Politics in ponda constituency
Politics in ponda constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

फोंडा तालुक्यात राजकीय धुमशान

दैनिक गोमन्तक

फोंडा तालुका म्हणजे अंत्रुज महाल. हा गोव्यातील एक महत्त्वाचा तालुका. या तालुक्याने आजपर्यंत भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर, रवी नाईक, सुदिन ढवळीकर यासारखे दिग्गज नेते गोव्याला दिले आहेत. पूर्वी फोंडा तालुक्यातील तीनही मतदारसंघ (१९८४ पर्यंत फोंडा तालुक्यात तीनच मतदारसंघ होते) हे मगोपच्या अधिपत्याखाली होते. पण, १९९९ पासून समीकरणे बदलली, तेव्हाच्या चार मतदारसंघापैकी फोंडा हा काँग्रेसचा, मडकई हा ‘मगोप’चा, प्रियोळ कधी भाजप, तर कधी ‘मगोप’चा व शिरोडा हा कधी काँग्रेसचा, तर कधी भाजपचा असे चित्र दिसायला लागले. २०१७ साली फोंडा व शिरोडा हे दोन मतदारसंघ काँग्रेसने मडकई ‘मगोप’ने तर प्रियोळ भाजपचा पाठिंबा घेतलेल्या अपक्ष गोविंद गावडेंनी जिंकले होते. २०१९ साली काँग्रेसचे सुभाष शिरोडकर हे भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपच्या पदरी या तालुक्यातील एकमेव मतदारसंघ पडू शकला. पण, आता २०२२ साली समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फोंडा मतदारसंघ

फोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे करीत आहेत. पाचवेळा ते या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांचे पुत्र रितेश नाईक हे भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळते की काय, यावर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गेल्यावेळेला अपक्ष म्हणून रिंगणात उतरून साडेचार हजार मते प्राप्त केलेल्या राजेश वेरेकरांचा मोहरा काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पुढे केल्यामुळे रवी नाईक हे सध्या काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसत आहेत. ‘मगोप’तर्फे डॉ. केतन भाटीकर यांची उमदेवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. मात्र, भाजप - मगोपची युती झाल्यास हा मतदारसंघ मगोपकडे जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. भाजपतर्फे रितेश नाईक यांच्‍याबरोबर माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक व भाजप गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी यांचे नाव आघाडीवर आहे.

मडकई

मडकई मतदारसंघात १९९९ सालापासून पाचवेळा निवडून आलेले मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. मध्यंतरी तृणमूल काँग्रेसतर्फे फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार हे रिंगणात उतरणार असे सांगण्यात येत होते. तसे झाले तर ते सुदिनपुढे आव्हान उभे करू शकतात. मडकईत भंडारी समाजाची सर्वाधिक मते असल्यामुळे लवू मामलेदारांना त्यांचा फायदा मिळू शकतो. रवींनीही मध्यंतरी ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम मडकईत सुरू करून सुदिनांविरूद्ध एल्गार पुकारला होता.

शिरोडा

शिरोडा मतदारसंघ २००७ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता. पण, २००७, २०१२ साली भाजपचे महादेव नाईक यांनी सुभाष शिरोडकर यांचा पराभव केल्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या हातात गेला. २०१७ साली शिरोडकर यांनी महादेव नाईक यांचा पराभव केल्‍याने हा मतदारसंघ पुन्‍हा काँग्रेसच्या ताब्यात आला. पण, २०१९ साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे निवडणूक लढविलेल्या सुभाष शिरोडकर यांनी केवळ सत्तर मतांनी विजय प्राप्त करून हा मतदारसंघ भाजपच्या गोटात नेऊन ठेवला. आता शिरोडकर यांचे विरोधक म्हणून मगोपतर्फे संकेत मुळे तसेच आम आदमी पक्षातर्फे महादेव नाईक हे उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस गोटात बरीच सामसुम असून बोरीच्या सरपंच ज्योती नाईक यांचे पती मुकेश नाईक हे तेवढा थोडाफार प्रचार करताना दिसत आहेत.

प्रियोळ

कला सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे हे प्रियोळचे विद्यमान आमदार. गेल्यावेळेत ते मगोप पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यावर ४६८० मतांच्या आघाडी घेऊन विजयी झाले होते. आता पराभवाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नाला दीपक लागले असून त्यात ते किती यशस्वी होतात हे बघावे लागेल. त्यांच्याबरोबर फोंड्याचे एक उद्योजक संदीप निगळ्ये हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘आप’ व तृणमूल काँग्रेसही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘आप’तर्फे बेतकी खांडोळ्याचे माजी पंच नोनू नाईक, कलाकार राजदीप नाईक तसेच ॲड. सुषमा गावडे यांची नावे चर्चेत आहेत. तृणमूल काँग्रेसतर्फे लोककलाकार कांता गावडे वा स्वाती केरकर रिंगणात उतरू शकतात, असे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास प्रियोळात पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

गोविंद गावडेंचा ‘प्रोजेक्ट प्रियोळ’

प्रियोळमध्ये सध्या गोविंद गावडे यांनी केलेल्या विकासावर प्रोजेक्ट प्रियोळ ही लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. अशा प्रकारची अभिनव स्पर्धा प्रथमच गोव्यात आयोजित केली असून या लघुपटाद्वारे मंत्री गावडे हे प्रियोळातील मतदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्या प्राथमिक चाचपणी केल्यास प्रियोळात गोविंद ‘सेफ’ असल्याचे दिसून येत आहे.

फोंड्यात ‘पोस्टर्स युद्ध’

सध्या फोंडा शहरात इच्छुक उमेदवारांचे भव्य ‘कटआऊट’ असलेले दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक ठिकठिकाणी झळकताना दिसत आहेत. यामुळे फोंडा शहर पोस्टर्समय झाले आहे. मात्र या फलकांमुळे उमेदवारांची प्रसिद्धी होण्यापलीकडे दुसरे काही साध्य होईल की काय याबद्दल शंका व्यक्त होत आहेत. एकंदरीत फोंड्यातील राजकीय धुमशान तीव्र झाले असून यामुळे तालुक्याचे वातावरण रंगीबेरंगी होऊन गेले आहे, एवढे मात्र खरे.

सुभाष शिरोडकर ‘अनसेफ’ पण .....

शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर हे सध्या ‘अनसेफ’ असल्याचे संकेत मिळत असले तरी त्यांचा पर्याय कोण याचे उत्तर अजून सापडलेले नाही. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर मागील पोटनिवडणुकीसारखे रिंगणात उतरल्यास मात्र सुभाषभाऊंना निवडणूक जड जाऊ शकते असे राजकीय विश्लेषक सांगतात.

फोंड्यात सगळेच काही ‘अनिश्‍चित’

या चार मतदारसंघापैकी फोंड्यातील समीकरणे अजूनही ‘अनिश्चिती’च्या व्यासपीठावर उभी आहेत. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राजेश वेरेकर आपण कसे निवडून येणार हे आकडेवारीसह सांगताना दिसत आहेत. मगोपचे डॉ. केतन भाटीकरही आपल्या कामाचा हवाला देऊन आपणच फोंड्याचा भावी आमदार असल्याचे प्रतिपादन करत आहे. भाजपतर्फे विश्वनाथ दळवी प्रचाराला लागले असून भाजपची सध्या फोंड्यात ‘करो या मरो’ अशी स्थिती झाली आहे. या सगळ्या गदारोळात रवींची भूमिका काय ठरणार हा ही निवडणूकीबाबत महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

SCROLL FOR NEXT