Varsha Usgaonkar Goa Visit : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि गोव्याची लाडकी कन्या वर्षा उसगावकर यांनी नुकतीच मडगाव नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्षांच्या दालनात नगराध्यक्ष आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. एका औपचारिक भेटीत वर्षा यांनी आपल्या करिअरमधील अनेक रंजक किस्से सांगितले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना वर्षा उसगावकर यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांचे वडील गोव्याच्या राजकारणातील मोठे नाव होते, त्यामुळे साहजिकच नातेवाईक आणि मित्रमंडळींना असे वाटायचे की वर्षा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात येतील. "माझे नातेवाईक म्हणायचे की मी राजकारणी होईन, पण मला राजकारणात अजिबात रस नव्हता. माझे स्वप्न केवळ अभिनेत्री बनण्याचे होते," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आपल्या आवडीला महत्त्व देऊन त्यांनी अभिनयाची वाट निवडली, ज्याचा त्यांना आजही सार्थ अभिमान आहे.
वर्षा उसगावकर यांचा चित्रपट प्रवास केवळ मराठी आणि हिंदीपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी तामिळ, राजस्थानी, बंगाली, छत्तीसगढी आणि भोजपुरी अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम करून आपली अष्टपैलू ओळख निर्माण केली.
मात्र, गोमंतकीय असूनही सुरुवातीच्या काळात त्यांना कोकणी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळत नव्हती. "मला कोकणी चित्रपटांत काम करण्याची तीव्र इच्छा होती, पण मला कोणी विचारत नव्हते. अखेर मंगळूरहून मला कोकणी सिनेमासाठी बोलावणे आले आणि माझा तो प्रवास सुरू झाला," असे वर्षा यांनी नमूद केले.
चित्रपटांच्या ग्लॅमरपेक्षाही वर्षा यांच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण कोणता असेल, तर तो म्हणजे 'कोकणी तियात्रा'मध्ये काम करण्याची मिळालेली संधी. "ज्या दिवशी मला कोकणी तियात्रात काम करण्याची संधी मिळाली, तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. गोव्याच्या मातीतील कलाप्रकाराबद्दल असलेला हा आदर पाहून पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. या भेटीदरम्यान त्यांनी मडगाव शहराशी असलेले आपले नातेही अधोरेखित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.