When question of nepotism surrounds the national and regional parties  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

घराणेशाहीचा प्रश्‍‍न राष्‍ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना घेरू लागतो तेव्हा

आता घराणेशाहीच्या मुद्द्यावर वर्षअखेर निश्‍चित शिक्कामोर्तब होईल असा होरा वर्तविण्यात आला आहे.

शंभू भाऊ बांदेकर

जसजशी गोवा विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे, तशा तीन गोष्‍टी प्रकर्षाने ऐरणीवर येत आहेत. त्‍या म्‍हणजे प्रत्‍येक पक्षाच्‍या रणनीतीला वेग येत आहे. आरोप, प्रत्‍यारोपांचे फड गाजत आहेत आणि घराणेशाहीचा प्रश्‍‍न राष्‍ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना घेरू लागला आहे. जे उमेदवार या बाबतीत इच्छुक आहेत, त्‍यांच्‍या मनासारखे झाले नाही, तर ते घेरी येऊन पडतील किंवा ज्‍या पक्षाने त्‍यांना दूर केले आहे, त्‍या पक्षाचा त्‍याग करून ते त्‍या पक्षालाच जेरीस आणण्‍याचा प्रयत्‍न करतील.

तृणमूल काँग्रेसच्‍या अध्‍यक्ष तथा पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी या गोव्‍यात आल्‍यावर प्रादेशिक पक्षांचे नेते, अपक्ष आमदार रोहन खंवटे आदींनी जशी त्‍यांची भेट घेतली, त्‍याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे अध्‍यक्ष तथा दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल हे जेव्‍हा गोव्‍यात आले, तेव्‍हा त्‍यांचीही भेट घेण्‍यात आली. एकूण युतीच्‍या रणनीतीचे भवितव्‍य त्‍यातून लवकरच निश्‍चित होणार आहे. काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधींच्‍या गोव्‍यातील दौऱ्यातही हे चित्र दिसून आले आहे. दिवाळीनंतरच या युतीबाबतचे चित्र स्‍पष्‍ट होऊ शकेल, असा अंदाज आहे.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणीही गोव्‍यात येऊन निवडणूक लढविली, तरी त्‍याचा भाजपवर परिणाम होणार नाही. त्‍याचा आमच्‍या पक्षाला काहीच फरक पडणार नाही, असे सूतोवाच केले असले, तरी ममतादीदींच्‍या गोव्‍यातील आगमनावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जी अश्‍लाघ्य नारेबाजी केली, तृणमूलच्‍या बॅनर्स, होर्डिंग्‍जचे विद्रुपीकरण केले आणि विमानतळावर हिंदुत्‍ववाद्यांनी ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा देऊन त्‍यांना नामोहरम करण्‍याचा प्रयत्‍न केला, ते सच्चा भाजपनिष्ठावंतांनाही मानवले नसावे.

याउलट आपने काय केले, त्‍याचे उदाहरण आपल्‍यासमोर आहे. गोव्‍यातील राजकारणातील सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या आमदारांच्या निषेधाचा आपने अहिंसक पण संबंधित आमदारांना झोंबणारा प्रकार शोधून काढला होता. कॉग्रेस सोडून भाजपात सत्तासंपत्तीच्या आमिषाने प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ दहा आमदारांना ‘आप’चे कार्यकर्ते केकची भेट देत होते. अर्थात कुठल्या राजकीय पक्षाने कुठल्या प्रकारे निषेध करावा, कशी शेरेबाजी करावी हे त्या पक्षांच्या म्होरक्यांवर अवलंबून असते. मागे सिध्दी नाईक प्रकरणाचा छडा लावण्यास सरकार अपयशी ठरले, म्हणून कॉंग्रेसने राजधानीत शांतपणे मेणबत्ती मोर्चा काढला, तर तोही उधळून लावण्यात आला होता.

आता घराणेशाहीच्या मुद्द्यावर वर्षअखेर निश्‍चित शिक्कामोर्तब होईल असा होरा वर्तविण्यात आला आहे. घराणेशाहीच्या संदर्भात सोनिया गांधी या कॉग्रेसच्या अध्यक्ष असताना त्यांनी एका वाहिनीसाठी दिलेल्या मुलाखतीची आठवण होते. त्यांना घराणेशाहीबाबत विचारले तेव्हा त्या उत्तरल्या होत्या. ‘डॉक्टरचा मुलगा जर डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा जर इंजिनियर होऊ शकतो तर आम्हा राजकारण्यांची मुले राजकारणात येणे नैसर्गिकच’ या घराणेशाहीची सुरुवात पं. नेहरू- इंदिरा गांधी, राजीव गांधी- सोनियापासून ते प्रियांका राहुलपर्यंत पोचलेली आपणांस दिसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव पवार, त्यांचे पुतणे अजितदादा व कन्या सुप्रिया सुळे, तसेच नारायण राणे - नीलेश राणे, किंग मेकर बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उध्‍दवराव, नातू आदित्य, पुतण्या राज ठाकरे अशी महाराष्ट्र राज्यातील काही उदाहरणे आपल्यासमोर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यानी एकदा नेहरू-गांधी घराण्याचा पाढा वाचत घराणेशाहीवर टोमणा मारला होता. त्यावर उत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेसचेअध्यक्ष पवार उद्‍गारले होते, नेहरू-गांधी घराण्यातील घराणेशाही दिसते, पण या घराण्याचा त्याग त्यांनी देशासाठी पत्करलेले हौतात्म्य कुणी लक्षात घेत नाही, याचे दुःख होते.’

ही घराणेशाही इतरत्रही आढळते. त्याची ठळक उदाहरणे म्हणजे मुलायमसिंग यादव कुटुंब (समाजवादी पक्ष), लालुप्रसाद यादव कुटुंब (राष्ट्रीय जनता दल), पटनायक कुटुंब (बिजू जनता दल), अजितसिंह कुटुंब (राष्ट्रीय लोकदल),रामविलास पासवान कुटुंब (लोकशक्ती जनता पक्ष), करुणानिधी कुटुंब (द्रमुक), अब्दुल्ला कुटुंब (नॅशनल कॉन्‍फरन्स), सईद कुटुंब (पीडीपी), अशा काही कुटुंबांची व पक्षांची नावे सांगता येतील. अर्थात घराणेशाहीवर आसूड ओढणारा भारतीय जनता पक्षही याला अपवाद नाही. वसुंधराराजे (राजस्‍थान), येडियुरप्पा(कर्नाटक), ठाकूर (हिमाचल प्रदेश), राजनाथसिंह, लालजी टंडन, कल्याणसिंह (उत्तर प्रदेश), महाजन, मुंडे, खडसे (महाराष्ट्र) ही त्यातील काही ठळक उदाहरणे.

गोव्यात प्रतापसिंह राणे- पिता-पुत्र, रवी नाईक (पिता-पुत्र), आलेमाव बंधू, कन्या व पुतण्या ही नावे व ढवळीकर बंधू आघाडीवर पूर्वीपासून आहेत. यात आता भाजपानेही भर घातली आहे. विश्‍वजीत राणे- डॉ. दिव्या, बाबू कवळेकर-सावित्री कवळेकर, मायकल लोबो- डिलायला लोबो या पती- पत्नींची नावे ऐरणीवर आहेत, तर गोवा फॉरवर्डचे किरण कांदोळकर- कविता कांदोळकर यांचा प्रचार जोरात सुरू आहे. कांदोळकर जोडप्याला गोवा फॉरवर्डने हिरवा कंदील दाखविला असला तरी भाजप गोटात सामसूम आहे. तेथे बेबनाव झाला तर पती भाजपात आणि पत्नी अन्य पक्षात किंवा अपक्ष असे वळण लागू शकते. आताही घराणेशाही लोकशाही मार्गाने जाते की हुकूमशाही मार्ग पत्करते याचे चित्र नवीन वर्षात स्पष्ट होऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT