Abhang Repost Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Abhang Repost: ‘अभंग रिपोस्ट’ जोमात, काही बिचारे कोमात...

Abhang Repost Goa Tour: ‘अभंग रिपोस्ट’ला गोवा सरकारने निधी देणे चूक असेल तर महेश काळेंच्या कार्यक्रमाला त्यावेळच्या सरकारने निधी दिला, हे पण चूकच ठरते.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. मधू स. घोडकिरेकर

वारकरी इतिहासच असा आहे की सगळ्या संताच्या भक्तीच्या तऱ्हा वेगळ्या, पण जेथे जेथे संत असायचे तेथूनच त्यांची भक्ती थेट विठ्ठलाशी पोहोचायची, आताच्या मोबाइल सिग्नलप्रमाणे. आज शेकडो वर्षांनंतरही लाखोंच्या संख्येने लोक पंढरीची वारी करतात. या शेकडो किलोमीटर पायी प्रवासाच्या या वारीचे सांगाती ठरतात ती भजने, कीर्तने, भारुडे व गजर.

आता या दिंड्या फक्त पंढरपूर वारीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून मंदिरे मठ येथील नित्य आराधनेचा भाग बनून राहिल्या आहेत. अशातच व्यावसायिक शिक्षण अर्ध्यावर सोडलेले मुंबईतले पाच युवक एकत्र आले व एक संगीत बँड सुरू केला.

विजय आचार्य, दुष्यंत देवरूखकर, स्वप्निल तरपे, पीयूष आचार्य व विजय (अजय) वाव्हळ. या बँडकडे पहिले की रेमो फर्नांडिसच्या पूर्वीच्या बँडची आठवण येते. त्या दुर्दैवी अपघातापूर्वी रेमो फर्नांडिसच्या बँडमध्ये यांच्या बँडप्रमाणे ड्रमबरोबार तबलाही वाजायचा व कधी कधी हार्मोनिअमही वाजायचे.

मुळात हुशार पण पारंपरिक शिक्षणात रस नसलेल्या विशीतल्या या युवकांनी दिंडीत ज्या अभंगांवर वारकऱ्याचे पाय थिरकतात, त्या मोजक्याच अभंगांना व भारुडांना आपल्या लयीत बसविले.

सातत्याने गेली दहा वर्षे त्याचे क्लब, संगीत समारोह अशा जागी प्रयोग केले, काही महिन्यांपूर्वी त्यांनी याचे एक दोन सशुल्क प्रयोग गोव्यात लावले. त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता दौरा वाढत गेला व या कार्यक्रमाला संपूर्ण गोव्याने डोक्यावर घेतले आहे. अशा प्रकारचा प्रतिसाद मी, ‘तो मी नव्हेच’ नाटकाला पहिला होता.

‘तो मी नव्हेच’ नाटक जेव्हा जेव्हा गोव्यात झाले, तेव्हा तेव्हा ते हाउसफुलच झाले. मराठी वर्तमानपत्र असो वा मराठी व्यावसायिक करमणुकीचा कार्यक्रम, मराठीप्रेमी गोमंतकीय जनता यासाठी पदरमोड करते. म्हणून ‘अभंग रिपोस्ट’च्या प्रयोगांना गोव्यात नजर लागण्याइतका प्रेक्षक प्रतिसाद लाभत आहे. लग्नात मामाचे क्षीण समोर यावे तसे काहींना यात महाराष्ट्र वादाचा गंध यायला लागला आहे.

‘अभंग रिपोस्ट’चा वर्तमान गोवा दौरा त्यांच्या कायम आठवणीत राहणारा असेल असे वाटते. पुढे कधी या दौऱ्याची आठवण काढली जाईल तेव्हा तेव्हा दोन झेडपी सदस्यांची नावे या सोबत जोडली जातील.

दक्षिण गोवा जिल्हापंचायतीखाली येणारी बेतकी खांडोळ्याचे झेडपी सदस्य सुनील जल्मी यांनी आपल्या वडिलांच्या नावे सुरू केलेल्या ट्रस्ट अंतर्गत स्वखर्चाने या कार्यक्रमाचा गोव्यात पहिल्यांदाच नि:शुल्क प्रयोग लावला.

या कार्यक्रमाला दहा हजारच्यावर उपस्थिती लाभली व ‘अभंग रिपोस्ट’च्या अधिकृत संकेतस्थळावर, दहा वर्षातील आजपर्यंतचा सर्वाधिक प्रतिसाद अशी पोष्ट लागली. यानंतर नि:शुल्क प्रयोगाची एक माळ सुरू झाली. अशाच प्रकाराचा एक कार्यक्रम शिवजयंतीच्या मुहूर्तावर सरकारी खर्चाने सावर्ड्यात झाला.

येथे समोर दिसलेला जनसमुदाय पाहून, तेथले झेडपी मोहन गावकर यांच्या अंगात आमदार संचारल्यासारखे ते बोलले. या कार्यक्रमासाठी सरकार करीत असलेला खर्च नेमका किती यावर पत्रकाराने विचारले, तर त्याचे उत्तर आमदार किंवा मंत्र्यांनी द्यायचे असते.

हा कार्यक्रम झेडपी निधीतून झाल्यास, झेडपी सदस्याने त्यावर बोलणे ठीक आहे, पण या अतिउत्साही झेडपीला सरकारी कार्यक्रमांत आपली पायरी कोणती हेच कळले नाही. बरे, चुकला तो चुकला पण त्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी समाजाची ढाल वापरण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या जवळच्या राजकीय पक्षाच्या मित्राची खोपडी तर उलटीच असावी. ‘आमदाराने तोंड काळे केले’ या वाक्प्रचाराच्या अर्थाचा अनर्थ करून ‘आपल्या आमदारांना काळे म्हटले’ असा फालतू उलटवार करण्याचा प्रयत्न केला,

तेथले आमदार गणेश गावकर (गणेशभाऊ) यांचा स्वभाव पाहता व त्यांचे मिडियाकडे असलेले व्यक्तिगत संबंध पाहता, त्यांना हे प्रकरण निभावून नेण्यात काय कसरत करावी लागली असेल, याची मी कल्पना करू शकतो. या झेडपीने स्वत:मध्ये सुधारणा न करता पुढे कधी आमदार झाला तर स्वत:बरोबर आमच्या आदिवासी समाजाचेही नाव खराब करेल, असे या प्रकरणावरून समोर आले.

शिमग्यासोबत कवित्व येते व ते कवित्व शिमगा संपला तरी चालू राहते. या ‘अभंग रिपोस्ट’च्या वाढत्या लोकप्रियतेविषयी एक चर्चा एका चॅनलने प्रसारित केली आहे. या चर्चेत सहभागी दोघेही पाहुण्याचा रोख ‘अभंग रिपोस्ट’वर टीकात्मक आहे.

सामान्य परिस्थितीत, या कार्यक्रमाच्या स्वरूपावरून मच्छिंद्र च्यारीसारखे सनातनी मित्र आक्रमक व्हायला हवे होते तर युगांक नायकसारखे पुरोगामी विचाराचे लोक त्याचे समर्थन करताना दिसले असते. जेव्हा एखाद्या उपक्रमाला राजकारणाची रेष जुळली की तेथे सामान्यांप्रमाणे विचार करणे होत नाही.

खांडोळ्यात सुनील जल्मीने दहा हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र केले म्हणजे युगांकला त्या कार्यक्रमात खोट दिसणार हे साहजिकच आहे. युगांकचा आक्षेप असा आहे की महाराष्ट्रातून हे चारपाच जण गोव्यात आले आहेत व इथला पैसा घेऊन जात आहे.

त्याच्या लोकप्रतिनिधींबाबतही तक्रारी आहेत, की लोकांसाठीचा पैसा तुम्ही महाराष्ट्रीय लोकांना देत आहात. खरे तर अशी चूक करताना त्यांनी स्वत:च्या आमदाराला आधी रोखायला हवे होते. ते ज्या ‘प्रियोळ प्रगती मंच’चे कार्यवाह आहे, त्या ‘प्रियोळ प्रगती मंच’ने १८ डिसेंबर २०२१ या दिवशी गायक महेश काळेंच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्याच खर्च कला व संस्कृती खात्याच्या निधीतून केला होता.

आता महेश काळे हे पण महाराष्ट्रातले (तसे अमेरिकेत स्थायिक) म्हणून ते पण हे पैसे महाराष्ट्रातच घेऊन गेले असणार. ‘अभंग रिपोस्ट’ला गोवा सरकारने निधी देणे चूक असेल तर महेश काळेंच्या कार्यक्रमाला त्यावेळच्या सरकारने निधी दिला, हे पण चूकच ठरते. शेवटी काय, आमदाराच्या अवतीभवती घुटमळणारी ही मंडळी वाऱ्याप्रमाणे सूप धरतात. तुम्ही त्यांच्या आमदाराची री ओढत राहता तोपर्यंत तुम्ही चांगले, तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात तर तुम्ही पक्षपाती!

काहीही म्हणा, पण त्या मुंबईतल्या पाच सहा ‘वादयाव’ (वाया गेलेल्या) मुलांचा ‘अभंग रिपोस्ट’, आज गोव्यात जोमात चालू आहे. ‘अभंग रिपोस्ट’च्या प्रतिसादी झंझावतामुळे काही जण बिचारे अप्रत्यक्षरीत्या कोमात गेले आहेत. ‘अभंग रिपोस्ट’च्या अनोख्या धाडसाला विठ्ठलमयी प्रणाम!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

’तेलही गेले, तूपही गेले; हाती राहिले धुपाटणे’ असे होऊ नये! नाट्यस्पर्धांचे परीक्षक नेमण्यासाठी निकष कोणते?

Vasco to Chennai Train: वास्को ते चेन्नई साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू करा! रेल्वे सल्लागार समितीची हुबळी येथे बैठक

Ghat Arati Narve: ‘घाट आरती’च्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन! नार्वेवासीय एकवटले; आमदार फळदेसाईंच्या भूमिकेविषयी नाराजी

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात! ट्रकचा चकणाचूर; एकाचा जागीच मृत्यू , दुसरा गंभीर

भारतीय संघाचा मोठा प्लॅन! सूर्या, गंभीरमध्ये रंगली चर्चा; खेळाडूंचा जोरदार सराव, दमट हवामानाचा घेणार फायदा

SCROLL FOR NEXT