

बार्देश: म्हापसा शहरातील कदंब बसस्थानक परिसरात खासगी बसचालकांकडून होत असलेल्या अनागोंदी कारभारामुळे प्रवासी व इतर वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवासी चढविणे व उतरविणे या कारणास्तव खाजगी बसचालक आपली वाहने दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभी ठेवत असल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. या गर्दीचा फायदा घेत काही खासगी बसचालक नियमांचे उल्लंघन करत वाहने मनमानी पद्धतीने उभी करतात. ठरावीक वेळेपेक्षा जास्त वेळ एकाच जागी थांबून ते अधिक प्रवासी गोळा करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, इतर बसवाल्यांना, खासगी वाहनांना मार्ग मिळणे कठीण होते. तसेच आपत्कालीन वाहनांनाही या कोंडीतून मार्ग काढताना अडचणी येतात.
स्थानिक नागरिकांनीही या समस्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती आणि कडक अंमलबजावणी झाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे त्यांचे मत आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
युवा समाजकार्यकर्ते सचिन किटलेकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी शिस्त राखणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र काही खासगी बसचालक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून दोषी चालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि बसस्थानकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.