मिलिंद म्हाडगुत
प्रख्यात लेखक पुंडलिक नायक यांची ‘सुरिंग’ ही गाजलेली संहिता. या संहितेवर आतापर्यंत अनेक संस्थांनी विविध संचांत भरपूर नाट्यप्रयोग सादर केले आहेत. त्यात आता मुष्टिफंड संस्थेने या कोकणी नाट्यस्पर्धेत केलेल्या प्रयोगाची भर पडली. या संहितेचे मूल्यमापन करणे म्हणजे रूपवतीला आरसा दाखविण्यासारखे आहे.
‘सुरिंग’ हे नाटक सुरूंग लावून खडक फोडणाऱ्या आणि त्यातून रस्ता निर्माण करणाऱ्या कामगारांची व्यथा प्रगट करते. जुझे आणि त्याची पत्नी मारयान तसेच मुलगा लिओ तिघे सुरूंग लावून खडक फोडण्याचे काम करीत असतात; पण त्यांच्या हातात काही नसते. मुकादमाच्या इच्छेनुसार त्यांना काम करावे लागते. तेवढ्यात तिथे एक वाट चुकलेला आणि लिओने सुरूंगाच्या स्फोटातून वाचवलेल्या तियात्रातल्या कलाकारांच्या एका ग्रुपचे आगमन होते.
ते जुझे आणि त्याच्या कुटुंबाला एका तियात्राची झलक दाखवितात. त्या झलकेतील बराच भाग हा जुझे आणि मारयान यांच्या आयुष्यातील मागील काही घटनांशी जुळत असतो. नंतर कळते, की मुकादमाने एका चांदण्या रात्री मारयानवर बळजबरी केलेली असते आणि सर्व माहीत असूनसुद्धा जुझे आणि लिओ गप्प राहिलेले असतात. आता हे कळल्यावर तो कलाकारांचा ग्रुप काय करतो, लिओ आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतो काय, खरेच सुरूंग फुटून योग्य मार्ग निघतो काय, याची उत्तरे नाटकाच्या उत्तरार्धात मिळतात.
तुम्ही मार्ग तयार करता आणि त्यावरून भलतेच चालतात. मरणाची सवय आहे त्याला? असे अनेक मनाला भिडणारे उच्च दर्जाचे संवाद या नाटकात आहेत. प्रश्न संहितेच्या दर्जाचा नाहीच. प्रश्न आहे तो घासून गुळगुळीत झालेल्या या संहितेचा आणखी किती प्रयोग करणार याचा.
कला अकादमीची कोकणी नाट्य स्पर्धा म्हटली म्हणजे काहीतरी नवीन मिळविण्याचे व्यासपीठ असे पूर्वी समीकरण असायचे; पण आता त्याच त्या संहिता पुढे यायला लागल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यात साचेबद्धपणा येऊ लागला आहे. त्यामुळेच नाटकातल्या कलाकारांची, दिग्दर्शनाची, तांत्रिक बाबींची तुलना होणे अपरिहार्य होऊ लागले आहे.
आता या नाटकाचे दिग्दर्शक संतोष शेटकर यांनी संहितेला न्याय मिळेल, असे दिग्दर्शन करूनसुद्धा तुलना होत होतीच. खरे तर शेटकर यांनी बहुतेक प्रसंग संहितेच्या उंचीला शोभेल असे घेऊन एक परिपूर्ण कलाकृती दिली, यात शंकाच नाही. खासकरून शेवटच्या प्रसंगात नाटकाला त्यांनी जी ट्रिटमेंट दिली, ती दाद देण्यासारखीच होती. सर्व कलाकारांनीही आपल्या भूमिका समजून केल्या. मारयान झालेल्या आलिशा मिनेझिस यांना सर्वांत जास्त गुण द्यावे लागतील.
त्यांची देहबोली, मुद्राभिनय भूमिकेला शोभेल असे होते. त्यांना जुझे झालेल्या संतोष शेटकर यांनी चांगली साथ दिली. लिओ झालेले राजरत्न कौशल्यन ठीकठाक वाटले. कलाकार ग्रुपमधील अनिकेत, जयंत, अचला अजय झालेले अनुक्रमे लौकिक देसाई, राजेश नायक, गायत्री पाटील, रूपेश गावस योग्य वाटले, तरी मधे मधे ज्याप्रकारे आरडाओरड करत होते, ते मात्र खटकले. श्याम शेटगावकर यांच्या भव्य नेपथ्यामुळे प्रयोगाला वेगळाच गेटअप प्राप्त झाला. गोरक्षनाथ राणे यांची प्रकाशयोजना व नहूष अध्यापक यांचे पार्श्वसंगीत उठावदार होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.