पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. गोव्याच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार करतो, असं वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केलं आहे. आम्ही गोव्यात पराभव स्वीकारला आहे. मात्र आम्ही जनतेसाठी काम करत राहू असंही चिदंबरम पुढे म्हणाले आहेत.
आम्हाला गोव्यात काही मतदारसंघात खूप कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. गोव्यातील (Goa) जनतेने राज्याची धुरा पुन्हा भाजपच्या हातात सोपवण्याचा निर्णय दिला आहे आणि आम्हाला तो मान्य आहे, असं वक्तव्य पी चिदंबरम यांनी केलं आहे. मात्र गोव्यातील जनतेला बदल हवा आहे, असंही ते म्हणाले. भाजपला केवळ 33 टक्के मतं मिळाली आहेत. बरेच मतदार विभागले गेल्याने त्याचा फटका काँग्रेसला (Congress) बसला आहे. भाजपविरोधी मतं विभागली गेल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर झाला असल्याचंही चिदंबरम यांनी स्पष्ट केलं आहे.
या निवडणुकीत तरुण, नव्या आणि शिक्षित उमेदवारांनी चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे गोव्यात एक जबाबदार विरोधीपक्ष म्हणून काँग्रेस कामगिरी बजावेल, असं वक्तव्य गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केलं आहे. मात्र हा निकाल अनपेक्षित आहे असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान गिरीश चोडणकर यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. 67 टक्के मतदारांनी भाजपच्या (BJP) विरोधात मतदान केलं आहे. पक्षांतर करणारे 7 आमदार पराभूत झाले आहेत. त्यामुळे गोव्याच्या जनतेचा हा कौल आम्हाला मान्य आहे, असं गिरीश चोडणकर म्हणाले आहेत. तसंच आपल्या जागी पक्षाने नवा प्रदेशाध्यक्ष नेमावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. काँग्रेसचे 7-9 उमेदवार मतांच्या विभागणीमुळे हरल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.