Konkani Drama Competition: वृद्धांच्या व्यथा मांडणारी उत्कृष्ट कलाकृती, 'बापू-गांधी'

Bapu Gandhi Stage Play: या स्पर्धेतील हे दहावे पुष्प. डॉ. विवेक बाळे यांच्या ‘काटकोण-त्रिकोण’ या मराठी नाटकाचा कोकणी अनुवाद केला आहे, प्रख्यात नाट्यलेखक दत्ताराम कामत बांबोळकर यांनी.
Konkani Drama Competition
Konkani Drama CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कोकणी नाट्यस्पर्धा बहरात येत आहे. अंत्रुज घुडयो या संस्थेने सादर केलेल्या ‘बापू-गांधी’ या नाटकाने याचा प्रत्यय आणून दिला. दिग्दर्शन व अभिनय याचा सुंदर संगम साधला गेल्यामुळे एका उत्कृष्ट कलाकृतीचा अनुभव प्रेक्षकांना घेता आला.

या स्पर्धेतील हे दहावे पुष्प. डॉ. विवेक बाळे यांच्या ‘काटकोण-त्रिकोण’ या मराठी नाटकाचा कोकणी अनुवाद केला आहे, प्रख्यात नाट्यलेखक दत्ताराम कामत बांबोळकर यांनी. गांधी नावाचा एक क्राईम इन्स्पेक्टर ‘बापू’ नावाच्या ज्येष्ठ नागरिकाला झालेल्या अपघाताची चौकशी करण्याकरता त्याच्या घरी येतो, इथून नाटकाची सुरुवात होते.

बापूंच्या घरी त्यांचा मुलगा राहुल आणि सून भक्ती राहत असतात. गांधींच्या चौकशीत हळूहळू मुलगा सुनेकडून बापूंचा कळत-नकळतपणे होणारा छळ उलगडत जातो आणि तिथून सुरुवात होते एक थरारक नाट्य. आणि हे नाट्य प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.

सुरुवातीला हे नाटक बापूंचा अपघात की आत्महत्या याभोवती फिरताना दिसते. कधी तो अपघात वाटतो तर कधी आत्महत्या; पण नाटकाच्या दुसऱ्या अंकात इन्स्पेक्टर गांधी हा एक नियोजित खुनाचा प्रयत्न असल्याचे सांगितल्यामुळे नाटकाला वेगळीच कलाटणी मिळते.

आता खरेच तो अपघात असतो का आत्महत्या वा खुनाचा प्रयत्न याचे उत्तर नाटकाच्या शेवटी मिळते. वरवर हे नाटक रहस्यमय वाटत असले तरी त्याला असलेले भावनिक कंगोरे जास्त अंतर्मुख करून जातात. त्यामुळे जाता-जाता गांधींनी सांगितलेला, ‘वृद्धांना छोट्या छोट्या क्षणाचा आनंद उपभोगायला द्या’ हा संदेश जास्त अधोरेखित होतो.

मराठी नाटकाचा अनुवाद करताना बांबोळकरांनी कोकणी भाषेची नजाकत जोपासली असल्यामुळे संहितेचा जीव लहान असूनही ती मनाला भिडू शकली. छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी नाट्य फुलवत नेले आहे. त्यांचे संवादही समर्पक असल्यामुळे वातावरण निर्मिती होऊ शकली.

आणि त्याला रघुनाथ साकोर्डेकर व कलानंद बांबोळकर यांच्या सिद्धहस्त दिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे कपिलाषष्ठीचा योग साधला गेला. त्यामुळे केवळ तीन कलाकार असूनही नाटक कुठेच रेंगाळताना दिसले नाही. मुख्य म्हणजे दिग्दर्शकांनी रंगमंचाचा सुरेख वापर केला. घराची बाल्कनी, एन्ट्रीची पॅसेज, याचा वापर करताना पात्रांच्या मुव्हमेंटवरही चांगले लक्ष दिले.

खुनाचा आरोप केल्यावर वातावरण टेन्स झाले असताना इन्स्पेक्टर गांधींनी सिगारेट ओढीत बाल्कनीमध्ये बसणे, गांधींचे बापूमध्ये परिवर्तन होणे, बापू व राहुल दारू पीत असताना भक्तीचे मागून नवऱ्याला टिप्स देणे, शेवटचे तिघांचे मनोमीलन यासारख्या प्रसंगांतून दिग्दर्शकांनी आपले कसब सिद्ध केले.

पण या नाटकाचा परमोच्च बिंदू म्हणजे गांधी-बापू झालेल्या ज्येष्ठ रंगकर्मी रघुनाथ साकोर्डेकरांचा अभिनय. साकोर्डेकर हेही भूमिका अक्षरशः जगले आहेत. सुरुवातीचा काहीसा तापट, नंतरचा बेरकी व शेवटचा भावनाप्रधान असा गांधी आणि थकलेला पण मूल्ये जोपासणारा बापू यांच्या व्यक्तिरेखेचे विविध कंगोरे त्यांनी प्रभावीपणे साकारले.

Konkani Drama Competition
Konkani Drama Competition: ‘नाविन्या’च्या नादात वाट चुकलेला प्रयोग ‘रंग-सूत्र’; नाट्यसमीक्षा

गांधी व बापू या दोन भूमिका साकार करताना त्यांनी या दोन्ही भूमिकेतील बेअरिंग व्यवस्थितरीत्या सांभाळल्याचे दिसून आले. खासकरून गांधींचे बापूमध्ये अचानक तिथेच परिवर्तन होणे मनाला पटत नसले तरी साकोर्डेकरांच्या वेधक मुद्राभिनय व शारीरिक हालचालींमुळे हे ‘परिवर्तन’ मनाला भिडले.

त्यांना राहुल झालेल्या सुरेल तिळवे आणि भक्ती झालेल्या सुविधा तोरगल बखले यांनी तेवढ्याच तोला-मोलाची साथ दिली. तिळवेंनी काहीसा गोंधळलेला राहुल समर्थपणे उभा केला.

Konkani Drama Competition
Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

सासऱ्यांनी दिलेल्या तक्रारींचा पाढा वाचणाऱ्या, खुनाचा आरोप झाल्यावर बावरलेल्या भक्तीला बखले यांनी आपल्या अभिनयाने चांगला न्याय दिला. मोहित विश्वकर्मा यांचे नेपथ्य प्रसंगानुरूप होते. विशाल गावडे यांची प्रकाशयोजना प्रयोगाला उंची देऊन गेली. खासकरून गांधींचे बापूत परिवर्तन होते त्या प्रसंगातील प्रकाशयोजना दाद देण्यासारखीच.

प्रसन्ना कामत यांचे पार्श्वसंगीत सिनेमाच्या पार्श्वसंगीतासारखे वाटत होते. एकंदरीत ‘बापू गांधी’ या नाटकाच्या प्रयोगाने कालच्या ‘रंगसूत्र’ नाटकमुळे स्पर्धेत आलेली मरगळ दूर तर केलीच त्याचबरोबर सृजनशीलतेचा एक नवा मानदंडही निर्माण केला. नाटकाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com