी नोंद झालेली नाही. कॉमन क्रो, ब्लू टायगर यासारखी मिल्कवीड प्रजातीतील फुलपाखरे अशा वर्णनासाठी ख्यात आहेत.
हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात ती एकत्र बसतात. आजच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या मादी फुलपाखराने आपल्या पुनरुज्जीवन प्रक्रियेस विलंब केलेला आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यावर ही फुलपाखरे जागी होणार आणि विशिष्ट वनस्पती शोधून त्यावर अंडी लावणार. ही फुलपाखरे असंख्य वनस्पतीवर अंडी लावतात त्यामुळे जगातील विविध भागात त्याचे दर्शन घडते. गोव्यामध्ये भुईघोळ व जास्वंद ही ग्रेट एग फ्लाय या फुलपाखराची अन्न वनस्पती आहे.
आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि न्यूझीलंडमधील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये या फुलपाखराचा नैसर्गिक अधिवास आहे. हे फुलपाखरू काळसर तपकिरी रंगाचे असते. नर आणि मादी फुलपाखरांमध्ये बराच फरक असतो. दोन्ही फुलपाखरांच्या पंखांच्या कडेला विशिष्ट पांढरा पट्टा असतो.
नर फुलपाखराच्या वरच्या पंखावर प्रत्येकी दोन पांढरे ठिपके असतात तर खालच्या पंखावर प्रत्येकी एक मोठा गोलाकार चंद्रासारखा पांढरा ठिपका असतो. उन्हात उडताना सूर्याच्या प्रकाशात हे ठिपके निळ्या रंगाने चमकतात. पांढऱ्या ठिपक्यांभोवती निळ्या रंगाचे खवले असतात जे सूर्यकिरणांमध्ये निळा रंग उत्सर्जित करतात. त्यामुळेच मराठीत या फुलपाखराला ‘मोठा चांदवा’ असे म्हणतात. न्यूझीलंडमधे त्याला ‘ब्लू मून बटरफ्लाय’ असे म्हणतात. परंतु मादी फुलपाखरांच्या पंखावर असे ठिपके नसतात. तरी त्याच्या तपकिरी पंखावर हलका निळा रंग असतो जो फक्त उन्हातच उजळून दिसतो.
भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांमधील क. ५१ (ज) सांगते की भारतातील प्रत्येक नागरिकाने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास केला पाहिजे. एखादे झाड फक्त माणसाला प्राणवायू देत नसते तर ते फुलपाखरासारख्या निसर्गातील अत्यावश्यक जिवाला जन्म देते, ऊन-पावसापासून त्यांचे रक्षण करते, भक्षकांपासून त्यांना संरक्षण देते. प्रत्येक झाड म्हणजे फुलपाखरे व इतर जीवसृष्टीचे नैसर्गिक घर आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाची काय भूमिका असते याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे.
शिशिर ऋतूच्या पुनरागमे एकेक पान गळावया
का लागता मज येतसे न कळे उगाच रडावया
पानात जी निजली इथे इवली सुकोमल पाखरे
जातील सांग आता कुठे? निष्पर्ण झाडीत कापरे!
बा. सी. मर्ढेकरांनी या कवितेतून पक्षी, फुलपाखरे यांची व्यथा सांगितलेली आहे. कवी विचारतात की कुठे जात असतील ही फुलपाखरे जेव्हा सुरवंटांना खाण्यासाठी उपलब्ध असलेली पाने नाहीशी होतात?
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या केरी गावात वाळवंटी आणि कळटी अशा दोन नद्या वाहतात. विविध ठिकाणी पाण्याचे स्रोत असल्यामुळे या भागात विविध फुलपाखरांचे दर्शन होत असते. आज पटकळणीच्या एका लहानशा झुडपाने ग्रेट एग फ्लाय या फुलपाखरांना मायेचा सहारा दिलेला आहे. फुलपाखरांना जेव्हा अनुकूल हवामान लाभत नाही तेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक व स्वाभाविक बदल होतो. उन्हाळ्यात चॉकलेट पेन्सी फुलपाखराचा रंग फिका पडतो आणि पंख तुटलेल्या स्थितीत असतात, तर पावसाळ्यात ती गडद रंग धारण करून उत्स्फूर्तपणे विहार करतात.
काही फुलपाखरे विशिष्ट वेळेतच उडताना दिसतात. एकंदर सकाळचे दहा वाजल्यानंतर फुलपाखरे सक्रिय होतात तर कॉमन इव्हिनिंग ब्राउन ही फुलपाखरे फक्त सकाळ आणि संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसतात. त्यांचे जीवन विविध वृक्ष वनस्पतीच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. फुलपाखरे पर्यावरण संवेदनशील असतात. भरपूर तापमान वाढ, कडाक्याची थंडी किंवा वातावरणातील अनियमित बदल फुलपाखरांच्या जगण्याला असह्य करतात. त्यामुळे त्यांना संघर्षमय जीवन व्यतीत करत स्थलांतरण किंवा निद्रा अवस्थेत जाण्यासारखी कठीण उपाययोजना बहुधा आखावी लागते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.