Rajesh Patnekar in Bicholim Constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

डिचोलीत राजेश पाटणेकर ‘चक्रव्युहात’?

अंतर्गत कलह,रोजगार मुद्दा भोवण्याची शक्यता, चंद्रकांत शेट्ये, नरेश सावळांचे तगडे आव्हान

आदित्य जोशी

डिचोली हा उत्तर गोव्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सभापती राजेश पाटणेकर हे करीत आहेत. पाटणेकरांची राजकीय सुरुवात तशी सनसनाटीच झाली. पण सध्या स्थिती थोडी निराळी आहे. एका बाजूला नोकऱ्या न मिळाल्यामुळे संतप्त झालेले युवक तर दुसऱ्या बाजूला शिल्पा नाईक यांना उमेदवारी न दिल्यामुळे खवळलेले त्यांचे कार्यकर्ते या ‘चक्रव्युहात’ सध्या पाटणेकर सापडलेले दिसताहेत. कार्यकर्त्यांच्या भळभळणाऱ्या जखमेवर मलमपट्टी लावण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी संभाव्य सरकारात पाटणेकरांना मंत्रिपद देणार,अशी घोषणा केली आहे. पण ही ‘जर तर’ची भाषा कार्यकर्त्यांच्या किती पचनी पडते हे बघावे लागेल. (Rajesh Patnekar in Bicholim Constituency News Updates)

राजेश पाटणेकरांना 1999 मध्ये मगोपचे (MGP) उमेदवार तथा माजी मंत्री पांडुरंग राऊत यांच्याकडून केवळ नव्वद मतांनी पराभव स्वीकारावा लागला. पण 2002 साली त्यांनी राऊतांना चितपट करून या पराभवाची सव्याज परतफेड केली. 2007 साली त्यांनी कॉंग्रेसचे नरेश सावळ यांना हरवून विजयाची पुनरावृत्ती केली. 2012 सालच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चूक केली. आणि त्यांना त्यांचे फळ पराभवात मिळाले. अपक्ष नरेश सावळ यांनी पाटणेकरांचा जवळजवळ 2000 मतांनी पराभव केला.

2017 साली पुन्हा बाजी उलटवून मगोपचा आसरा घेतलेल्या सावळांचा पाटणेकरांनी 600 मतांनी पराभव केला. पाटणेकरांचे विशेष म्हणजे ते तीन वेळा निवडून येऊनही एकदाही मंत्री झाले नाहीत. आणि त्याचेच परिणाम सध्या त्यांना डिचोलीत भोगावे लागताहेत.मंत्रिपदी नसल्यामुळे ते मतदारसंघातील युवकांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत. आणि त्यांनी मतदारसंघातील युवकांची जी यादी दिली होती. त्यापैकी बऱ्याच जणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत,अशी माहिती प्राप्त झाली आहे. आणि त्याचे पडसाद सध्या डिचोलीत उमटताना दिसत आहेत.

त्याचबरोबर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले डॉ. चंद्रकांत शेट्ये तसेच मगोपचे उमेदवार नरेश सावळ यांनीही पाटणेकरांपुढे जबरदस्त आव्हान उभे केले आहे. डॉ. शेट्ये यांना मेणकुरे, लाटंबार्से, मुळगाव, साळ या भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याबरोबर माजी मंत्री पांडुरंग राऊतांसह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत. त्यात परत त्यांना ‘आप’ने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची शक्ती वाढल्यासारखी झाली आहे. मगोपचे उमेदवार माजी आमदार नरेश सावळ हे ही सध्या झपाटल्यासारखे प्रचार करीत असून त्यांनाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. सावळ हे माजी आमदार असल्यामुळे त्यांचा या भागातील जनतेशी चांगलाच संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या कोपरा बैठकांना चांगलीच गर्दी होताना दिसत आहे.

कॉंग्रेसतर्फे (Congress) मेघश्याम राऊत हे रिंगणात उतरले असले तरी पाटणेकर डॉ. शेट्ये व सावळ यांच्या तिरंगी लढतीत ते नेमके कोठे बसतात, हे बघावे लागेल. 1994 साली निवडून आलेल्या पांडुरंग भटाळे नंतर या मतदारसंघात कॉंग्रेसने एकदाही यश मिळविले नाही. आता राऊत या कोंडीचा कसा निकाल लावतात हे पाहावे लागेल. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे अनिश नाईक हे रिंगणात उतरले असून ते किती प्रभाव टाकू शकतात हे सांगणे कठीण आहे. एकंदरीत सध्या परिस्थिती सभापतीच्या विरोधात वाटत असली तरी यावर सभापती कसा मार्ग काढतात, सावळ, डॉ. शेट्ये यांच्या आव्हांनाना पुरून उरून चौथ्यांदा विधानसभेत पोहचतात,का हे लवकरच कळेल.

बेरोजगारी ऐरणीवर !

नोकऱ्या का दिल्या गेल्या नाहीत, याचे उत्तर देताना पाटणेकरांची दमछाक होताना दिसते. दुसऱ्या बाजूला भाजपच्या (BJP) ज्येष्ठ कार्यकर्त्या तसेच माजी जि. पं. सदस्य शिल्पा नाईक यांना उमेदवारी न दिल्यामुळे काही ठिकाणी पाटणेकर विरोधी वातावरण तयार झाले आहे. नुकताच मेणकुरे येथे याचा प्रत्यय आला. तेथे पाटणेकरांचे काका कांता यांना रोषाला सामोरे जावे लागले. खरा रोष मुख्यमंत्र्यांवर. पण पोलिसांच्या ‘एस्कॉर्ट व्हॅन’ मुळे मुख्यमंत्री तेथून निसटू शकले.

भाजप केंद्रीय नेत्यांच्या भेटीचे ‘फळ’ मिळणार ?

भाजपच्या एका गटाला शिल्पा नाईकांना उमेदवारी द्यायची होती. त्याच मुळे सुरुवातीला पाटणेकर रिंगणात उतरण्यास तयार नव्हते. पण शेवटी मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव त्यांना बोहल्यावर चढावे लागले. एकंदरीत डिचोलीत सध्या तरी पाटणेकर ‘डेंजर झोन’ मध्ये पोहचल्याचे दिसून येत आहे. आता भाजपचे बरेच नेते गोव्यात येणार असल्यामुळे त्यांच्या भेटीचे ‘फळ’ पाटणेकरांना मिळते का,हे बघावे लागेल. पाटणेकरांना सध्या उघड तसेच अंतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. आता त्यांची भिस्त आहे, ती गोव्यात येऊ घातलेल्या भाजप नेत्यांवरच. हे नेते वातावरण निर्मिती करू शकतात का,हे औत्सुक्याचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT