Ravi Naik
Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

रवी नाईक-संदीप खांडेपारकरांची फोंड्यात होणार ‘काँटे की टक्कर'

दैनिक गोमन्तक

फोंडा: अखेर गुरुवारी रवी नाईक यांच्या उमेदवारीच्या रहस्याची उकल झाली. गेली कित्येक दिवस रवी कॉंग्रेस की भाजपतर्फे निवडणूक लढविणार, मडकईतून की फोंड्यातून, फोंड्याची भाजपची उमेदवारी रवींना की त्यांचे पुत्र रितेशना, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता रवींना फोंड्यातील भाजपची उमेदवारी मिळाल्यामुळे या सर्व प्रश्नांवर पडदा पडला आहे.

(Ravi Naik candidature for Goa assembly elections confirmed from ponda)

भाजपची (Goa BJP) फोंड्यात असलेली 6 हजार मते अधिक रवींची वैयक्तिक 3 ते चार हजार मते गृहीत धरून रवी (Ravi Naik) फोंड्याचा गड सर करतील, अशी आशा भाजपश्रेष्ठींना वाटत आहे. मागच्या वेळी रवींना 9,500 तर भाजपच्या सुनील देसाईंना 6,500 मते प्राप्त झाली होती. मगोपचे लवू मामलेदार यांना ३,७४० मते प्राप्त होऊन ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. रवी हे फोंड्यातून पाचवेळा निवडून आलेले एकमेव आमदार. 1984 साली मगोपच्या उमेदवारीवर तर 1999, 2002, 2007, आणि 2017 मध्ये ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. यामुळे रवी हे सर्वात अनुभवी उमेदवार म्हणून ओळखले जातात. पण रवींना उमेदवारी दिल्यामुळे फोंड्यातील (Ponda) भाजपमध्ये ‘सुंदोपसुंदी’ सुरू झाली असून त्याचे पर्यवसान कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच संदीप खांडेपारकर यांच्या अपक्ष उमेदवारीत होण्याची शक्यता दिसत आहे. संदीप हे कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रात तरी प्रभावी उमेदवार म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांची सौभाग्यवती रुक्मा खांडेपारकर या पंच असून त्यांनी सरपंचपदही भूषविले आहे. तसेच संदीप हेही सरपंचपदी होते. त्यामुळे त्यांचा या भागातील मतदारांशी दांडगा संपर्क आहे. सध्या ते घरोघरी फिरत असून त्यांना फोंड्यातील काही डॉक्टरही पाठिंबा देताना दिसत आहेत. खांडेपारकर रिंगणात उतरल्याचा फटका भाजपसह कॉंग्रेस व मगोपलाही बसू शकतो. त्यामुळे कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रातील मतांचे विभाजन होऊन एखाद्या उमेदवाराला अल्प आघाडी मिळू शकते. त्याकरिता उमेदवारांना पालिका क्षेत्रातील मतदारांवर जास्त भिस्त ठेवावी लागेल. कुर्टी खांडेपार पंचायत सध्या विस्तारली असून या क्षेत्रातील मतदारांची संख्या १२ हजारांच्या वर गेली आहे.

पालिकेतील संगीतखुर्ची भोवणार

फोंडा पालिका क्षेत्रात 15 प्रभाग असून सध्या ही पालिका मगोपच्या ताब्यात आहे. पण फोंडा पालिकेतील ‘संगीत खुर्ची’च्या खेळामुळे लोक नाराज आहेत. गेल्या पावणेचार वर्षांत फोंडा शहरात कोणताही मोठा प्रकल्प आला नसून नगरसेवक हे विकासापेक्षा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या संगीत खुर्चीच्या खेळात मग्न असल्याचा आरोप नागरिक करताना दिसत आहेत. त्यामुळे मते वळवण्याच्या दृष्टीने नगरसेवकांचा किती उपयोग होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. त्याकरिता स्वतःच्या हिमतीवर उमेदवारांना लोकांना आकर्षित करावे लागणार आहे.

वेरेकरांची जादू चालणार?

कॉंग्रेसचे राजेश वेरेकर यांनी सध्या फोंडा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. वेरेकर यांना गेल्या खेपेला अपक्ष म्हणून 4500 मते प्राप्त झाली होती. ती आणि फोंड्यातील कॉंग्रेसची मते धरून वेरेकर विजयाचा किनारा गाठू शकतील, अशी आशा त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. ते फोंड्यातून दोनवेळा निवडून आलेले माजी मंत्री शिवदास वेरेकर यांचे पुत्र असल्यामुळे तीही त्यांची जमेची बाजू ठरू शकते.

चौरंगी लढतीची शक्यता

मगोपतर्फे डॉ. केतन भाटीकर हे जोरदार प्रचार करीत आहेत. त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्याचे जाहीर केले असले तरी पालिका कक्षेतील बऱ्याच घरांत ते अजून पोहचले नसल्याचे सांगितले जाते. फोंड्यात भाजपसारखीच कॉग्रेसचीही पारंपरिक अशी मते आहेत. रवी नाईक यांनी थेट प्रचार सुरू केला नसला तरी त्यांच्या बेतोडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये त्यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यांच्या कार्यालयात प्रचंड गर्दी होत असून त्याद्वारे त्यांचा प्रचार होत असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. विद्यमान परिस्थितीत कॉंग्रेस, भाजप, मगोप आणि अपक्ष संदीप खांडेपारकर रिंगणात उतरल्यास चौरंगी लढत होऊ शकेल.

...तर रवींचा सहावा विजय

रवी सहाव्यांदा निवडून येतात की, त्यांच्या विजयरथाला कॉंग्रेस वा मगोप अडथळा ठरतात, हे बघावे लागेल. पण गेली 10 वर्षे गोव्यातील हा महत्त्वाचा मतदारसंघ मंत्रिपदाविना असल्यामुळे बराच मागे पडल्यासारखा आहे. त्यामुळे यावेळी तरी फोंड्याला मंत्रिपद मिळू दे, अशी आशा लोक व्यक्त करताना दिसत आहेत. आता त्यांची ही आशा फलद्रुप होते का, या ‘हायव्होल्टेज’ लढतीत कोण यशस्वी होणार, याचे उत्तर येणारा काळच देईल, हे निश्चित!

‘आप’ घेणार कॉंग्रेसची मते

‘आप’तर्फे ॲड. सुरेल तिळवे यांना उमेदवारी दिली असून त्यांनी शांतीनगरमध्ये कार्यालय उघडले आहे. ‘आप’ला मुस्लिम समाजाची मते मिळू शकतात, असा होरा व्यक्त केला जात आहे. पण या संभाव्य चौरंगी लढतीत ‘आप’ नेमका कोठे बसू शकेल, हे सांगणे कठीण आहे. पण ‘आप’ जेवढी मते घेईल, तेवढे कॉंग्रेसचेच नुकसान होऊ शकते. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे सनिष तिळवे हे रिंगणात असून त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे फोंड्यातील लढत ‘कॉंटे की टक्कर’ होणार हे निश्चित झाले आहे.

मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT