
Bhumika Temple Dispute
Valpoi News: पर्येतील भूमिका देवीच्या कालोत्सवावरून बुधवारी (१४ जानेवारी) सकाळी दोन गटांमध्ये वाद उद्भवला. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. काही पोलिसांसह २५ हून अधिक नागरिक जखमी झाले. अधिक कुमक मागवून स्थिती नियंत्रणात आणण्यात आली. आमदार दिव्या राणे यांची मध्यस्थी निर्णायक ठरली. त्यामुळे कडक बंदोबस्तात दुपारपासून देवदर्शनाला सुरुवात झाली.
माजीक समाज हा देवस्थानाचे समान अधिकार देत नसल्याचा गावकर समाजाचा आरोप असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर आज व उद्या (१४ - १५ जानेवारी) श्री भूमिका देवस्थानचा वार्षिक कालोत्सव आयोजित करण्यात आला. तेथे वाद निर्माण होऊ शकतो, ही कल्पना गृहीत धरून पर्ये मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नेमके काय घडले?
१) सकाळी लवकर कालोत्सवाची सुरुवात म्हणून श्री भूमिका देवीची पूजा करण्यात आली. ती माजिक समाजाने केली. तेव्हा वातावरण शांत होते.
२) सकाळी १० वाजल्यानंतर गावकर समाज बांधवांनी आपल्याला 'मान' मिळावा, अशी मागणी करत महिलांसह रस्त्यावर उतरून मोर्चा काढला.
३) तेव्हा निर्माण झालेला तणाव निवळावा, यासाठी उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी गावकरी समाजाला देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याची अनुमती दिली.
४) महिला व पुरुष मंदिरात गेले. मात्र, जोपर्यंत 'मान' मिळणार नाही, तोवर आम्ही मंदिरातून बाहेर पडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी आत अन्य कुणालाच प्रवेश दिला गेला नाही.
५) त्यामुळे दुसरा गटही सक्रिय झाला. यावेळी पोलिसांनी समज काढण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. पोलिसांवर हल्ला सुरू झाला.
मिळेल ते फेकून मारले
१) सभागृहातील खुर्चा फेकून देण्यात आल्या. त्यानंतर लादी, दगड व मिळेल ते फेकून मारण्याचा प्रकार घडला. काही जणांनी जीव मुठीत धरून तेथून दूर जाणे पसंद केले.
२) जमाव पोलिसांच्या अंगावरही धावून गेला. त्यांच्यावर दगडफेक झाली. जखमींना तातडीने १०८ मधून तसेच मिळेल त्या वाहनातून इस्पितळात नेण्यात आले.
३) काही जणांना साखळी इस्पितळात उपचार करून घरी सोडण्यात आले; तर काही जणांना बांबोळी येथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले.
४) पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून जमावावर नियंत्रण मिळवले. पोलिस अधीक्षक अक्षत कौशल पर्ये येथे दाखल झाले. आमदार दिव्या राणे यांनी मध्यस्थी केली व दुपारनंतर बंदोबस्तात देवदर्शन सुरू झाले. वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर व कुमक तेथे कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.