Konkani drama competition, In Search of Survival play, Konkani theatre performance Dainik Gomantak
मनरिजवण

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

In Search of Survival play: ‘युवा एकवट’ भोम - फोंडा या संस्थेने सादर केलेल्या ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’ या नाटकाचा प्रयोग पाहताना या सर्जनशीलतेचा प्रत्यय ठायी ठायी येत होता.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: ‘युवा एकवट’ भोम - फोंडा या संस्थेने सादर केलेल्या ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’ या नाटकाचा प्रयोग पाहताना या सर्जनशीलतेचा प्रत्यय ठायी ठायी येत होता. ‘न्यू वेव्ह’ पठडीत बसू शकणारा असा हा नाट्यप्रयोग.

कोकणी नाट्य स्पर्धेतील हे अकरावे पुष्प. वैभव कवळेकर यांची ही संहिता लेखक श्रीधर नाईक व त्याची एक वाचक इशिता यांच्या भोवती फिरते. अपघात झालेल्या श्रीधर नाईक यांना इशिता आपल्या घरी आणते आणि तिथून नाटकाला सुरुवातहोते, नाटकाच्या सुरुवातीला अपघात ग्रस्त लेखक व त्याचा विविध प्रकारे छळ करणारी इशिता दिसते.

लेखकाने आपल्या ‘दि होप’या पुस्तकाचे चार खंड लिहिलेले असतात आणि यात अनू नावाच्या मुलीला मारलेले असते. इशिता या लेखकाला पुस्तकाचा पाचवा खंड लिहून अनुला जिवंत करायला सांगते आणि तो ऐकत नाही, म्हणून त्याला मारहाण करणे, व्हील चेअरवरून ढकलून देणे इत्यादी प्रकार करताना दिसते.

आता ती त्याला पाचवा खंड लिहायला का सांगते, त्या खंडातून अनुला जिवंत करावे, अशी मागणी का करते? याची उत्तरे नाटकाच्या उत्तरार्धात मिळतात. संहिता जरी सामान्यांच्या पचनी पडायला थोडी कठीण असली तरी सिनेमॅटिक अँगलने पुढे सरकणारी ही कथा ‘व्हिजुअल ट्रिट’ ठरली आहे.

या संहितेत प्रेक्षकांना विभिन्न प्रकार बघायला मिळतात. यात पार्श्वभूमीवर दिसणारी अनू आहे, सुरुवातीला विकृत वाटणारी पण नंतर आपल्या त्या स्वभावाचे स्पष्टीकरण देणारी इशिता आहे.

लेखक कवळेकर हेच दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी टप्प्या टप्प्यातून संहिता फुलवत नेली आहे. चार पात्रे (त्यातले एक किरकोळ) असूनसुद्धा रंगमंचाचा सुरेख वापर केला आहे. त्याकरता त्यांनी व्हील चेअरचा वापर करून रंगमंच खेळता ठेवला आहे.

व्हीलचेअर संपूर्ण रंगमंचभर फिरत असल्यामुळे प्रमुख तीन पात्रांच्या हालचालीनाही वाव मिळाला आहे. प्रकाशक बोरकर इशिताकडे येतो, तेव्हा वर बांधून ठेवलेला श्रीधर सुटकेकरता कळवळतो, तो प्रसंग दिग्दर्शकाने प्रभावीपणे घेतला आहे.

नेपथ्याचे तीन भाग करण्यात आले असून सुरुवातीला वरच्या भागात नाट्य घडते. तिथल्या दरवाजाचा तसेच जिन्याचाही दिग्दर्शकाने योग्य वापर केला आहे. दुसऱ्या दर्शनी भागात जिथे मुख्य नाटक आकाराला येते, तिथे व्हीलचेअरचा आधार घेऊन त्यांनी संघर्ष फुलविला आहे.

तिसऱ्या भागात जिथे इशिता लेखकाला पाचवा खंड लिहायला नेते तिथे लेखक व इशिता यांच्या ‘जुगलबंदी’द्वारा दिग्दर्शकाने नाट्याला एक सुबक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. पण मारहाणीचे प्रसंग मात्र जरा अतिच वाटतात.

कोणतीही बाई कितीही मुजोर असली तरी एखाद्या पुरुषाला एवढी मारहाण करेल, हे पटत नाही. त्याचे कारणही संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळेच इशिताने लेखकाला केलेली मारहाण अतिरंजीत वाटली. मात्र नाटक कुठेही रेंगाळणार नाही, याची दक्षता दिग्दर्शकाने घेतल्याचे दिसून आले. त्यात कलाकारांनी जीव ओतून काम केल्यामुळे नाटक अधिक रंगू शकले. खास उल्लेख करावा लागेल, तो इशिता झालेल्या आर्या तेली यांचा.

प्रकाशक बोरकर आल्यावर पिंजऱ्यात कोंडलेल्या उंदराकडे बोलत मागे बांधून ठेवलेल्या लेखकाला अप्रत्यक्षपणे चेतावणी देणारी तेली दाद घेऊन गेली. त्याचप्रमाणे लेखकाला ओढीत खालून वर नेतानाचा तसेच लेखक बसलेली व्हीलचेअर वेगाने फिरवीत असतानाचा त्यांचा अभिनयही उत्स्फूर्तच.

मात्र सुरुवातीला त्या प्रेक्षकांना पाठ करून बोलत होत्या, ते मात्र खटकले. त्यांना योग्य साथ दिली, ती साई कळंगुटकर यांनी. वास्तविक बराच वेळ खाटीवर पडून तसेच व्हीलचेअरवर बसून राहावे लागल्यामुळे ही भूमिका म्हणजे एक आव्हानच होते. पण योग्य मुद्राभिनय व'' बॉडी लँग्वेज'' द्वारा कळगुटकरांनी हे आव्हान पेलले.

अनू झालेल्या श्रीनिका नाईक यांनीही आपली भूमिका चांगली निभावली. पण या प्रयोगाचा ‘हिरो’ म्हणून प्रकाश योजना करणाऱ्या तेजस खेडेकर यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांची प्रकाश योजना खरोखर अफलातून होती. त्यामुळेच प्रयोगाला ‘सिनेमॅटिक फील’ येऊ शकला.

मध्यंतराच्या ठोक्यावर येणारे सूर्याचे किरण, लेखक व इशिता बोलत असताना वरच्या भागात दाखवली गेलेली अनू यासारखे अनेक प्रसंग खेडेकरांच्या सर्जनशीलतेचा दाखला देऊन गेले. तीन भागात केलेले राजन नाईक यांचे नेपथ्यही प्रयोगाला उठाव देणारे होते.

दिपतेज नाईक यांचे पार्श्‍वसंगीतही परिणामकारक होते. एकंदरीत स्पर्धात्मक मूल्ये असलेला ‘इन सर्च ऑफ सर्वांयवल’ या नाटकाचा प्रयोग एक वेगळी अनुभूती देण्याबरोबर स्पर्धेची रंगतही कायम ठेवून गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today News Live: लुथरा बंधूंना दिल्ली विमानतळावर गोवा पोलिसांकडून अटक

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

'पर्रीकरांच्या काळात असं नव्हतं, आत्ताच्या गोवा सरकारमध्ये सगळे हफ्ते मागतायेत'; माजी भाजप मंत्र्याचा गंभीर आरोप, केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT