गोव्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कचाट्यात सापडला होता

गोव्यातील कम्युनिस्ट विचारांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या ‘गोवन पीपल्स पार्टी’ने याच काळात सशस्त्र उठाव करण्याच्या योजनेवर विचार चालविला होता.
गोव्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कचाट्यात सापडला होता
गोव्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कचाट्यात सापडला होताDainik Gomantak
Published on
Updated on

7 नोव्हेंबर 1917 रोजी शीतमहालावर चढाई करणाऱ्या रशियातील बोल्शेविक क्रांतिकारकांनी जगाला साम्राज्यवादी विळखा घालणाऱ्या पाश्चात्य भांडवलशाहीवर अभूतपूर्व प्रहार केला. “राष्ट्रांच्या समानतेचे तत्त्व आणि अल्पसंख्याक राष्ट्रकांचे अधिकार यांची भांडवलदारी राष्ट्रांनी - त्यांची संविधाने ‘लोकशाहीवादी’ असूनही - जी सर्रास पायमल्ली चालवलेली आहे ती कम्युनिस्ट पक्षांनी, संसदेत तसेच संसदेबाहेर, प्रचार आणि चळवळीच्या माध्यमातून उघडी पाडली पाहिजे” अशी भूमिका राष्ट्रीय आणि वसाहतींच्या प्रश्नावर ‘कम्युनिस्ट इंटरनॅशनल’ला सादर केलेल्या प्रबंधात लेनिन यांनी मांडली. तसेच वसाहतींमधील क्रांतिकारक चळवळींना सर्व कम्युनिस्ट पक्षांनी प्रत्यक्ष मदत पुरविली पाहिजे, हेही त्यांनी अधोरेखित केले. झारशाहीने गुलाम बनवलेल्या राष्ट्रकांना क्रांतीनंतर मिळालेला स्वयंनिर्णयाचा अधिकार, ‘कसेल त्याची जमीन’ या तत्त्वावर केलेले जमिनीचे पुनर्वाटप, सार्वत्रिक मतदानाचा अधिकार यांसारख्या नव्या सोविएत सत्तेच्या धोरणांनी जगभरातील दडपलेल्या समुदायांना प्रभावित केले. पोर्तुगीज सत्तेच्या जोखडाखाली पिचलेला गोवासुद्धा त्याला अपवाद नव्हता.

1910 या वर्षी पोर्तुगालमध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर निर्माण झालेल्या जनवादी वातावरणाने शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी पोर्तुगालमध्ये असणाऱ्या गोमंतकीयांत भारतीयत्वाची जाणीव जागवली होती. गोव्यात येऊन येथे स्वातंत्र्याची चळवळ रुजविण्याच्या उद्देशाने 1925 साली स्थापन झालेल्या ‘सेंत्रु नासिओनालिस्त इंदियानु’ या संस्थेच्या सदस्यांसमोर बोलताना “मी हिंदी राष्ट्रीय पक्षाचा आहे. तथापि गांधींची अनत्याचारी असहकारिता मला पसंत नाही. माझी श्रद्धा आहे की, हत्यारयुक्त राज्यक्रांतिशिवाय पोर्तुगीज हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. म्हणून रशिया देश नि युरोपातील मजुरवर्ग ह्यांच्यापाशी सहाय्य मागणं हाच एक मार्ग दिसत आहे, ‘कम्युनिस्ट इंटरनॅशनल’कडून आपल्याला युद्धसाहित्य मिळू शकेल, असा विश्वास संघटनेच्या संस्थापकांपैकी एक फेर्नांदु कॉश्त यांनी व्यक्त केला होता. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोव्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कचाट्यात सापडला. गोव्यातील खनिजावर डोळा ठेवून असलेल्या अमेरिकेतील भांडवलदारांनी गोव्यात अमेरिकन लष्कराचा तळ उभारण्याची खटपटही सुरू केली होती.

गोव्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कचाट्यात सापडला होता
राजकीय स्त्रीशक्ती: नारा 50 टक्के महिला राखीवतेसाठी

अशा वेळी सोविएत रशिया भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. डिसेंबर 1961 मध्ये भारत सैनिकी कारवाईच्या तयारीत असताना 17 डिसेंबर रोजी रशियाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रेझनेव्ह यांनी मुंबईतील भाषणात भारताच्या सैनिकी कारवाईला रशियाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच सैनिकी कारवाईनंतर पोर्तुगाल सरकारने गोव्याचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडे नेल्यावर रशियाने व्हेटोचा अधिकार वापरून गोवा निर्विवादपणे भारताचा भाग होण्याचा मार्ग मोकळा करून दिला. श्यामराव मडकईकर, नारायण पालेकर, जॉर्ज वाझ, जेराल्ड पेरेरा, मारिओ रॉड्रिग्ज, काशिनाथ तेंडुलकर, दिवाकर काकोडकर यांसारख्या अनेक गोमंतकियांना स्वातंत्र्य आणि समतेसाठी संघर्ष कऱण्याची प्रेरणा आणि सैद्धांतिक दृष्टी बोल्शेविक क्रांती आणि लेनिनवादाने दिली. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पारतंत्र्यात जखडलेला होता. अशा वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, मणिपूर, बंगाल यांसारख्या देशाच्या विविध भागांतील कम्युनिस्टांनी गोव्याच्या मुक्तिलढ्यात सामील होऊन अमानुष अत्याचार सोसले. नित्यानंद साहा, कल्याण शर्मा, कर्नाल सिंग, मधुकर चौधरी, ब्रिजनंदन शर्मा, सुरी सीतारामन, जगमोहन राव, बाबुराव थोरात यांसारख्या कम्युनिस्टांनी हौतात्म्य पत्करले.

गोव्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कचाट्यात सापडला होता
तिकीटाचा नाही पत्ता आणि प्रचारासाठी चाललाय आटापिटा

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी नाते जोडून भारतीय राष्ट्रवादी भूमिकेतून व्यापक आणि संघटित वसाहतवादविरोधी चळवळ गोव्यात रुजविणारे त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा पहिल्या महायुद्धाच्या काळात फ्रान्समध्ये होते. रशियातील क्रांतीने दिलेल्या उभारीतून युरोपातील देशादेशांमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन होऊ लागले होते. कुन्हा फ्रेंच कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. या दरम्यान सोविएत रशियात जाऊन तेथील समाजवादी प्रयोगाची ओळखही कुन्हा यांनी करून घेतली. ‘पोर्तुगीज समस्या’, ‘साम्राज्यवाद म्हणजे काय’, ‘गोमंतकीयांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ यांसारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या ठरलेल्या कुन्हा यांच्या लिखाणावर मार्क्सवादी-लेनिनवादी विश्लेषणपद्धतीची ठसठशीत छाप दिसून येते. पोर्तुगीज कम्युनिस्ट पक्षाने लष्करी कारवाईत माहीर असणाऱ्या एका नेत्याला गोव्यात धाडले होते. ‘एलएन’ या टोपण नावाने ते गोव्यात वावरत असत. गोव्यातील कम्युनिस्ट विचारांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या ‘गोवन पीपल्स पार्टी’ने याच काळात सशस्त्र उठाव करण्याच्या योजनेवर विचार चालविला होता. असा उठाव झाल्यास काही लष्करी अधिकारी ‘गोवन पीपल्स पार्टी’ला मदत करू शकतील, असे आश्वासन ‘एलएन’ यांनी दिले होते. सर्वच कम्युनिस्ट पक्षांनी देशांमधील लोकशाहीवादी मुक्तिलढ्यांना साहाय्य केले पाहिजे; तसेच सर्वाधिक सक्रिय साहाय्य देण्याची जबाबदारी, आर्थिकदृष्ट्या ज्या देशांवर अवलंबून आहेत तेथील कामगारांवर आहे, असे लेनिन यांनी बजावले होते. मानवजातीला पारतंत्र्याच्या बेड्यांतून मुक्त करण्याच्या ध्येयासाठी प्रसंगी तुरुंगवास पत्करणारी माणसे तेव्हा पोर्तुगालमध्ये होती, म्हणूनच, त्या व्यक्तिमत्त्वांसाठी प्रेरणेचा अक्षय स्रोत ठरलेल्या रशियन बोल्शेविक क्रांतीचे गोवामुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षात स्मरण न करणे अगदीच कृतघ्नपणाचे ठरेल.

-नारायण आशा आनंद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com