सर्वेश बोरकर
बिदर शहर हे भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा एक गौरवशाली साक्षीदार. बिदर शहरात स्थापत्यशास्त्रातील आश्चर्य आणि राजवंशाच्या भव्यतेच्या कथांनी सजलेला त्यांचा भूतकाळ काळाच्या ओघातून प्रतिध्वनीत होतो.
बिदर हे नाव ’बिदिरू’ या शब्दावरून पडलेले दिसते, ज्याचा अर्थ बांबू असा होतो. हे ठिकाण पूर्वी बांबूच्या वनासाठी ओळखले जात असे आणि काही ऐतिहासिक स्रोतांनुसार ते ‘बिदारू’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
याला बेदद्दकोट असेही म्हटले जात असे. पारंपरिक कथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख महाभारतातील विदुरनगर म्हणून केला जातो, जिथे हस्तिनापूरचे विदुर येऊन राहिल्याचे बोलले जाते. पुढे बिदर मुघल साम्राज्याचा भाग बनले.
बिद्री भांडी ही बिदरच्या वारशाचा अविभाज्य भाग. असे मानले जाते की प्रसिद्ध बिद्री धातूकाम बहामनी काळात तयार झाले आणि ते एका इराणीने येथे आणले होते असे म्हटले जाते. तुघलक साम्राज्याने १३२०च्या दशकात संपूर्ण भारत व्यापला होता, परंतु बंडखोरीमुळे फार कमी काळातच दख्खन प्रदेश त्यांच्या हातातून निसटला.
या घडामोडींमधून अनेक राज्ये उदयास आली: एक म्हणजे अलाउद्दीन हसन गंगू बाहमन शाह किंवा बाहमनी सल्तनत, दुसरे नायकांच्या नेतृत्वाखाली वारंगल येथे तेलंगाणा राज्य, तसेच दख्खनच्या दक्षिणेस विजयनगर साम्राज्य आणि मदुराई सल्तनत अशी आणखीन दोन नवीन राज्ये उदयास आली.
पुढे १४व्या शतकाच्या अखेरीस अशा काही मनोरंजक घटना घडल्या ज्यांचा बराच काळ बिदरच्या राजकारणावर परिणाम झाला. तुघलकांविरुद्ध बहमनीने बंड केल्यानंतर उत्तर भारतातील येण्याजाण्याचे मार्ग त्यांच्यासाठी बंद करण्यात आल्याने ते सागरी मार्गावर अवलंबून होते.
दख्खनमध्ये बंड झाले आणि एका महत्त्वाकांक्षी बंडखोर जफर खानने राजघराण्यांचा पराभव केला, अनेकांचा पाठिंबा मिळवला आणि आपला प्रदेश स्वतंत्र घोषित केला. त्याने अल्लाउद्दीन बहमन शाह हे नाव धारण केले आणि अशा प्रकारे बहमन्यांची एक नवीन सल्तनत सुरू केली.
बहमन्यांची सुरुवातीला गुलबर्गा येथे राजधानी होती आणि नंतर १५व्या शतकात ती बिदर येथे हलवली. सल्तनतने दख्खनवर झपाट्याने आपले नियंत्रण वाढवले, स्वतःला एक शक्तिशाली शक्ती बनवले आणि अनेकदा विजयनगरच्या रायांशी, मालव्याच्या सुलतानांशी युद्ध केले.
पूर्वेकडील शासकांशी, जसे की ओडिशाचे शक्तिशाली आणि प्रतिष्ठित सूर्यवंश गजपती राजे यांच्याशी लष्करी संघर्षदेखील केला. १५व्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी सल्तनतचे विघटन झाले आणि बिदर काही काळ विजापूरच्या बरीद शाही आणि आदिल शाहींच्या ताब्यात राहिले.
अली बरीद हा बरीदशाही राजघराण्यातील पहिला ज्याने शाह ही पदवी स्वीकारली. रंगीन महल शिलालेखात दिलेल्या ’अली बरीद’ या अनेक राजघराण्यातील पदव्यांपैकी शेवटचा अर्थ ’साम्राज्यांचा संदेशवाहक’ आहे असे म्हटले जाते. इतिहासकारांनी या वंशातील पहिला कासिम बरीद याचे वर्णन जॉर्जियाचा तुर्क म्हणून केले आहे, परंतु कुटुंबातील सदस्यांनी राखलेल्या ’बरीद’ या पदव्याच्या महत्त्वावर जास्त माहिती मिळत नाही.
भारतात स्थलांतर करण्यापूर्वी ते ’शाही दरबारी’ म्हणून काम करत असावेत असा काही इतिहासकारांचा दावा आहे. पर्शिया आणि दख्खनी राज्यांमधील परस्परसंवाद वाढल्याने ते साहित्य आणि पैशाच्या देवाणघेवाणीच्या पलीकडे गेले. दख्खनच्या दरबारात पर्शियन विद्वानांनाही मोलाची किंमत होती.
इराणपेक्षा जास्त संसाधने आणि लोकसंख्येच्या आधारावर, दख्खनची राज्ये अधिक श्रीमंत होती. ती कलाकारांच्या प्रतिभेस राजाश्रय देणारी होती. अली बरीद हा एक सुसंस्कृत राजपुत्र होता. त्याला कविता, लेखन आणि वास्तुकलेची विशेष आवड होती.
या शाहने उभारलेली एक रमणीय इमारत म्हणजे रंगीन महल (’रंगवलेला राजवाडा’) आहे, ज्यावर सुंदर टाइल आणि मोत्यांची सजावट केली होती. हे एका पर्शियन वास्तुविशारदाने बांधले असल्याचे म्हटले जाते. कारण या राजवाड्यावर कोरलेल्या काही गोष्टी पर्शियातील समकालीन इमारतींवर रंगवलेल्या गेल्या असल्यामुळे उल्लेखनीय साम्य आहे.
गुम्बाड दरवाजाजवळ एक शाही बुरूज कदाचित अहमद शाह वलीने बिदर किल्ला बांधला तेव्हापासून (इ.स. १४२९-३२) अस्तित्वात आहे. समकालीन इतिहासात शाह बुरूज म्हणून उल्लेख असलेल्या या बुरुजावरून बहामनी शाह अनेकदा त्यांच्या सैन्याचा आढावा घेत असत, जे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर जमत असे. इ.स. १४८७मध्ये जेव्हा दख्खनी लोकांच्या एका गटाने महमूद शाह बहामनी विरुद्ध बंड केले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने शाह बुरुजामध्ये आश्रय घेतला.
नंतर बंडखोरांना शिक्षा झाली. बुरुजामुळे आपण वाचलो, म्हणून त्याने शाह बुरुजाला शुभ मानले आणि त्याच्या जवळच एक उंच राजवाडा - ’रंगीन महाल’ बांधला. बिदरच्या रंगीन महालचा अर्थ ’रंगीत राजवाडा’ असा होतो आणि हे नाव देण्याचे कारण असे दिसून येते की त्याच्या भिंती मूलतः वेगवेगळ्या रंगांच्या टाइल्सने सजवलेल्या होत्या.
ज्याच्या खुणा अजूनही पूर्वेकडील मंडपाच्या दर्शनी भागावर आढळतात. या राजवाड्याच्या दक्षिणेकडील भागाची पुनर्बांधणी ’अली बरीद (इ.स. १६४२-८०) यांनी केली होती, ज्यांनी त्यांना लाकूडकाम आणि मोत्याच्या कामाने सजवले होते असा काही इतिहासकारांचा दावा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.