Brain Fever Bird, Paushya bird Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Brain Fever Bird: ..बोले रे पपिहरा! पावसाचा संकेत देणारा गोव्यातील स्थानिक 'पावश्या'; ‘पेव गो, पेव गो' मागची प्रचलित लोककथा

Paushya bird Goa: गोव्यात वसंत ऋतूच्या आगमनापासून विशिष्ट पक्ष्यांचा आवाज परत परत आपल्या कानावर पडू लागतो आणि पावसाळ्यापर्यंत तो वाढत जातो.

Sameer Panditrao

अ‍ॅड. सूरज मळीक

गोव्यात वसंत ऋतूच्या आगमनापासून विशिष्ट पक्ष्यांचा आवाज परत परत आपल्या कानावर पडू लागतो आणि पावसाळ्यापर्यंत तो वाढत जातो. सुरुवातीला जणू शिमगोत्सवातील ‘जघांट’ वाजवल्यासारखा टणटण आवाज ऐकायला येतो तो तांबट या पक्ष्याचा.

त्यासोबतच भारतीय शास्त्रीय संगीतात, ‘वसंताच्या आगमनाचा संकेत देणारा पक्षी’ म्हणून ओळख असलेल्या नर कोकिळाचा ‘कुहू कुहू’ असा आवाज व ग्रीष्माच्या मध्यांतरी एप्रिल ते मे महिन्यात ‘पावसा घो, पावसा घो’ अशा विशिष्ट बोलाने पावसाला साद घालणाऱ्या पावश्याचा आवाज गोमंतकीय लोकमानसाला सतत खुणावत आलेला आहे. पावशा किंवा पावश्या या पक्ष्याला इंग्रजीमध्ये ‘कॉमन हॉक ककू’ असे म्हणतात.

उन्हाळ्यात या पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ होतो. नर पक्षी आपल्या आवाजाने मादी पक्ष्याला संकेत देऊन आपल्याकडे आकर्षित करीत असतात. या काळात आसमंतात जणू वेगवेगळ्या सुरावटी निनादत असतात.

कुठे तांबट पक्षी सुकलेल्या झाडाला भोक पाडून अंडी घालण्यासाठी ढोली तयार करतो, कुठे कावळा लहान लहान काठ्या गोळा करून घरटे बांधतो, तर कुठे कोतवाल पक्षी गवत व कोळीचे जाळे घेऊन गोलाकार वाटीसारखे घरटे बांधण्यात व्यग्र असतात. परंतु पावश्या हा पक्षी कधीच स्वतःचे घरटे बांधत नाही. जशी कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते त्याचप्रमाणे पावश्या पक्षीण सातभाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालते.

पावश्या हा गोव्यातील स्थानिक पक्षी असून भारतीय उप-खंडात त्याचा अधिवास आढळतो. भारतभरातील अनेक राज्यांत त्यांच्याबद्दल विविध धारणा, लोककथा आढळतात. मार्च ते जूनपर्यंत त्याच्या प्रजननाचा काळ असतो. दिवसभर निरंतर आणि पुनरावृत्ती करणारा आवाज सूर्योदयापूर्वी सुरू होतो. कधी कधी तिन्हीसांज व त्यानंतरसुद्धा ऐकायला येतो.

या पक्ष्याचा मधुर आवाज जरी आपल्या ओळखीचा असला तरी तो आपल्या दृष्टीस अभावानेच येतो. एखाद्या कबुतराएवढ्या आकाराचा हा पक्षी कुठे बसून एवढा आवाज करतो याचा शोध घेणे तर कठीणच असते. कारण तो उंच झाडावर वृक्ष आच्छादनात बसलेला असतो. त्याचबरोबर त्याच्या पिसाऱ्याचा रंगही वरून राखाडी असतो व खालून पांढऱ्या तपकिरी रंगावर गडद ठिपके असतात. त्याच्या डोळ्याभोवती असलेले पिवळे वर्तुळ ही त्याची विशेष ओळख असते.

भारतीय शास्त्रीय संगीतात वर्षा ऋतूवर आधारीत मिया मल्हार रागातील बंदिशीत पावश्या या पक्ष्याचा उल्लेख पपिहा किंवा पपिहरा असा आढळतो. प्राकृतिक संगीताकडून प्रभावित होऊन मिया तानसेन ने मया मल्हाल रागाची बांधणी केली असे सांगितले जाते. ‘बोले रे पपिहरा, नीत घन बरसे नित मन प्यासा’, यामध्ये पाऊस येण्याचा संकेत देण्यासाठी पावश्या पक्षी आवाज करीत असल्याचे सांगितले आहे. आजही ही बंदीश शास्त्रीय बैठकीत ऐकायला मिळते.

पावश्याला सामान्य भाषेत इंग्रजीमध्ये ‘ब्रेन फीवर बर्ड’ म्हणतात, हिंदीमध्ये ‘पपिहा’, मराठीत पावश्या तर गोव्यात त्याला ‘पेवगा’ या नावाने ओळखले जाते. भारतभरातील अनेक राज्यांत या पक्ष्याच्या आवाजावरूनच त्याला नाव प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्रात या पक्ष्याच्या तीन स्वरांमध्ये तेथील शेतकऱ्यांना ‘पेरते व्हा, पेरते व्हा’, असा भास होतो. हा पक्षी पाऊस येण्याचा संकेत देऊन आता पेरणीला सुरुवात करा म्हणून सांगत आहे, अशी लोककथा प्रचलित आहे.

त्यामुळे त्याला पावश्या असे नाव मिळाले. गोव्यात तर या पक्ष्याबद्दल येथील लोकांना विशेष आकर्षण होते. कधीकाळी शेती बागायती करणे गोव्यातील लोकमानसाचा प्रमुख व्यवसाय होता, त्यामुळे त्यांच्या जीवनात शेतीसाठी उपयुक्त असलेल्या पावसाला भरपूर महत्त्व होते. कष्टाची कामे करत असताना ‘पेव गो, पेव गो’ असे शब्द त्यांच्या कानावर पडायचे. कोण हा पक्षी आणि तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे याबद्दल जनमानस उत्सुक होते. निसर्गाच्या सांनिध्यात लाभलेल्या ज्ञानाबरोबर त्यांची कल्पनाशक्ती तर अफाटच होती.

ते पावसाळ्याचे दिवस होते. नदी, ओहोळ ओसंडून वाहत होते. कधीकाळी पावश्या आपल्या बायकोला तोंडात धरून व आपल्या आईला एका हातात उचलून नदी ओलांडत होता. रोजच्या सवयीप्रमाणे त्याने तोंड उघडल्याने तिची बायको नदीत पडून बुडायला लागते. त्यामुळे पावश्या हा पक्षी तिला ‘पेव गो, पेव गो’ म्हणजेच ‘पोहत ये गं, पोहत ये गं’, असे म्हणत नदीच्या किनारी यायला सांगतो. गोव्यामध्ये ही लोककथा भरपूर प्रचलित आहे. काही लोकांना त्याच्या आवाजातून ‘पावसा घो, पावसा घो’ असा भास होतो. त्यामुळे तो पावसाला बोलावत असल्यासारखा त्यांना भास होतो. जर हा पक्षी भरपूर आवाज करू लागला तर समजायचे की या वर्षी भरपूर पाऊस पडेल अशी लोकधारणा गोव्यात आहे.

आज सावरीच्या झाडावर पाहिल्यास कावळ्याची घरटी सहज दृष्टीस पडतात. याच कालखंडात सातभाई पक्षीसुद्धा घरटे बांधून अंडी घालतात. अनेक वेळा जमिनीवरील पाल्यापाचोळ्यातून किडे शोधत असताना ते समूहाने एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने खाद्य गोळा करतात.

त्यांच्या याच स्वभावामुळे त्याला ‘सातभाई’ असे म्हटले आहे. पावश्या या पक्ष्याची मादी सातभाईच्या घरट्याकडे नजर ठेवून असते. तो कधी घरट्याकडून दूर जातो, किती वेळाने परत येतो याचा ती अंदाज घेते. घरटे मोकळे सोडून दूर गेल्याची संधी साधून ती त्याच्या घरट्यात एक अंडे घालते. यालाच ब्रूड परजीवीवाद असे म्हणतात.

निसर्गाचा पण कसा चमत्कार बघा! पावश्या आणि सातभाई यांच्या अंड्याच्या रंग आणि आकारात साधर्म्य असते. दोघांचीही अंडी निळ्या रंगाचीच असल्यामुळे त्यामध्ये पटकन फरक ओळखता येत नाही. त्यानंतर आपल्या अंड्यासोबत पावश्याच्या अंड्याला पण तीच उबवते. पिल्ले बाहेर पडल्यावर पावश्याचे पिल्लू लगेच ओळखता येते.

तरीसुद्धा या पिल्लाला ती आपलेच पिल्लू समजून त्याचे भरणपोषणही करते. सातभाई हा एक लहान आकाराचा पक्षी. सातभाईसमोर तर पावश्याचे पिल्लूदेखील त्याच्यापेक्षा मोठे दिसते. त्यामुळे एखादा लहान पक्षी मोठ्या पक्ष्याला खाऊ घालताना पाहणे तर कल्पनेपलीकडचेच. त्यातही सातभाई पक्ष्याचा जास्त वेळ पावश्याच्या पिल्लाला खाऊ भरविण्यात जातो, कारण त्याला भूक खूप लागते.

पावश्या हा पक्षी कीटकभक्षी आहे. दिवसभर झाडाझुडपांवर असलेल्या विशेषतः केसाळ सुरवंटांना खाऊन तो जगतो. त्यामुळे सुरवंटापासून उत्पन्न होणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचे त्याचे योगदान फार मोठे आहे. मान्सूनच्या आगमनापर्यंत अंड्यातून बाहेर पडलेल्या पक्ष्यांची संख्या भरपूर वाढलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांतून ऐकू येणारा ‘पेव गो, पेव गो’, किंवा ‘पाऊस आला पाऊस आला’ असा आवाज तनामनाला मोहिनी घालतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पत्रादेवी नाक्यावर 'पीओपी' गणेशमूर्ती जप्त; मोपा पोलिसांची कारवाई, कोल्हापूरच्या एकास अटक

Goa Assembly Live Updates: ‘गोवा एसटी प्रतिनिधीत्व विधेयक पुन्हा अडवले, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचा निषेध’; CM सावंत यांचा आरोप

राम कृष्ण हरी! पंढरपूरच्या वारकऱ्यांना गोवा सरकार देणार आर्थिक मदत, अधिवेशनात एकमताने ठराव मंजूर

Lionel Messi: मुंबईत दिसणार 'मेस्सी' मॅजिक... 14 वर्षांनी भारतात येतोय 'वर्ल्ड चॅम्पियन', विराट-रोहितसोबत खेळणार क्रिकेट

Goa Assembly 2025: गोवा सरकारचा स्तुत्य निर्णय, आता शालेय जीवनातच मिळणार शेतीचे धडे; आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल

SCROLL FOR NEXT