Konkani Drama Competition: ‘बॉ फेस्त’, न रंगलेले रहस्यनाट्य; नाट्यसमीक्षा

Bau Feast Play Review: तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर कला अकादमीच्या ४९ व्या कोकणी नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला तो ‘रुद्रेश्वर, पणजी’ या संस्थेने सादर केलेल्या ‘बॉ फेस्त’ या नाटकाने.
Bau Feast Play Review
Bau Feast Play, Rudreshwar Sanstha PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Konkani Drama Competition Bau Feast Play Review

पणजी: तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर कला अकादमीच्या ४९ व्या कोकणी नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला तो ‘रुद्रेश्वर, पणजी’ या संस्थेने सादर केलेल्या ‘बॉ फेस्त’ या नाटकाने. रुद्रेश्वर संस्था ही गोव्यातली एक आघाडीची संस्था. अनेक चांगली नाटके या संस्थेच्या नावावर आहेत. त्यामुळे प्रस्तुत नाटकाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, दुर्देवाने या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

‘बॉ फेस्त’ या नाटकाची जातकुळी तशी रहस्यमय नाटकाची. पण लेखक अश्वेक देसाई यांना नाटकाचा बाज राखता आला नाही, एवढे खरे. रहस्यमय नाटकाला जी फोडणी हवी असते ती या नाटकाला मिळू शकली नाही.

‘फ्लॅशबॅक’चा अतिवापर आणि त्यामुळे भरकटत गेलेली संहिता यामुळे नाटक म्हणावे तसे रंगू शकले नाही. कोणा एका क्रिस डिमेलोचा नाताळाच्या दिवशी खून होतो. मात्र, ती आत्महत्या आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. पण नव्यानेच नियुक्त झालेला हवालदार नेसन फेर्नांडिस ती आत्महत्या नसून खूनच असल्याचे सिद्ध करतो. आता तो खून कोण करतो, ती आत्महत्या दाखविण्याचा का प्रयत्न केला जातो, हा या नाटकाचा उत्तरार्ध.

सुरुवातच खुनाने होते. नंतर एक निवृत्त झालेला लंगडा पोलिस अधिकारी मुलाखत देताना दिसतो, हा असतो थॉमस डिसु झा. एकेकाळचा कर्तबगार पण एका भीषण अपघातामुळे एक पाय गमावलेला पोलिस अधिकारी. नंतर रोहन म्हणणारा एक माणूस थॉमसला भेटायला येतो. आणि त्या क्रिश डिमेलोचे ‘खून प्रकरण’ तो माणूस आणि डिसुझाच्या बोलण्यातून उलगडत जाते.

त्याकरता लेखकान ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा वापर केला आहे. पण फ्लॅशबॅक व वर्तमान स्थितीचा बरोबर मेळ न घातला गेल्यामुळे नाटक रेंगाळत जाते. आणि नंतर खुनी कोण याचा उलगडा झाल्यावर सुरुवातीला दाखविलेल्या प्रसंगातील व नंतरच्या प्रसंगातील विसंगती जाणवायला लागते.तो रोहन म्हणजे एकेकाळी डिसूझाच्या हाताखाली काम करणारा नेथन फेर्नांडिस हेही मनाला पटत नाही.

अपघातामुळे त्याच्यात बदल झाल्याचे संहितेत सांगितले असले तरी त्या बदलाची वास्तवता मनाला भिडत नाही. नाटकात धक्का तंत्राचा वापर करण्यात आला असला तरी कधी कधी त्याचा अतिवापर झाल्याचे दिसून आले. मध्यंतराच्या ठोक्याला नाटकाला दिलेली कलाटणी मात्र त्यामानाने रंजक वाटली. लेखक देसाई हेच दिग्दर्शक असले तरी त्यांच्या हातात करण्यासारखे विशेष काही नव्हतेच.

त्यातल्या त्यात काही झटापटीचे प्रसंग चांगले घेऊन त्यांनी नाटकाला उठाव देण्याचा प्रयत्न केला खरा. पण संहितेतच विशेष दम नसल्यामुळे हा त्यांचा प्रयत्न थिटा पडला. नाटकाच्या सुरुवातीला नाताळ असल्याचे दाखवून त्यांना काय साधायचे होते याचाही अर्थबोध होऊ शकला नाही. कदाचित खून नाताळाच्या दिवशी झाल्यामुळे त्यांनी सुरुवातीला नाताळची पार्श्वभूमी दाखवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असावा असे वाटते.

Bau Feast Play Review
Konkani Drama Competition: राकस, रहस्यनाट्याचे प्रभावी सादरीकरण; नाट्यसमीक्षा

या नाटकाची सर्वात मोठी त्रुटी म्हणजे पात्रांनी एकट्यानीच लांब लांब संवाद बोलणे. रहस्यमय नाटकाला ‘जुगलबंदी’ची आवश्यकता असते. अगदी छोट्या छोट्या संवादातून रहस्य फुलवावे लागते. पण इथे त्याचीच कमी भासली. अभिनयाच्या बाबतीतही उल्लेखनीय असे काहीच सापडले नाही.

लेखन व दिग्दर्शनाबरोबरच अश्वेक देसाईनी थॉमस डिसूझाची प्रमुख भूमिकाही साकारली. त्यांचा रुबाब व डायलॉग डिलिव्हरी योग्य वाटली तरी ते कॅथलिक असूनसुद्धा हिंदूप्रमाणे बोलत होते, ते खटकले. मध्यंतरात याबाबतीत प्रेक्षकांत जोरदार चर्चा सुरू होती.

Bau Feast Play Review
Konkani Drama Competiton: ऊठ गा देवा! गोंयकरांचे प्रश्न मांडणारे सादरीकरण; नाट्यसमीक्षा

इतर पात्रात रोहन म्हणजे अपघात नंतरचा नेथन फेर्नांडिस साकार केलेल्या नेहान देसाय यांनी आपल्या भूमिकेला बऱ्यापैकी न्याय दिला. पण तेही कॅथलिक असून सुद्धा हिंदूंसारखे बोलत होते. इतर पात्रांनी फक्त गाळलेल्या जागा भरण्याचे काम केले. अवनीश नार्वेकर यांची प्रकाश योजना त्यामानाने बरी वाटली.

वेद आमोणकर यांचे ध्वनी संकलन प्रयोगाला पूरक असे होते. विशाल मुळवी यांचे नेपथ्य बऱ्यापैकी होते. एकंदरीत रुद्रेश्वर संस्थेचे नाव पाहून नाटकाला आलेल्या प्रेक्षकांची स्थिती ‘खोदा पहाड और निकला चुहा’ सारखी झालेली बघायला मिळाली. तसा सूर नंतर प्रेक्षकांत उमटताना ऐकू येत होता. त्याचबरोबर मागील तीन नाटकांनी वाढविलेली स्पर्धेची लज्जत थोडी कमी झाल्यासारखी वाटली हेही तेवढेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com