
मिलिंद म्हाडगुत
आता कला अकादमीची कोकणी नाट्य स्पर्धा अकरा नाटके झाल्यामुळे जोषात यायला हवी होती. पण स्पर्धेचा उलटा प्रवाह सुरू झाल्यासारखे वाटायला लागले आहे. कालचे ‘अन कंडिशनल लव्ह'' हे नाटक उत्तम वाटावे एवढा आजच्या श्री देवी भगवती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पेडणे या संस्थेने सादर केलेल्या '' आमचां कुळ’ नाटकाचा प्रयोग सुमार झाला.
वास्तविक, या नाटकाचे लेखक अविनाश च्यारी व दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर ही तशी गोमंतकीय रंगभूमीवरची प्रख्यात नावे. त्यामुळे त्यांच्याकडून काहीतरी नावीन्यपूर्ण मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा एक टक्का सुद्धा पुरी होऊ शकली नाही. मुळात लेखकाला काय सांगायचं आहे याचा अर्थबोध शेवटपर्यंत होऊ शकला नाही. यातले मुख्य पात्र नाटक भर आपले कुळ व मूळ सांभाळायचे आहे, असे परत परत सांगताना दिसत होते.
त्यामुळे कदाचित या नाटकाला आमचां कुळ हे नाव दिले असावे. त्याचबरोबर गावातील एकोपा व सलोखा अबाधित राहावा, असेही या मुख्य पात्राच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.
आपली शेती सोडून युवक गावाला जातात यावरही हे नाटक आसूड ओढताना दिसले. मध्येच या पात्राने महिला शक्ती वरही'' लंबेचौडे'' भाषण झोडले. यामुळे नाटकाची अवस्था ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’, अशी झाल्यासाखी वाटली. तसे पाहायला गेल्यास वर नमूद केलेला प्रत्येक विषय ‘बर्निंग विषया’सारखाच आहे.
पण तो योग्यरित्या डेव्हलप करायला हवा होता. पण तिथेच या नाटकाचा बाज घसरला. खरं तर लोक कथेच्या ढंगाने जाणारे हे नाटक वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकले असते. पण लेखक संहितेला एक भरीव रूप देऊ न शकल्यामुळे आणि नंतर सादरीकरणाने दगा दिल्यामुळे एका रटाळ प्रयोगाचा अनुभव उपस्थित प्रेक्षकांना घ्यावा लागला.
यात पात्रे भरपूर; पण एकही पात्र लक्षात राहत नाही. दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर सुद्धा या संहितेला भरीव रूप देऊ शकले नाही. मुळात ही संहिता लोकांपर्यंत पोहोचविण्यात ते संपूर्णपणे अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच नाटक संपल्यानंतर प्रेक्षक नाटकाची कथा काय असे एकमेकांना विचारताना दिसत होते.
नाही म्हणायला गावातील दोन तरुण जमिनी करता भांडतात तो प्रसंग दिग्दर्शकाने त्या मानाने बऱ्यापैकी घेतला. बाकीचा सगळा ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’, अशातला प्रकार वाटला. पात्रांचे रंगमंचावर फिरणे म्हणजे ‘आओ जाओ, अपना घर'' सारखे वाटत होते.
आदिमाया हे पात्र आणण्याचे प्रयोजन काय हेही शेवटपर्यंत कळू शकले नाही. तशा या नाटकातील बऱ्याच गोष्टी अर्धवटच राहिलेल्या दिसल्या. गाव बुडतो असे सांगितले जाते; पण नंतर काय होते ते कळत नाही. मुख्य पात्र महादेवाचा, गणपतीचा मुखवटा घालून नाचतो कशाला, याचाही उलगडा होऊ शकला नाही.
मुख्य पात्राचे मन नाचत नाचत येऊन त्याला उपदेश करते हेही विचित्र आणि विसंगत दिसत होते. खरं तर या नाटकातील बहुतेक प्रसंग अगदी उपरे उपरेच वाटत होते. लोक कथेवर नाटक बसविणे हे एक आव्हानच असते आणि हे आव्हान पेलले तर एक सजग कलाकृती उभी राहू शकते.
नागमंडल, लोककथा ७८ अशी काही उदाहरणे देता येईल. पण इथे लेखक व दिग्दर्शक कमी पडल्यामुळे प्रभावी कलाकृती उभी राहू शकली नाही. अभिनयाबाबत तर काय लिहावे तेच कळत नाही. रंगमंचावर धावणे, एकमेकांच्या संवादांना ओव्हरलॅप करणे, तावातावाने ओरडणे ह्यालाच अभिनय म्हणत असावे, असे या नाटकातील पात्रांना बघून वाटत होते.
मुख्य पात्र झालेले अमर कोनाडकर हे तर नाटक भर एकच सुरात बोलताना आढळले. नाटक पेडण्याचे असल्यामुळे संवादाना असलेला ‘पेडणे फ्लेवर’ मात्र मनाला साद घालून गेला. बाकी नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत याबद्दल लिहिण्यासारखे काहीच आढळले नाही. उल्लेख करावा लागेल तो या नाटकातील आरत्या व समयोचित गाण्यांचा. पण या सकारात्मक बाबीही नाटकाला वाचवू शकल्या नाही हेही तेवढेच खरे.. एकंदरीत ‘आमचां कुळ’ या नाटकाचा प्रयोग दिशाहीन झाल्यामुळे स्पर्धेची रंगत घटल्यासारखी झाली एवढे मात्र खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.