Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Banyan Tree: भगवान श्रीकृष्ण आला नाही तर गोपी वडाला कृष्ण मानून फेर धरून खेळत होत्या; वटवृक्षाच्या रूपात जन्म घेणारा जटाधारी आदिनाथ

Banyan Tree Significance: एखादे जनावर त्याच्या सावलीत सुकलेल्या पानावरून चालताना चरचर आवाज आल्याने भुताटकीचा भय मनात शिरून आपण तिथून पळ काढतो.

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

जैविक संपत्तीचा पोषणकर्ता, उंच गरुडझेप घेण्यास जाणारा, एखाद्या सम्राटाप्रमाणे आपल्या सामर्थ्यावर परिसराला वेढणारा शतकोशतके आयुष्य जगणारा, आपल्या थंड शीतल सावलीचा आधार देणारा, त्या सावलीत जैवविविधता वाढवत तिचे रक्षण करणाऱ्या शंकराच्या जटाप्रमाणे पारंब्यांखाली सोडून धरणी मातेच्या अंतरात रुजवून आपला तोल सांभाळणारा तो महाकाय वटवृक्ष, भारतात उष्णकटबंध भूभागातील डोंगर, पर्वतीय रांगांच्या पायथ्याशी आणि शेतीबागायती, देवालये, स्मशानभूमीत त्या वृक्षाला पाहावयास मिळतो.

वनस्पती झाडात वटवृक्ष सर्वात जास्त प्राणवायू पुरवठा करून कार्बनवायू खेचून घेतो. जमिनीत जास्तीत जास्त पाणी साठवणाऱ्या वृक्षांत वटवृक्ष, औदुंबर, पिंपळ, कदंब, सातीण, वावळा, अर्जून, चानाडा, नंद्रुक हे वृक्ष पर्यावरणीय काम करतात, वटवृक्षांची रोपे देवालये, शाळांची मैदाने, रस्त्याच्या बाजू, स्मशानभूमी ठिकाणी जरी पूर्वजांनी लावली तरी पक्षी त्या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

तो वृक्ष ओहोळांचे काठ, देवराया, पडक्या घरांच्या भिंती, पोकळ झाडांच्या ढोलीत आपला जन्म घेतो. लहान शाळकरी मुले त्या वृक्षाच्या लोंबकळणाऱ्या पारंब्यांना पकडून झोके घेतात, इंग्रजीत त्याच्या पारंब्यांना (कॉलम्नर रुटस) म्हणतात. त्याचे मूळ खोड जरी मेले तरी बाकी परिसरात पसरलेला विशाल भाग कैक शतके जिवंत राहतो, म्हणून त्याला अमर म्हणतात.

त्याच्या मूळ बुंध्याचा आकार तीन-चार मीटरपर्यंत पाहावयास मिळतो. त्याची साल खडबडीत असून रंग तपकीरी फिका असतो. वरून खाली झेप घेणाऱ्या पारंब्यांना मुखाकडे टोप्या घातल्याप्रमाणे पिवळसर कॅम्प असते.

कोवळ्या डहाळ्यांना आलेली नवीन पालवी लवयुक्त असते. त्या पालवीचा लालसर रंग पोपटाच्या चोचीप्रमाणे भासतो. पुढील पंधरा-वीस दिवसांनी त्याची पाने पोपटी बनून अप्सरेच्या सौंदर्यात भर घालीत मोठी होत, पुढील दिवसात तो हिरवा बनतो. तीन रंग परिधान करून शृंगार चढवलेला वृक्ष पानगळ करताना पिवळ्या रंगाची त्याची पाने आवाज देत धरणीकडे झेप घेत समाधिस्थ होतात.

काळोख्या रात्री वडाच्या झाडाखाली जाण्यास माणसाला धीर होत नाही. अमावास्येच्या रात्री तर त्याच्या छायेत स्मशानातील भय वाढते. एखादे जनावर त्याच्या सावलीत सुकलेल्या पानावरून चालताना चरचर आवाज आल्याने भुताटकीचा भय मनात शिरून आपण तिथून पळ काढतो.

म्हणून वडाला वेताळ रूपातही पाहतात. वडाची पिवळी पाने घरी नेऊन त्याच्या पत्रावळी करून जेवणास वापरतात. त्या झाडावर पिकलेली फळे खाण्यास अनेक प्रकारच्या पक्ष्यांची झुंबड उडते. वटवृक्षाचा पसारा मोठा असल्याने मुंग्या, कीटक, मुंगूस, घोरपड, कावळे, रानमांजर, अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी त्याच्यावर वावरतात. सरपटणाऱ्या प्राण्यांना पक्षाच्या घरट्यातील अंडी, पिल्ले खाण्यास मिळतात.

वडाच्या हिरव्या पानांचे द्रोण करून त्या द्रोणातून देवकार्याला प्रसाद वाटतात. फुलण्याच्या काळात त्याच्यात बदल घडून येतो. बरेच वटवृक्ष जानेवारी फेब्रुवारीमध्ये फुलण्यास सुरुवात होऊन मार्च, एप्रिलमध्ये फळे दिसतात. त्यांच्या फळांना देठ नसतो, ती फांद्यांना चिकटून राहतात.

फळांना आतल्या भागात फुले असतात. फळाला माथ्यावरील टोकावर सूक्ष्म छिद्र असते. आतील फुले फळांच्या भिंतीला चिकटलेली असतात. ती चार प्रकारे फुलतात; नरफुले, मादीफुले, स्टराईल फुले आणि वांझ फुले. नरफुले जास्त असून ती वरच्या बाजूला असतात, मादी फुले फळाच्या तळाकडील भागात असतात.

नरफुलात एक पुंकेसर असतो, मादी फुलात एक स्त्रीकेसर बिजकांड असते. बीजकोषात हायमेनोप्टरा जातीचे बारीक कीटकांचे कोष असतात. ते कीटक मादी फुलात वर्गीकरण करतात आणि फळधारणा तयार होते.

त्याच्या प्रत्येक फळात एकच बी असते. त्या फळाला कॉम्पोझिट प्रकारातले फळ म्हणतात. शिवाय सिकोनस हे दुसरे नाव आहे. वडाचे फळ दिसताना हिरवा रंग बदलून लाल रंग परिधान करते. पूर्ण पिकल्यावर मऊ होत ते गळून पडते.

महाकाय वृक्षाला संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक वाङ्मय, संस्कृती, पुराणे, वैद्यकशास्त्र, लोकसंस्कृती साहित्य इत्यादी प्रकारात त्याचा उल्लेख सापडतो, मानवी जीवनाशी त्याचे नाते ठायीठायी व्यक्त झाले आहे. भारतात त्याला निसर्गपालक स्थान मिळून त्याचे भक्तिभावाने पूजन होते.

सौभाग्यवती ललना वटपौर्णिमेच्या दिवशी त्याला आपला भाऊ मानून वडाला राख्या बांधतात आणि आपल्या प्राणसख्याचे रक्षण कर म्हणून प्रार्थना करतात. आपल्या संस्कृतीत ही प्रथा आहे, हे वेदकाळापासून सती सावित्रीने दाखवून दिले आहे.

वटवृक्षावरून अनेक गावे ओळखली जातात. पिसुर्ले आणि पालये गावात महाकाय वटवृक्ष आहे. गोव्यात अनेक ठिकाणी देवराई, स्मशान, देवालये परिसरात वटवृक्ष पाहावयास मिळतात. रामायणात राम वनवासाला जाताना प्रयाग ठिकाणच्या गंगा, यमुना संगमावरील महावटवृक्ष आणि पंचवटी नाशिक ठिकाणच्या वटवृक्षाखाली झोपड्या बांधून राहिले होते, असे मानतात.

भागवत पुराणात हिमालयाच्या कैलास पर्वतावरील अलंका नगरीत (आदिनाथाचा) शंकराचा महाकाय वृक्ष होता, असेही मानतात. इतिहासात इ. पूर्व पाचव्या शतकात चिनी प्रवाशाने प्रयाग संगमाकडील भारद्वाज मुनींच्या आश्रमस्थळ ठिकाणाला भेट दिली, त्याने त्या महाकाय वटवृक्षाचे वर्णन केले आहे.

कवी कुलगुरू कालिदासाच्या रघुवंश महाकाव्यात शामवटवृक्षाचे वर्णन सापडते. यमुना नदीकाठी कृष्णसखा गोपिकांबरोबर वटवृक्षाखाली खेळत होता. एखाद्या दिवशी भगवान कृष्ण आला नाही तर गोपी त्या ठिकाणच्या वडाला कृष्ण मानून त्याला फेर धरून खेळत होत्या. वटवृक्ष हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष असल्याने त्या नक्षत्राच्या दिवसात त्याची लागवड करतात.

मी बद्रीनाथ जगन्नाथपुरी, द्वारकाधाम आणि बारा ज्योतिर्लिंग यात्रांचा प्रवास पूर्ण करून त्यांचे दर्शन घेतले आहे. या दोन्ही जगदीशांच्या स्थळात काही ठिकाणी वटवृक्ष पाहावयास मिळतात. हिंदू, बौद्ध, जैन धर्मसंस्कृतीत वटवृक्षाला भोळ्या शंकराच्या रूपात पाहतात.

भारतात आठ ठिकाणी वटमहावृक्ष आहे; कलकत्ता शिवपुरी, आंध्र प्रदेश थिम्मामा मरिमानू, गुजरात नर्मदा मुखाकडील पिराम बेट कबीरखड, चेन्नई, थिऑसोफिकल सोसायटी आवार, राजस्थान रणथंबोर, जोगीमहाल, बंगळूर दोडा अलाडमारा, उत्तर प्रदेश माझी तेलंगणा मेहबूब नगर उद्यान येथे या आठ महावृक्षांना मोठे स्थान प्राप्त झाले आहे.

अथर्ववेदात त्याची न्यघ्रोध नावाने ओळख आहे. भारतीय टपाल खात्याने त्याच्या प्रतिमेची टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. त्याला मराठीत वटवृक्ष म्हणतात, हिंदीत बरगद, तामीळ आल, बंगालीत बोट म्हणतात.

इंग्रज जेव्हा भारतात व्यापार करण्यास बंगाल प्रांतात प्रथम आले, तेव्हा त्यांनी वटवृक्षाखाली बसून व्यापार विकण्यास सुरुवात केली, बनिया म्हणजे व्यापारी आणि वड म्हणजे ट्री यावरून त्या आदिनाथ महावृक्षाला बनियन ट्री म्हणू लागले. भारत सरकारने २६ जानेवारी १९६२ साली त्या वृक्षासंबंधी टपाल तिकीट प्रसिद्ध केले. आणि ग्राम पंचायतीचा कारभार त्या वृक्षाच्या सावलीत प्रथम सुरू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Feast: 'सेवा, करुणा आणि एकोप्याची प्रेरणा मिळो', फेस्तानिमित्त थेट दिल्लीतून शुभेच्छांचा वर्षाव!

Brahma Karmali: '..अखेर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर फुलले हसू'! गोव्यातील 'या' गावातून धावली कदंब बस; नागरिकांनी मानले आभार

Goa Karate Awards: राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गोव्याची बक्षिसांची लयलूट! 6 सुवर्ण, 8 रौप्य, 14 कांस्यपदके प्राप्त; सत्तरीच्या खेळाडूंची चमक

Goa Live News: कारापूर येथे महिलेचा मृत्यू, वीजेच्या झटक्याने की घातपात ?

Arambol Beach Bhajan: हरमल किनाऱ्यावर 'हरे रामा, हरे कृष्णा’चा गजर! विदेशी पर्यटक भजनात दंग; भाविकांचा वाढतोय सहभाग

SCROLL FOR NEXT