
आज माझा प्रवास डिचोली तालुक्यातील नार्वे गावच्या ओहोळांच्या काठाने होता. मांडवी तीरावरील फेरीने प्रवास करताना तिच्या तटावरील कांदळवनाचे सौंदर्य पाहावयास मिळाले. कांदळवनातील कैक जातीची हिरवीगार झाडे जणू येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करण्यास उभी ठाकल्याचा भास होतो. तिवर, झुंबर, खारहुरा, चिप, मारानी, किट्टी, इरापू, मध देणारा कांदळ, किरकिरी, किरपा, गारकोणी, इफळ, कुर्की, लवतृण अशा झाडांचे दाट रान, नदीच्या किनारी व्यापले आहे.
त्या दोन्ही किनाऱ्यांच्या मधून निळेशार पाणी मांडवीच्या पात्रातून नित्यनियमाने लाखो वर्षांपूर्वीपासून वाहत आहे. किनाऱ्यावरील झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी आपली घरटी बांधून राहतात. कारण त्यांना नदीतील मासळी खाण्यास मिळते आणि पाण्याच्या थंडाव्यामुळे विसावा चांगला मिळतो.
शिवाय, अन्न शोधण्यास दूर जावे लागत नाही. सुकती जाऊन भरती येण्यास सुरुवात झाली म्हणजे मासळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्राकडून नदीच्या वरच्या भागात प्रवास करते. त्यावेळी पक्षी मासळीला पकडून खातात.
पाणबुडा, बगळा, घार, कावळा, सुतार, कोकारी पक्षी कांदळवनांचा आश्रय घेतात, पाण्यात राहणारी पाणमांजरे कांदळवनातील दलदलीच्या ठिकाणी वास्तव्यास येतात. मासळी पकडण्यास ती माणसांप्रमाणे जमावाने पाण्यात उतरून मासळी पकडून नदीच्या काठावर आणून ठेवतात.
पकडलेल्या मासळीवर लक्ष ठेवण्यास एक मांजर वर राहते. जमवलेली मासळी नंतर वाटून खातात. हा कार्यक्रम ते रात्रीचा उरकतात. निसर्गाने त्यांना शिकवलेला सर्वांगसुंदर गुण आहे. पक्षीही झाडावर रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या जमावाने बसतात. पहाट होताच कावळे शेतकऱ्याला उठवण्यास साद घालतात. त्याचप्रकारे कोंबडा पहाटे ओरडून माणसाला जाग आणतो.
सारमानस परिसरात मांडवीने आपले पात्र बरेच रुंदावून त्या परिसरात त्रिवेणी संगम घडविला आहे. तीन नद्यांचा प्रवाह आपल्या पात्रात घेत वाळवंटी त्या परिसरात मांडवीस मिळते, खालच्या भागात बाणस्तारीच्या बाजूने जाणाऱ्या नदीचे मुख आहे.
त्याखालच्या परिसरात नार्व्याकडे जाणारी मांडवी वाहते. सारमानस परिसर मांडवीने अतिसंवेदनशील बनविलेला पाहावयास मिळतो. मात्र विकासाच्या नावाने तिच्या किनारी भागात बार्ज दुरुस्ती डॉक आणी मँगनीज धक्क्यांनी तिच्या पात्रात प्रदूषण होताना दिसत आहे. हे सारे दृश्य न्याहाळताना फेरीबोट सारमानस धक्क्याला लागली आणि पुढचा प्रवास सुरू झाला.
पिळगाव गावातून पुढे जाऊन पिळगाव-नार्वेचा डोंगर पार करून उतरणीने सप्तकोटेश्वराचे देऊळ गाठले. देवळाच्या परिसरात भल्या मोठ्या डोंगरात घळ निर्माण होऊन कपिला झरीतून नार्व्याच्या ओहोळाचा जन्म झाला आहे. तो पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेने वाहत मांडवीची उपनदी असलेल्या तिखाणे नदीला आपले गोडे पाणी देतो.
त्या ओहोळाच्या पात्रात ठिकठिकाणी नैसर्गिक बंधारे उभारून शेतकऱ्यांनी त्याच्या काठावरील बागायत कुळागर आणी शेतीला पाणी वापरले. तिथली जैवविविधता आणी कृषीसंस्कृती जगविली. कपिला झरीकडील बागायतीचे दोन्ही काठ भिजवत ओहळ पुढे जातो.
परिसरातील शेतीला पाणी पुरवठा करीत तो सागर तळीकडे पोहोचून त्या तळीतील पाणी आपल्या प्रवाहात घेतो. या परिसरातील कुळागराला पाणी देऊन खालच्या भागातील मिनेझिस आजरो बांधाकडे पोहोचतो. तिथल्या शेतीला आणि बागायतीला पाटाने पाणी देऊन खालच्या पाटोकडून कोनाडीवाडा परिसराला पाणी पुरवतो. नंतर विशाल सरद वायंगण शेतीला पाणी देत मुर्डी बेट परिसरात पोहोचतो. तिथल्या भागातील लोकांना आणी बागायतीला पाणी देत त्या पुढील खळीत त्याचा प्रवाह विसावतो.
खळीतील खाऱ्या व गोड पाण्याचा तिथल्या खाजन शेतीला पुरवठा करून पूर्वज भात पिकवीत होते. खाजन शेतात करंगूट नावाचे भात बियाणे पेरून एकदम पौष्टिक अन्न मिळवत होते.
सरद वायंगण शेतात मुणे, शिट्टा, दामगा, नेरमार, खोचरी जिरेसाळ, कोथंबीरसाळ, नवण, बेळो बियाणी पेरून भाताच्या राशी घरी आणत होते. कुळागर बागायतीत सुपारी, नारळ, फणस, आंबा, अननस, केळी, तोरींग अशी पिके घेत होते. घराच्या परिसरात भोपळा, कुवाळा, कोकणदुधी, चिर्का, करांदे, अळूमाडी, कणगी यांचे पीकघेत होते.
पावसाळ्यात देवगाळ डोंगरावर दोडगी, काकडी, पडवळ, टरबूज, भेंडी पीक घेऊन त्या डोंगराच्या मैदानी भागाला हिरव्या निसर्गाने फुलवत होते. गोपालनाने शेताची नांगरणी करून त्यांचे शेणखत, चुलीतील राख यांचा वापर खत म्हणून करायचे व भात आणि फळफळावळ यांचे उत्पन्न घेतले जात असे.
ओहोळात प्रदूषण नसल्याने गोड्या पाण्यात थिगुर, देखळा, वाळेर, कासव, पिठ्ठोळ, खेकडे, ससा, अशी मासळी वावरत होती. त्यात बेडूक पाणसर्प फिरत होते, नदीकडील खारगोड पाण्याच्या खळीत काळुंद्र, शेवटा खरचाणी, पालू, शेतुक, तामसा, चोणकूल, खेकडे, वागी, झिंगे मासळी मिळत होती. मुर्डी भागातील खळीत काळे खुबे मिळत होते. या नैसर्गिक अन्नावर जगून तिथले पूर्वज शेताभाटात काम करीत निसर्गाला देवाचा मान देऊन मोठे झाले होते.
डोक्यावर सामानाची पिशवी, पाटला, ओझे, गोणपाट घेऊन बाजारात आपला माल विकून घरात लागणारे सामान त्यात भरून घरी आणत होते. पत्रावळ, केळीचे पान, मातीची भांडी, कासे, तांबे, पितळ भांडी वापरून आरोग्यदायक जीवन ते जगले होते.
आज त्यांची संस्कृती विसरून त्यांची भावी पिढी पाश्चात्त्य संस्कृतीच्या बाजूने झुकत आहे. घरातील नाचणी, पाकड, उडीद, वरी, कुळीथ, तीळ, कोकम, तेल, खोबरेल, उकडा तांदूळ, पेज, आंबील, पिठी, ताक, दही, तूप स्वतःच्या घरात मिळणाऱ्या अगर पिकणाऱ्या जीवनोपयोगी धान्ये, अन्न, वस्तू इतिहासजमा होऊन घरातील माळ्यावर टांगल्या आहेत.
गावातील, खळीत, ओहोळात मिळणारी समुद्रीय मासळी प्रवाहातून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्याने नष्ट झाल्याने, बाजारात मिळणारी समुद्रीय मासळी बांगडा, पेडवा, तारला, सांगट, इसवण, मोडसा पापलेट आणून चवीने खाल्ली जाते. परराज्यातून आणलेली मासळी बर्फ आणि फॉर्मेलीन घालून कैक दिवस महिने टिकवलेली मासळी आम्ही गोमंतकीय खातो आणि धन्यता मानतो. पण आमच्या वाट्याला कसला रोग येईल याचा विचार कुणीही करीत नाही.
चार पाच वर्षांपूर्वी मी हिवाळ्यातील थंडीच्या दिवसात सकाळच्या वेळी नार्व्याच्या मुर्डी भागात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहत होतो. त्या ठिकाणी येणाऱ्या विदेशी पक्ष्यांना तिथे भरपूर मासळी मिळत होती. नदीकडील वरच्या भागात हजारोंच्या संख्येने ते शेतात आणि खळीच्या पाण्यात फिरत मासळी पकडून खात होते.
आज आपण आपलेच ओहळ प्रदूषित करून स्वतःचेच नुकसान केले आहे. बिघडत चाललेले आरोग्य, स्वास्थ्य, हवामानबदल, वाढते प्रदूषण या सर्वांना जबाबदार आम्हीच आहोत. आमचा स्वार्थ, निसर्गाला आणि पर्यायाने आम्हालाच संपवत चालला आहे. याची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जे शिल्लक उरले आहेत, ते ओहळ स्वच्छ, प्रदूषणरहित राखणे खूप गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.