गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्थातच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मतदान पार पडले. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या मतदारसंघाचे प्रभारी आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते संजय भेगडे यांनी गेल्या पंचवार्षिकपेक्षा अधिक बहुमताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निवडून येतील, असा दावा केला आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीमधील शानदार विजयाची पुनरावृत्ती गोव्यातील साखळी मतदारसंघामध्ये होईल, असेही ते म्हणाले. भेगडे त्यावेळी पंढरपूर-मंगळवेढ्याचे प्रभारी होते. (Sanjay Bhegade Claimed That Pramod Sawant Will Be ReElected From The Sanquelim Constituency)
दरम्यान, भाजप पुन्हा एकदा गोव्यात आपली सत्ता स्थापन करण्यामध्ये यशस्वी होणार आहे. विशेष म्हणजे पक्षाला बहुमत मिळेल. गोव्यातील 40 पैकी भाजपला (BJP) 22 जागा मिळणार असल्याचा दावा गेल्या महिन्याभरापासून गोव्यामध्ये तळ ठोकून बसलेले महाराष्ट्रातील माजी आमदार संजय भेगडे (Sanjay Bhegade) यांनी केला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीमधील (Goa Assembly Election 2022) भाजपचे प्रभारी आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये पहिल्यांदा आमदार भेगडेंचा भाजपकडून समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे फडणवीसांनी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साखळी मतदारसंघामधून पुन्हा एकदा निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. त्यानंतर आमदार भेगडे उत्तर गोव्यामधील साखळी मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसले होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या विजयाची गणितं मांडताना भेगडे म्हणाले, साखळीमध्ये पक्षसंघटनेची चांगली बांधणी झाल्यामुळे नाविन्यपूर्ण रितीने काम करता आले.
तसेच, 28 हजार 42 मतदार असलेल्या साखळी मतदारसंघात प्रथमच मतदानासाठी जाणाऱ्या दोन हजार 275 नवमतदारांचे प्रत्येक बूथवर जाऊन स्वागत करण्यात आले आहे. मतदारसंघामधील पेजप्रमुखासह बूथप्रमुखांचा मेळावा घेतला. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले.
शिवाय, मागील दहा वर्षामध्ये गोव्यात जी विकासाची कामे झाली, त्यामुळे जनता भाजपला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये 22 जागा मिळवत भाजप बहुमताचा आकडा पार करेल. त्यामधून राज्याला स्थिर सरका मिळेल, असा दावा साखळी मतदारसंघाचे प्रभारी आणि मावळचे आमदार भेगडे यांनी केला आहे. मात्र भेगडेंचा हा दावा खरा ठरतो का हे लवकरच पाहायला मिळेल. राज्यात आप आणि नव्याने एन्ट्री केलेल्या तृणमुल कॉंग्रेसने उभे केलेले आव्हान मोठे नाही. महाराष्ट्रवादी गोमन्तवादी पक्ष आणि कॉंग्रेस या जुन्या खेळाडूंसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जोर लावला आहे. मात्र या सर्वच पक्षांना आम्ही त्यांची जागा दाखवणार आहोत, असं देखील त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.