Nitin Nabin Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

बिहारचा बाहुबली ते दिल्लीचा दरबारी; नितीन नवीन यांच्या संघटनात्मक कौशल्याची आता राष्ट्रीय कसोटी- संपादकीय

भारतीय जनसंघाची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जेमतेम एक वर्षाचे होते. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा नितीन नवीन यांचा जन्मही झालेला नव्हता.

गोमंतक ऑनलाईन टीम

भारतीय जनसंघाची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जेमतेम एक वर्षाचे होते. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा नितीन नवीन यांचा जन्मही झालेला नव्हता. आज जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवादी देशाच्या सरकारचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करीत आहेत, तर जगातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्षपद नितीन नवीन यांच्या हाती सोपविण्यात आले आहे.

भारतीय राजकारण्यांचे सरासरी वय खाली आणण्याचा प्रवाह या पदग्रहणाच्या निमित्ताने सुरू होऊ शकतो, त्यामुळे या घटनेची दखल घ्यायला हवी. एकविसाव्या शतकातील भाजपच्या पहिल्या पंचवीस वर्षांवर नरेंद्र मोदी यांचा निर्विवाद प्रभाव राहिला, तो कायम असला तरी भाजप आता बरेच पुढचे पाहण्याचा प्रयत्न करीत आहे, हे स्पष्ट होते. इतर पक्षांनाही याची दखल घ्यावी लागेल. यापुढे भाजपचे नेतृत्व तरुणांच्या हाती असेल, असा संदेश या नियुक्तीने दिला आहे.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जन कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा आणि जगतप्रकाश नड्डा यांनंतर पक्षाचे बारावे राष्ट्रीय अध्यक्षपद नितीन नवीन यांच्याकडे आले आहे.

पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना ४५ वर्षीय नवीन यांचे नेतृत्व गंभीरपणे मान्य करावेच लागेल, ही बाब ठसविण्याचा प्रयत्न खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला आहे. ‘जेव्हा पक्षाचा विषय येतो तेव्हा मी एक कार्यकर्ता आहे आणि नितीन नवीन माझे ‘बॉस’ आणि आम्हा सर्वांचे अध्यक्ष आहेत,’ असे नमूद करीत पंतप्रधानांनी अध्यक्षपदाची प्रतिष्ठा उंचावून पक्षशिस्तीचे माहात्म्य सर्वोच्च स्तरावर अधोरेखित केले असले तरी पक्षाचे खरे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहाच असतील, याविषयी भाजपजनांच्या मनात शंका नसेल.

देशात सध्या लोकसभा तसेच महत्त्वाच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मोसम बऱ्यापैकी आटोपल्यामुळे जानेवारी २०२९ पर्यंत नितीन नवीन हे शांततेच्या काळातील राष्ट्रीय अध्यक्ष. अर्थात, तेरा राज्यांमध्ये स्वबळावर आणि महाराष्ट्र-बिहारसारख्या मोठ्या राज्यांमध्ये स्वबळापाशी पोहोचलेला भाजप हा स्वस्थ बसणारा पक्ष नव्हे.

एकविसाव्या शतकातील पुढची पंचवीस वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत, याची जाणीव त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविताना भाजपचे सर्वांत सक्रिय आणि ज्येष्ठ मार्गदर्शक या नात्याने पंतप्रधान मोदी यांनी करुन दिली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच नवीन यांना कामाला लागावे लागेल.

सहस्त्रकात जन्मलेल्या भाजपच्या भविष्यातील प्रवासात सामील झालेले नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नवीन यांच्यापुढे पन्नाशी आणि साठीत जन्मलेल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या नव्या पिढीला आकर्षित करुन पक्ष संघटनेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याचे आव्हान आहे.

बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी होऊन राज्यात अनेकवेळा मंत्रीपद भूषविणारे नितीन नवीन यांच्या व्यक्तिमत्वाची फारशी चर्चा नसली तरी त्यांनी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीम आणि छत्तीसगड भाजपचे प्रभारी अशा तरुण वयातील संघटनात्मक आणि प्रशासकीय अनुभवाने स्वतःला सिद्ध केले आहे. या अनुभवाला नेतृत्वाची धार देत त्यांना पक्षाच्या विस्तारासाठी जुंपून घ्यावे लागणार आहे.

भाजपचे आज १४ कोटी प्राथमिक आणि १२ लाख सक्रिय सदस्य आहेत. देशभरातील साडेदहा लाखांहून अधिक बूथवर काम करणारे बूथ अध्यक्ष आणि त्यांचे कोट्यवधी बूथ कार्यकर्ते आणि त्यांच्याच वयाच्या भाजप पक्षसंघटनेच्या देशभरातील १७ हजारांहून अधिक नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांशी समन्वय साधून पुढच्या २५ वर्षांतील भाजप पक्षसंघटनेच्या महत्त्वाकांक्षी विस्ताराची पायाभरणी करायची आहे.

म्हणजेच अप्रत्यक्षपणे भाजप किंवा रालोआची सत्ता नसलेल्या पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, पंजाब, कर्नाटक, झारखंड, तेलंगण, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर या नऊ राज्यांमध्ये पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. अन्य प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांप्रमाणे भाजपचे अध्यक्षपद वारशात मिळत नाही.

प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांची सूत्रे एका घराण्याच्या हाती असल्यामुळे देशातील लाखो तरुणांसाठी बंद झालेली राजकारणाची दारे भाजपला उघडून द्यायची आहेत, याची जाणीवही नव्या अध्यक्षांना पंतप्रधान मोदी यांनी करुन दिली आहे. हे लक्ष्य वास्तवात उतरविताना नितीन नवीन यांना त्यांच्याच समवयस्क राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लागेल.

त्यामुळे आज पन्नाशी-साठीतील विद्यमान राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पक्षातील भूमिका संपण्याची चिन्हे असून आता अनेकांची उपयुक्तता पक्षाच्या पदभाराऐवजी आमदार, खासदार, मंत्रीपद आणि राज्यपालपदाचा ‘कार्यभार’ वाहण्यापुरती उरणार आहे. अशा सर्वस्वी नव्या परिस्थितीत ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ पिढीवर नजर ठेवणाऱ्या भाजपने नितीन नवीन यांच्या साथीने सुरू केलेल्या ‘मिलेनियल’ पर्वाकडे लक्ष लागलेले असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

SCROLL FOR NEXT