Poonam Pandey as Mandodari: नवरात्री आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचे वातावरण आहे,पण यावर्षी दिल्लीच्या प्रसिद्ध लव कुश रामलीला मंडळाने एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. अभिनेत्री पूनम पांडेला रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका दिल्याने साधू-संतांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, कला आणि धार्मिक भावनांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
या भूमिकेसाठी पूनम पांडेच्या निवडीवर संत समाजाने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त करत, रामलीला मंडळांना 'कलाकारांच्या पार्श्वभूमीचा आणि आचरणाचा विचार करावा' असे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, यामुळे रामलीलाची प्रतिष्ठा जपली जाईल.
याच भूमिकेवर, पातालपुरी मठचे पीठाधीश्वर जगद्गुरू बालकाचार्य यांनी देखील आक्षेप घेतला आहे. ते म्हणतात की मंदोदरी ही 'पंच कन्यां'पैकी एक असून, ती पावित्र्य आणि मर्यादेचे प्रतीक आहे. रामचरितमानस हा पवित्र ग्रंथ असल्याने, त्यातील पात्रांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करायला हवी, कारण अशा निवडीमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात.
या वादात कम्प्युटर बाबांनी तर अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. "पूनम पांडेला मंदोदरी नव्हे, तर शूर्पणखेची भूमिका द्यायला हवी," असे त्यांनी म्हटले. त्यांनी रामलीला समितीला योग्य पात्र निवडण्यासाठी विवेक वापरण्याचा सल्ला दिला.
दुसरीकडे, काही संतांनी रामलीला समितीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. महामंडलेश्वर शैलेशानंद महाराज यांनी "कला आणि व्यक्तीमत्त्व यात फरक असतो" असे सांगत, या निर्णयाचे समर्थन केले. त्यांच्या मते, जर पूनम पांडेने मंदोदरीची भूमिका स्वीकारली आणि रामायणाचा अभ्यास केला, तर तिच्या आयुष्यात सकारात्मक अध्यात्मिक बदल होऊ शकतो. त्यांनी राखी सावंतचे उदाहरण देत, एका कलाकाराच्या आयुष्यात अशा भूमिकेमुळे कसा बदल होऊ शकतो, हे सांगितले.
लव कुश रामलीला समिती देखील आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखादा कलाकार जेव्हा एखादी भूमिका स्वीकारतो, तेव्हा तो त्या भूमिकेशी एकरूप होतो. अशा पौराणिक भूमिका साकारल्याने कलाकाराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय कलेच्या दृष्टीने पाहावा, वादाच्या दृष्टीने नाही, असे समितीचे म्हणणे आहे.
हा वाद आता कोणत्या दिशेने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रामलीला समिती आपल्या निर्णयावर ठाम राहते की संतांच्या दबावाखाली बदल करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.