Bhumika Temple Dispute Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Bhumika Temple Dispute: ‘भूमिके’ला लाज आणलीत!

Bhumika Temple Controversy: धार्मिक उन्मादामागोमाग येणारा हा मानापमानाचा उन्माद देवत्वाचाही विचार करत नाही एवढा अंध आणि बेलगाम झालेला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

महाजन असोत वा सेवेकरी. त्यांना देवाच्या अधिक जवळचे अशा श्रद्धेतून समाजात मान मिळतो. हाच ‘मान’ गाभाऱ्याहून अधिक महत्त्वाचा वाटतो, तेव्हा तो स्पर्धेत उतरतो. निष्ठा कडव्या होतात. ‘अहं’ शिगेला पोहोचतो, अपेक्षा वाढतात आणि एकंदरीतच भाव संवादाकडून विसंवादाकडे वळतो. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढते आणि अहिंसा शिकवणाऱ्या देवाच्या दारात भक्तीचा रिवाज संपतो, हिंसारूपी आचार बळावतो.

पर्येतील श्रीभूमिका देवीच्या मंदिरात उफाळलेला वाद व झालेली हिंसक पुनरावृत्ती निंदनीय आहे. ‘पूजेचा मान मला की तुला?’, ‘देवस्थानची मालमत्ता मी भोगणार की तू?’ अशा नानाविध कारणास्तव बहुतांश मंदिरांत परवलीच्या बनलेल्या वादामुळे देवावरची श्रद्धा आणि देवासमोरच्या रांगा बिथरतील व देव ऐन मोक्याच्या ठिकाणीही विजनवासात जाईल, अशी स्थिती बनली आहे.

धार्मिक उन्मादामागोमाग येणारा हा मानापमानाचा उन्माद देवत्वाचाही विचार करत नाही एवढा अंध आणि बेलगाम झालेला आहे. पोर्तुगीज (Portuguese) काळात प्राणांतिक संकटांना भेदून पूर्वजांनी देव राखले, त्याच मंदिरांमध्ये मानापमान नाट्य रक्तपातापर्यंत पोहोचते हे दुर्दैवी आहे. मानकरी या शब्दातला ‘मान’ हा शब्द अहंकाराला जन्म घालणारा आहे. मानी म्हणजेच अहंमन्य. मुक्तीच्या शेवटच्या दारातून मागे येण्याचे कारणच मान वा अहंकार आहे. अहंकाराला उन्मादाचेच सहकारी मिळतात. उन्माद फक्त मारामारी करू शकतो. महाखलनायक रावण दशग्रंथी ते राक्षस मानाच्या मोहानेच झाला. उन्माद चिरंजीव नसतो. फक्त तो नाश करून मरतो. त्यामुळे अनेक श्रद्धास्थळांवर लौकिक प्रगती दिसली तरी अलौकिक अधोगतीच दिसते ती यामुळेच!

‘जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत’ अशा ओवीद्वारे ज्ञानेश्वरांनी भक्तियोगाचे वर्णन केले आहे. त्या उलट एकमेकांच्या उरावर बसण्याची ‘भूमिका’ समाजाला कशी मान्य होणार? मानापमानाचा वाद न्यायिक पद्धतीने सोडविण्याचा उपाय समोर आहे. त्याला बगल देऊन श्रीभूमिका देवीचे सभागृह युद्धभूमी बनविण्यात आले. तेथे वाद रोखणाऱ्या पोलिसांवर, भाविकांवर दगडांचा वर्षाव करणारे मानव की दानव? मानेच्या वर डोके आहे. ज्याला ‘मान’ हवा त्याने बुद्धीने काम करणे अपेक्षित आहे. पर्येतील वादामध्ये कोण चूक वा कोण बरोबर हा इथे चर्चेचा मुद्दा नाही.

अन्याय होत असल्यास न्यायासाठी सन्मार्ग आहेत. त्याऐवजी निवडलेल्या हिंसेच्या अघोरी मार्गाचा आम्ही निषेध करतो. दगडफेक करणाऱ्यांना कठोर शासन व्‍हायलाच हवे. गोव्यात गावकरी पद्धतीचा केंद्रबिंदू प्रामुख्याने मंदिरे राहिली. त्यामधील देवस्थान रचनेचे महत्त्व नेहमीच वलयांकित होते व आहे. देवस्थानांमध्ये वाद विकोपाला पोहोचणे, उत्सव बंद पडणे, गट-तट उभे राहणे समाजस्वास्थ्यास हानिकारक आहे. त्यावर नियंत्रण न आल्यास दूरगामी सामाजिक, आर्थिक परिणाम अटळ आहेत. पर्येतील वाद हे एक उदाहरण झाले; परंतु वाढणाऱ्या मंदिर वादांकडे अद्याप गांभीर्याने पाहिले गेलेलेच नाही. असे वाद हिंदू देवस्थानांमध्येच होतात असे नाही; इतर धर्मातही आहेत. परंतु बहुसंख्य हिंदूंना एकसंध ठेवणाऱ्या मंदिरांमधील वाढत्या वादांवर सामाजिक अंगाने व्यापक ऊहापोह प्रामुख्याने गरजेजा बनला आहे.

भारतीय संविधानासमोर (Constitution) सारे एक आहेत, तसे देवासमोरही सर्व घटक एकसमान असावेत. काळ बदलतो तसे बदल घडतात. त्याचे परिणाम देवस्थान रचनेत दिसतात. आत्मसन्मानाच्या व्याख्या बदलत आहेत. देवस्थानची रचना, पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यात घटकनिहाय मान-सन्मान परंपरा आढळते. ते त्या-त्या घटकांसाठी सर्वस्व! देवस्थानांचे सर्वाधिकार महाजनांकडे राहिले. इथली देवस्थाने खासगी मालमत्ता आहेत, सरकारी नाही. महाजन कायदा पोर्तुगीज काळातील. मुक्तीनंतर स्वीकारलेले भारतीय संविधान व त्यामध्ये तफावत आहे. सेवेकरी - महाजन नात्याची वीण विसविशीत होत आहे. तेथेच वादाची ठिणगी पडते. महाजनी कायद्यात बदल केल्यास एकसमानता आणणे शक्य आहे. परंतु तेवढी सरकारची छातीही नाही.

अलीकडच्या काळात देवस्थान नियमन कायदा सुधारण्याचा प्रस्ताव विरोध झाल्याने मागे घ्यावा लागला. एकाधिकारशाही नव्या पिढीला मान्य नाही. भावकारणाच्या चित्रामागचे अर्थकारणही याला जबाबदार असावे. ‘दा’ म्हणजे देणे, देणे म्हणजे दातृत्व, देतो तो देव. देणारा आला की घेणारा आलाच. या घेण्याच्या घाई आणि आग्रहामुळेच हे वाद सुरू होतात.

देव आणि परमेश्वर वेगळे. परम ऐश्वर्य म्हणजे परमेश्वर आणि ते ऐश्वर्य देतो तो देव. घेताना जी असंस्कृत झुंबड उडते तिचा स्वार्थ बळावला की ती मारामारी होते. ही परिस्थिती बदलावी लागेल. ‘एकसमानतेसाठी’ महाजन कायद्यात बदलासाठी प्रयत्न, देवस्थान लवाद स्थापण्यासाठी पुढाकार घेण्यासोबत समाजधुरीण, विचारी लोकांना पुढे येऊन समाजाला दिशा देण्याचे दायित्व पत्करावे लागेल. मानापमानाचे प्रश्न सुसंवादातून, सामंजस्याने सोडविणे शक्य आहे. रक्तरंजित संघर्ष हा त्यावर उपाय नाही! आपण कशासाठी लढतोय यावरून कसे लढतोय याला महत्त्व प्राप्त होते. दगडात देवत्व आणणारी माणसे देवासाठी दगड हाती घेतात, तेव्हा भक्त सोडाच, ती माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचीही उरत नाहीत. श्री देवी भूमिकेसाठी घेतलेली ही भूमिका केवळ अयोग्यच आहे असे नव्हे तर ती लांच्छनास्पदही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT