Water Stream  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

गोवा महाराष्ट्र सीमेवरील जंगल, पोर्तुगीज काळातील 3 पोलीस चौक्या; हिवाळ्यातील हजारो बगळ्यांची माळ, 'म्हावळिंगेचा ओहोळ'

Bicholim: हिवाळा सुरू होताच या ओहोळाच्या काठावरील कळसकोण परिसरात हजारो बगळ्यांची माळ फुलते. ऋषी आणि कृषी संस्कृतीचे विरत चाललेले धागे, फडफडणाऱ्या शुभ्र पंखांच्या लयीत मनाची तडफड वाढवत जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

आमचे पूर्वज शेताभाटात काम करताना त्यांच्यात बदल घडू लागले. जुने सोबतीला घेऊन त्यांनी नव्याचा विचार करीत आपली विचारधारा प्रवाहित करण्यास सुरुवात केली.

येणाऱ्या नवीन भविष्याला आपल्या कामाचे महत्त्व कळण्यासाठी, त्यांनी पिकवलेल्या धान्य संपत्तीचे वाटे करून ब्राह्मण, भगत, धोबी, न्हावी, देवदासी, वाजंत्री, सुतार, हरिजन, जल्मी, घाडी, कुंभार, फुलकार अशा बारा बलुतेदारांना देऊन, त्यांच्या हातून गावची समाजसेवा करून घेतली.

त्याने गावचा एकोपा राहिला. अशी स्तुत्यकर्मे त्यांच्याकडून करवून घेऊन समजुतीने आपलेपण निर्माण केले. अशाने गरीब लोकांच्या आयुष्यात एकोप्याची ऊर्जा निर्माण झाली. यात मानवी कर्म नक्कीच आहे. मानव म्हणून जगताना त्यांनी आशेचा किरण निर्माण केला. समाजाने चांगले कर्म करणे हा सुविचार आहे.

ते करीत असताना डोळ्यात जरी अंधार दाटून आला तरी आत्मा कासावीस होणार नाही. हे कर्म करीत त्यांनी आपले आयुष्य सोन्याप्रमाणे चकाकीत ठेवले. आज सर्वच ठिकाणी व्यथित करणारे प्रश्न त्यांनी मागे ठेवलेल्या भविष्याला भेडसावत आहेत.

त्यांच्यामागे राहिलेल्या चांगल्या योजनांची संधी आज आपण घालवून बसलो आहोत. विचार करणाऱ्या माणसाला तो स्वत: त्रासदायक ठरतो. आपल्या पूर्वजांनी मानवी संस्कृती समृद्ध केली. स्वदेश, स्वराज्य साधेपणा, कमी गरजा, श्रमशक्ती, श्रमप्रतिष्ठा, पारंपरिक रीतिरिवाज यातून त्यांनी कृषी संस्कृती पुढे नेली.

पूर्वीच्या काळी नैसर्गिक वातावरणात माणसाची उत्क्रांती झाली. आज माणूस प्रत्येक गोष्टीचे औद्योगिकीकरण करू पाहतो. आपल्या गरजा विनाकारण वाढवून ठेवतो. लोकसंख्या वाढीने तो एकाकी राहण्यात धन्यता मानतो. त्याने पूर्वजांच्या गावापासून आज आपली नाळ तोडलेली आहे. गावांच्या शहरीकरणाने ग्रामीण समाज उद्ध्वस्त झाला. आत्मनिर्भर असलेले गाव, परावलंबी झाले.

माणसाचे भान जेव्हा लयास जाते, तेव्हा वैचारिक पतंगबाजी सुरू होते, आणि चित्ताकर्षकपण धोकादायक बनते. पूर्वजांनी सर्वांच्या सुखशांती कल्याणाच्या मुक्तीसाठी कृषीधर्म निर्माण केला, तो दुसऱ्याच्या जिवावर उठण्यासाठी नव्हता. आपण कसे जगावे हे त्यांनी कष्टातून दाखवले होते. त्यांनी कृषी संस्कृतीतूनच धार्मिक उत्सव, पालख्या, जत्रा, कुंभमेळे, वारी यांतून एकोपा राखला.

एखादा माणूस पाण्यात बुडू लागला, तर त्यांनी काठावर उभे राहून पाहिले नव्हते. त्याला हात मारून वर ये म्हणून सांगितले नाही, त्याला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता पाण्यात उडी मारून वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता.

आज हे संस्कार आपण विसरत चाललो आहोत. शेतीचा कागद, झाडाचे पेन आणि वाहणाऱ्या पाण्याची शाई वापरून त्यांचे संस्कार लिहिले, तरी त्यांच्या कष्टांच्या कामाचे चरित्र लिहून पूर्ण होणार नाही. आज ओहळ, नदी, शेती, बागायतीच्या जागी भेट देताना त्या कृषीची वाट लागून दुर्दशा झालेली दिसते.

डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे गावच्या ओहोळाचा उगम शोधताना, पावलांगणिक विचारांचे कोरडे रहाटगाडगे मन शिंपत जात होते. आत शांत, शीतल ओल होती, बाहेर रणरणत्या वास्तवाची झळ होती.

म्हावळिंगे ओहोळाचा उगम जिथे होतो, ते आमाडगाव आणि माटणे हे दोन्ही गाव गोवा महाराष्ट्र सीमाभागात आहेत. त्या दोन गावांच्यामध्ये जंगल भागात म्हावळिंगे ओहोळाचा उगम होतो. म्हावळिंगे गावात पोर्तुगीज काळातील तीन पोलीस चौक्या पाहावयास मिळतात. कारण या गावातून महाराष्ट्र आणि गोव्यात व्यापाराची देवाण घेवाण होत होती.

गोवा मुक्तिदिनी आपली सेना दोडामार्ग महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश करताना पोर्तुगीज सोल्जरांनी येथे काही प्रमाणात गोळीबार केला होता. पण नंतर पोर्तुगिजांनी हार मानून पांढरे निशाण फडकावले होते. त्या इतिहासाची साक्षीदार ती पोर्तुगीज ठाणी आहेत.

म्हावळिंगे ओहळ ह्या दोन्ही गावांच्या परिसराला पाणी देत विश्राम बांधाकडे पोहोचतो. तिथला परिसर पाण्याने भिजवत तो पलतडवाडा परिसराला पाणी देण्यासाठी पुढे जात राहतो. वाटेत घाडीवाड्यातील लोकांना आणि शेती बागायतीला पाणी पुरवतो. तिथून पुढे नाईकवाडा, हरिजनवाडा या परिसराची तहान भेदाभेद न करता भागवतो. येथील शेती आणि बागायतीला मुबलक पाणी देऊन कळसकोणीत पोहोचताच आपला प्रवाह किंचित मंद करतो.

दबको वायंगण-सरद शेतीला पाणी पुरवत सावरकोणीत आपले पाणी साठवतो. तिची तहान भागली, की चामारकोणीस स्पर्शून जलमय करतो. त्या ठिकाणच्या परिसराला पाणी पुरवठा करून ओहळ आपला प्रवाह वन गावच्या वायंगण-सरद आणि बागायतीला पाणी देण्यासाठी वळवतो.

वन गावातील स्थानिकांच्या पूर्वजांनी या ओहोळाचे वाहते पाणी अडवून त्या पाण्यावर फळबागायती मोठ्या प्रमाणात फुलवली. वन-म्हावळिंग्यात आपल्याच पाण्यावर फुललेली ही संपदा पाहत, ओहळ घोडे कोणीपाशी पोहोचतो. कानडी कुळागराला पाणी पुरवून गोठणार बोर्डे गावच्या परिसराला भिजवतो. पुढे डिचोली शहराकडील बाजार परिसरातून वळत डिचोली नदीत विसर्जित होतो.

म्हावळिंगे गावाला निसर्गाने दोन पठार दिले आहेत. या पठारांचे पाणी ओहळ आपल्या पात्रात घेऊन नदीपाशी जाता जाता वाटेत जो जो परिसर लागेल त्याला हिरवागार करतो.

म्हणूनच येथे राजआमाडा, कुंफळ, कांगल, माट्ट, झिरमूला फागल, वाघचपका, गुंजी, अमृतवाल, बेल, येळंब, सातीव्ण, कुस्मा, मोय, कुमयो, पंगारा, घोटींग, अर्जुन, बकुळी, जंगम, हासळ, पिटकळ, कणेर, चुरन, करवंद, फातरफळ, भेसड, चार, आंबटमीरी अशा अनेक वनस्पती बहरल्या. आम्री, बोणगी, पिंपळ, वड, सावरुगोळ या वृक्षांनी आपली पठारावर घट्ट रोवली.

ओहोळाच्या काठावरील म्हावळिंगे गाव निसर्गसौंदर्याने सजला. आंबा, सुपारी, फणस, नारळ, काजू, कोकम, ओटम, आंबाडा, भिलमाड अशा मानवी कष्टातून, नियोजनबद्ध लागवडीतून वाढलेल्या झाडांशीही ओहोळाने दुजाभाव नाही केला.

लोकांनीही ओहोळाचे हे न फिटणारे ऋण सन्मानिले. निसर्गचक्र सुरू ठेवण्यासाठी अविरत कष्ट करून त्या ऋणाची अंशत: परतफेड केली. गोपालन व कृषी या परस्परावलंबी व्यवस्था प्राणपणाने जपल्या.

अनेक प्रकारचे भात, कुमेरी शेतीत नाचणी, पाकड, वरी, कांग, तीळ, उडीद, कुळीण पेरणी करून धान्य पिकवले. परसदारी काटेकणगी, सावा, अळूमाडी, कारांदे, सुरण, चिकी, काकडी, टरबूज, भेंडी, वाल, मिर्ची, कांदा, भाजी, कंदमुळे यांनी मळा फुलवत विठ्ठलाच्या पायी लळा गोविला. दिवाळी, दसरा, कालोत्सव, शिगमा साजरे करून एकोप्याने गावची संस्कृती जपली होती.

म्हावळिंगे ओहोळाच्या काठाने प्रवास करताना, ही कधी काळी पूर्वजांनी कसलेली जमीन ओसाड, पडीक पाहून वेदना होतात. हिवाळा सुरू होताच या ओहोळाच्या काठावरील कळसकोण परिसरात हजारो बगळ्यांची माळ फुलते.

ऋषी आणि कृषी संस्कृतीचे विरत चाललेले धागे, फडफडणाऱ्या शुभ्र पंखांच्या लयीत माझ्या मनाची तडफड वाढवत जातात. नष्ट होत चाललेल्या निसर्गासाठी, ओहोळांसाठी असलेली माझी ही तडफड तुमच्याही उरात कधी तरी सलते का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Thalapathy Rally Stampede: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 29 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी Watch Video

IND vs PAK: 'अभिषेक शर्मा शतक ठोकणार...' सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी, पाकड्यांना धोक्याचा इशारा

Omkar Elephant In Sindhudurg: गोव्यात धुमाकूळ घालणारा 'ओंकार' हत्ती पुन्हा सिंधुदुर्गात, वनविभागाची धावपळ Watch Video

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'आप' युती करण्यास तयार, अमित पालेकरांचे मोठे विधान

1972 पूर्वीची रस्त्यालगतची घरे, दुकाने कायदेशीर होणार; मुख्यमंत्री माझे घर योजनेचा अमित शहांच्या हस्ते शुभारंभ

SCROLL FOR NEXT