चोर्ला घाटमाथ्यावर कारवी बहरते, 'नीलपरी'चे दर्शन घडते; महाराष्ट्राने राज्य फुलपाखरू घोषित केलेली देशातील तिसरी 'मोठी' प्रजाती

Neelpari butterfly: नीलपरी हे जंगल क्षेत्रात आढळणारे फुलपाखरू असले तरी पावसाळ्यात ते संपूर्ण गोव्यात आढळते. नीलपरीला चार मोकळे पंख असतात.
Neelpari butterfly Goa
Neelpari butterfly in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

गोव्यातील जंगलसमृद्ध भागात नैसर्गिक अधिवास लाभलेले नीलपरी हे फुलपाखरू भारतातील सर्वांत मोठ्या फुलपाखरांच्या गणनेत तिसऱ्या क्रमांकावर येते. सर्वांत मोठे फुलपाखरू म्हणून नावलौकिक मिळवलेले हिमालयातील ‘गोल्डन बर्ड विंग’ या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार १९.४ सेंटिमीटर इतका असतो. तर दुसऱ्या क्रमांकावरील फुलपाखरू म्हणजे कर्नाटकातील ‘सदर्न बर्डविंग’चा पंखविस्तार १९ सेंटिमीटर इतका असतो. त्यानंतर येणाऱ्या नीलपरीच्या पंखांचा विस्तार १५ सेंटिमीटर इतका असतो.

गोव्यातील काही फुलपाखरे त्यांच्या वेधक रंग आणि आकारामुळे आपल्या परिचयाची असतात. नीलपरी हे जंगल क्षेत्रात आढळणारे फुलपाखरू असले तरी पावसाळ्यात ते संपूर्ण गोव्यात आढळते. नीलपरीला चार मोकळे पंख असतात. हे पंख काळ्या रंगाचे असून त्यावर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. खालच्या पंखावरील पांढऱ्या पट्ट्यावर काळे ठिपके असतात. अशा तर्‍हेने हे एक काळे पांढरे फुलपाखरू असल्याचा आभास होतो. परंतु त्याच्या पंखावर हलका आकाशी निळा रंग दडलेला असतो.

संध्याकाळच्या सूर्यकिरणांनी नदीचे पाणी जसे चमकणारा थर घेऊन वाहते तसे या फुलपाखराच्या पंखांवर असलेले नाजूक खवले सूर्याच्या प्रकाशात निळा रंग दर्शवतात. त्यामुळे सावलीमध्ये पांढरा दिसणारा भाग उन्हात निळ्या रंगाने चमकतो. काही फुलपाखरांच्या पंखांच्या आतील भागास, पंख शरीराला जोडलेल्या ठिकाणी लाल रंग असतो.

त्यामुळे या फुलपाखराला विशेषत चार रंग असतात. काळा, पांढरा, निळा आणि लाल, अशा संथ रंगामुळे आणि त्याच्या मोठ्या आकारामुळे ते लगेच आपल्या दृष्टीस पडते. त्यामुळेच पाण्यासारखे तरल पंख असणाऱ्या या फुलपाखराला नीलपरी असे म्हटलेले आहे.

नीलपरी हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. याचे शास्त्रीय नाव ‘पपीलीवो पोलीम्नसटर’ असे आहे. भारतात फुलपाखरांचे संवर्धन व त्यांच्याविषयी जागृती व्हावी यासाठी पावले उचलून राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील सर्वांत पहिले राज्य म्हणजे महाराष्ट्र. २२ जून २०१५ रोजी या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे.

फुलपाखराच्या जीवनचक्राचा अभ्यास करून आपल्या राज्याची ओळख म्हणून महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने नीलपरी या फुलपाखराची निवड करून त्याला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रामध्ये त्याला ‘राणी पाकोळी’सुद्धा म्हणतात. भारतासह म्यानमार आणि श्रीलंकेत या फुलपाखराचा नैसर्गिक अधिवास आहे. भारतभर आजवर सिक्कीम, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू या भागांत नीलपरीचे दर्शन घडते.

साइट्रस कुळातील वृक्ष वनस्पतींच्या पानांमध्ये आढळणारा सायट्रिक अम्ल हा नील परीच्या सुरवंटासाठी आवश्यक घटक असतो. ही वनस्पती नीलपरी या फुलपाखराची जीवनवनस्पती आहे. या कुळामध्ये येणारी झाडे घनदाट जंगलात आढळत असली तरी आपल्या सभोवताली लिंबू, कडुनिंब, संत्रे यांसारख्या झाडांची लागवड केल्यामुळे हे फुलपाखरू जंगल क्षेत्र, ग्रामीण भाग आणि शहरातसुद्धा आढळते.

कोणतेही झाड साइट्रस कुळामध्ये येते हे पाहायचे असेल तर पान सूर्याच्या किरणांशी ठेवून त्यात जर पांढरे ठिपके दिसले तर समजायचे की ती या कुळातील वनस्पती आहे. नीलपरीला राज्य फुलपाखरू म्हणून निवडण्यात आले, पण अभ्यासकांनी त्याची दुसरी बाजू उजेडात आणली आहे. ती म्हणजे हे फुलपाखरू लिंबू व संत्रावर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते.

या फुलपाखराचा उपद्रव वाढल्यास संत्रा, लिंबू यासारख्या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. फुलपाखरांचे अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर यांच्या मतानुसार संत्र्याच्या किडीच्या यादीत शेकडो कीटकांचा समावेश असून त्यात फक्त ‘लाईम बटरफ्लाय’ या एकाच फुलपाखराचा समावेश आहे. मात्र, या फुलपाखराची सुरवंट फक्त कोवळी पानेच खातात आणि त्याला ‘मायनर पेस्ट’ म्हणून गणले जाते. शेतकरीही याला शत्रू समजत नाहीत.

नीलपरी आपल्या ताकदवान शरीरामुळे सहज आणि वेगाने उडताना दिसते. फुलातून रस पितानासुद्धा ते आपले पंख वेगाने हलवत असते. समईचे फूल आणि पटकळ ही पुष्प वनस्पती नीलपरीची आवडती. समईचे फूल जणू असंख्य, नाजूक, लाल फुलांची दीपमाळच. या फुलाला गोव्यात ‘तुरा’ असेही म्हणतात. ही एक नैसर्गिकरीत्या उगवणारी पुष्प वनस्पती असून पावसाळ्यात भरपूर प्रमाणात उगवते.

हा लाल भडक रंग सर्वसाधारणपणे सदर्न बर्डविंग, मलाबार बॅडेड पिकॉक, कॉमन मॉरमन, यांसारख्या मोठ्या फुलपाखरांना जास्त आकर्षित करतो. नीलपरी या फुलातील रस पिण्यासाठी हमखास येतात. हे एक मोठे फुलपाखरू असल्यामुळे आपल्या लांब नळीसारख्या तोंडाने ते या लांब देठ असलेल्या फुलांतून रस पिऊ शकते. उडत उडत जोराने पंख हलवत फुलातून रस पिणे तिला आवडते. जास्त वेळ एका जागेवर न थांबता, सगळ्याच फुलातील रस चाखण्याचा ती आनंद घेते. कधी कधी आपले पंख सरळ उघडे ठेवून झाडाच्या पानावर, नदी काठावर, दगडाच्या गुंफेत विश्राम करताना दिसतात. रात्रीच्या वेळी ती झोपलेल्या अवस्थेत सापडतात. त्यांना डोळ्याच्या पापण्या नसतात त्यामुळे आपले डोळे बंद कसे करत असतील, हा प्रश्नच आहे.

पावसाळ्यात जर या फुलपाखराचे जीवनचक्र अनुभवायचे असेल तर लिंबोणीच्या झाडाची पाने न्याहाळ्यावीत. पानांवर किंवा खोडावर सुरवंट आढळू शकतात. पानाच्या खालच्या बाजूला अंडी आढळू शकतात. फुलपाखराचा कोशसुद्धा याच झाडावर सापडतो. मादी फुलपाखरू झाडाभोवती फिरत फिरत, पानांची चाचणी करत, एका एका पानावर थांबून पानाच्या खालच्या बाजूला अंडी लावते.

अंडी अगदी लहान व गोलाकार असतात. अंड्यातून बाहेर पडलेली सुरवंट पानावर थांबून पाने खायला सुरुवात करतात. एखाद्या पक्षाची विष्ठा असेल असे तिचे रूप असते. त्यामुळे त्याला खाऊन जागणाऱ्या भक्ष्यकांच्या नजरेत सुरवंट येत नाही. सुरवंट जशी मोठी होत जाते तशी ती बाहेरची कात सोडते. जेव्हा ती पूर्ण मोठी होते तेव्हा तिचे रंगरूप माणसाला अचंबित करण्यासारखेच असते.

हिरव्या रंगाची सुरवंट हुबेहूब एखाद्या सापासारखा वेश धारण करते. तिच्या डोक्यावरती सापासारखे दोन डोळे दर्शविलेले असतात. ते खोटे असले तरी भयानक वाटतात. सापाला जशी जीभ असते तशी जीभही या सुरवंटाला असते. जर कुणी भक्षक तिच्याजवळ गेला तर ती चटकन जीभ बाहेर काढते. स्वतःच्या रक्षणासाठी फुलपाखरांच्या नक्कल करण्याची चाल पाहून थक्कच व्हायला होते. नीलपरी या फुलपाखराचे जीवनचक्र म्हणजे निसर्गाचा चमत्कारच.

गोव्यातील विविध सण उत्सवात उपयोगी पडणारी शेरवाडाची पाने आणि केशरी फुले गोळा करण्यासाठी निघालेल्या लोकांना या फुलपाखराचे दर्शन घडते. श्रावण महिन्यात नागपंचमी आणि आदित्यपूजनात विशेष महत्त्व लाभलेली शेरवाडाची फुले या फुलपाखराला आकर्षित करतात.

Neelpari butterfly Goa
Goa Tourism: फुलपाखरांच्या दुनियेत जायचं आहे? तर मग गोव्यातील या बटरफ्लाय बीचला नक्की भेट द्या

फांदीच्या टोकाला पांढऱ्या पानाच्या मधोमध फुललेल्या या केशरी पुष्पवनस्पतीला ‘भूतकेस’सुद्धा म्हणतात. नीलपरी जसे वेगवेगळ्या फुलांवरती जाऊन आपले खाद्य मिळवते तसे आपल्या जीवनक्रियेसाठी उपयुक्त असलेली सत्त्वे मिळवण्यासाठी त्याला जमिनीवर उतरावे लागते. विशेषत नर फुलपाखरे पाणथळ जागेवरील ओल्या मातीवर समूहाने बसलेली दृष्टीस पडतात. मातीतून मिळवलेले मीठ व इतर पोषक घटक त्याच्या पचनक्रिया आणि प्रजननासाठी आवश्यक असतात.

ही क्रिया पार पाडतानासुद्धा ही फुलपाखरे पंख हलवत असतात. गोव्यातील चोर्ला घाटमाथ्यावर सात वर्षांतून एकदा फुलणारी निळी जांभळी कारवी बहरते. हा पुष्पोत्सव विविध फुलपाखरांना भरपूर प्रमाणात मध उपलब्ध करून त्यांना जगण्यासाठी सक्रिय करतो. अशा मौसमात मध लुटण्यासाठी आलेल्या नीलपरीचे दर्शन हमखास घडते.

Neelpari butterfly Goa
निसर्गाची अनमोल देणगी; पश्चिम घाटात आढळणारे गोव्याचे राज्य फुलपाखरू 'मलाबार वृक्ष परी'

उष्णतेच्या दिवसांत नदी, झरे, तळे असे नैसर्गिक पाण्याचे स्रोत त्यांच्या जगण्याला पोषक असा अधिवास उपलब्ध करतात. त्यामुळे सत्तरीतील सोनाळ भागातील म्हादई नदीचे पात्र, धारबांदोड्यातील रगाडो नदी, गोव्यातील घाट मार्ग व राखीव जंगल क्षेत्रात प्रवेश केला तर ही फुलपाखरे मातीवर बसलेली पाहायला मिळतात. ही प्रक्रिया तासन्ताससुद्धा सुरू असते. गोव्यातील विविध धबधब्यांवर जाताना ही फुलपाखरे पक्ष्यांनी खाऊन उरलेल्या खेकड्याच्या तुकड्यावर ताव मारताना दिसतात. मान्सूनच्या पावसात हे फुलपाखरू आल्तिन, ताळगाव, आणि मिरामारसारख्या भागांतदेखील आढळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com