Goa Assembly Election 2022
भाजपचे ग्रह, दिगंबरचे देव!
मडगाव मतदारसंघात भाजपामध्ये अत्यंत गंभीर पेचप्रसंग निर्माण झाल्याची चर्चा भाजपच्या ज्येष्ठांच्या ‘सुकाणू’ समितीत बुधवारी झाली. परंतु तेथे काही करण्याइतपत आता दिवस राहिले नाही, अशी हतबलताही या बैठकीत व्यक्त झाली. तेथे दिगंबर कामत यांना शह देऊ शकणारा नेता पक्षात राहिला नाही आणि बाहेरून आयात केल्या जाऊ शकणाऱ्या नेत्यांमध्येही तशी धमक पक्षाला दिसत नाही. आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे पर्रीकरांएवढा दिगंबर कामत यांच्याशी पंगा घेणारा कडवा नेताही पक्षात राहिलेला नाही. पर्रीकर असते तर त्यांनी मडगावच्या कार्यकर्त्यांचे कान पिळून त्यांना वटणीवर आणले असते. परंतु सध्या दिगंबर कामत यांचे ग्रह मात्र प्रचंड बलवान असावेत. कामत पुन्हा पुन्हा आपला देव आपल्याबरोबर असल्याची ग्वाही देतात. सध्या तर ते दिवसाला दोन तीन मंदिरांनाही भेट देणे चुकवत नाहीत. ∙∙∙
सारेच आयात उमेदवार!
भाजपने आपल्या रणनीतीमध्ये जे बदल केले त्यात बाहेरून उमेदवार आयात करण्याच्या निर्णयाचा प्रामुख्याने समावेश आहे. भाजपची उमेदवार यादी पुढच्या आठ दिवसांत प्रसिद्ध केली जाईल. त्यावेळी तर अनेकांना धक्का बसेल. 15 वर्षे पक्षात सातत्याने काम करणारे एक दोनच उमेदवार त्यात असतील. सत्तेचे राजकारण सुरू झाले आणि इतर पक्षांनी त्याच नीतीभ्रष्ट तत्त्वांची कास धरली म्हटल्यावर आम्हालाही तसे करणे भागच आहे, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली. 2012 मध्ये अनेक नवीन लोकांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे पक्ष सत्तेवर येऊ शकला, हे विसरू शकत नाही असे हा नेता म्हणाला. येत्या निवडणुकीत (Goa Assembly Election) जयेश साळगावकर व रोहन खंवटे हे बार्देशमध्ये तसेच ग्लेन टिकलो भाजपचे गड सर करू शकतील, अशी खात्रीही भाजपने बाळगली आहे. ∙∙∙
राजकारणात रिस्क असतेच
मायकल लोबो पुढच्या दोन तीन दिवसांत भाजपातून ‘नक्की’ फुटणार आहेत. त्यामुळे शेजारच्या शिवोली तसेच म्हापसा मतदारसंघात भाजपला धक्का बसणार आहे, याची आता तयारीच सत्ताधारी पक्षाने सुरू केली आहे. कळंगुट आणि शिवोली या मतदारसंघात निश्चितच लोबो यांचे वर्चस्व आहे हे पक्षाने जाणले आहे. सत्तेवर यायचे तर नव्या जिंकणाऱ्या चेहऱ्यांना स्थान द्यावे लागते, हे तत्त्व हेरून लोबो आदींना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. भाजपा जेव्हा आपल्या कॅडरमधूनच उमेदवार निवडत असे तेव्हा सत्तेवर येण्यासारखी शक्ती त्या पक्षाला लाभली नव्हती. परंतु उमेदवार आयात होतात तेव्हा ते फुटून जाण्याचाही धोका असतो. मगोप आणि कॉंग्रेसची वाताहत या अशाच फुटीरांमुळे झाली. परंतु भाजपाला वाटते, अशा जिंकून येणाऱ्या उमेदवारांमुळेच पक्ष सत्तेवरही येत असतो. ∙∙∙
साळगावमधील नाट्य
जयेश साळगावकर यांनी साळगावमध्ये बुधवारी पंचायत सभागृहात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत भाजपामध्ये (BJP) समाधान पसरले आहे. ही बैठक स्थानिक अध्यक्ष रमेश घाडी यांनी बोलवली आणि तिला भरघोस पाठिंबा लाभला. घाडी यांनी दिलीप परुळेकर यांची साथ सोडून साळगावकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे परुळेकर त्यांच्यावर रागावलेत. तरीही आजची सभा भाजप नेत्यांना खूश करून गेली. त्यांच्या मते रेईश-मागूश पंचायतीतील दोन सदस्य रुपेश नाईक व केदार नाईक यांनी जरी वेगळी चूल मांडली असली तरी हे साळगावच्या भाजपच्या भवितव्यावर परिणाम करू शकणार नाही, असे सत्ताधारी पक्षाचे मत बनले आहे. याचे कारण कॉंग्रेसमध्ये तरी आलबेल कुठे आहे? तेथे कॉंग्रेससाठी तुलियो डिसोझा यांनी आपले कार्यालय सुरू केले होते व भोलानाथ यांनीही काम चालवले होते. परंतु दोघांनीही सध्या आपली कार्यालये बंद केली आहेत. तुलियो तर गेली पाच वर्षे कामाला लागले होते. दुसरे, भाजपमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा घेण्यासारखी तेथे कॉंग्रेसची संघटनशक्तीही नाही. भाजप नेत्यांच्या मते, साळगावमधील 70 टक्के कार्यकर्ते सध्या जयेश साळगावकर यांच्या पाठिशी उभे ठाकले आहेत. खरे खोटे निवडणुकीच्या निकालातच दिसून येईल, खरे नाही का? ∙∙∙
सौ पक्ष बदलके..!
काही जणांचे बुड एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत असे म्हणतात. सांगेच्या राखी मॅडम या त्यापैकीच एक. कालच त्या तृणमूल पक्षात सामील झाल्या. वास्तविक त्या बऱ्याच आधी या बंगाली पक्षात सामील होणार होत्या. मडगावच्या नानुटेलमध्ये त्यांचे आयपॅकच्या माणसांशी बोलणीही झाली होती. पण, तोपर्यंत प्रसाद गावकर यांनी तिथे मांड ठोकायचे ठरविल्याने त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाकडे आपला मोर्चा वळविला. पण तिथेही प्रसाद पुन्हा आडवा आल्याने त्यांनी पटकन आपली गाडी रिव्हर्समध्ये घेताना तृणमूलचाच (TMC) झेंडा हाती घ्यायचा ठरविला. तसा या राखी मॅडमचा राजकीय प्रवास बराच मोठा (त्वरेने पक्ष बदलण्याचा) आहे. पूर्वी या राखीबाई काँग्रेसमध्ये होत्या. पण, तिथे युरी अवतरल्यावर त्या राष्ट्रवादी झाल्या. २०१७ च्या निवडणुकीत खुद्द शरद पवार यांनी सांगे येथे येऊन राखी यांना उमेदवारी जाहीर केली. दुसऱ्या दिवशीच राखी गोवा विकास पार्टीत सामील होऊन उमेदवारी भरली खरी. पण, शेवटच्या क्षणी त्यांनी भाजपचे सुभाष फळदेसाई यांना पाठिंबा देऊन राखी म्हणजे काय चीज ते दाखवून दिले. त्यानंतर त्या शिवसेनेत दाखल झाल्या. पण, शिवसेना गोव्याचे प्रश्न घेत नाही याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी काँग्रेस जवळ केली आणि आता व्हाया काँग्रेस त्या तृणमूलमध्ये येऊन स्थिरावल्या आहेत. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को’ अशी एक म्हण आहे. सांगेत ती बदलून ‘सौ पक्ष बदलके राखी चली टीएमसी मे’ असे म्हटले तर.∙∙∙
रणरागिणी आहेत कुठे?
सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविणे हा राजकीय डावपेचांचा भाग. सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच माळेचे मणी, असे उपहासाने म्हटले जाते. तरीही परिवर्तनाच्या नावाखाली मतदार आलटून पालटून संधी देतो. काम न केल्यास घरी बसविणे, हे मतदार राजाचे कार्य? अलीकडे राजकारणात महिला कार्यकर्त्यांची फौज सदैव दिमतीला असते. युवा कार्यकर्त्या पोटतिडकीने आवाज उठवून दखल घेण्यास भाग पाडतात. असाच करिश्मा भाजप महिला मंडळींचा होता. पण, राज्यात ‘कमळ’ फुलताच अलीकडे त्या गायब झाल्यागत झाल्या आहेत. गल्लीबोळात सध्या त्याचीच कुजबूज आहे. कांदे पन्नाशीत, बटाट्यांनीही भाव खाल्ला, टोमेटो पन्नास रुपयांच्या खाली उतरण्याचे नाव घेत नाही. कोबीही तसाच, अन्य पालेभाज्याही न परवडण्यापलीकडे. घरगुती गॅस सिलिंडर व इंधनाचेही दर खिशाला परवडतही नाहीत. तरीही गृहिणी गप्प कशा काय? त्यांना झळ पोहोचली कशी काय नाही. नाहीतर आंदोलने, निदर्शने करणाऱ्या रणरागिणी आता कुठे गायब झाल्या? महागाईचे काहीच पडलेले नाही का?, अशी महागाईची झळ पोहोचलेल्यांची त्यांना आर्त आर्जव. आता तरी आम्हाला न्याय द्या, आवाज उठवा, पक्ष नव्हे, कुटुंबाचे सर्वप्रथम बघा. महागाईच्या वणव्यात ‘बचेंगे तो और लढेंगे!’ असेच म्हणावे लागेल. ∙∙∙
फिरून सत्तरीत जन्म घ्या
सरकार कोणाचेही येवो सत्तरीवासीयांना सत्तेच्या पायघड्या सज्ज असतात. हा अनुभव आत्ताचा नाही तर गेल्या पन्नास वर्षांचा आहे. पिता-आता पुत्र अजून किती वर्षे हे परमेश्वराला ठाऊक. एका घरात किती नोकऱ्या याचा हिशोब नाही. सत्तरीतील युवक म्हणतात सत्ता अशीच हवी. सरकार कोणाचेही असो आम्हाला फरक नाही फक्त आमचे काम झाल्याशी मतलब. पण, राज्यातील युवक म्हणू लागलेत सरकारी नोकऱ्या हव्या असतील तर या जन्मी नसल्यास फिरून परत जन्म घेणार असल्यास सत्तरीतच घ्या. कारण सत्तेचा सुभा तिथे कोणालाच नाही मुभा. अगदी धोंडो पंतांना सुद्धा. ∙∙∙
भाजपच्या महिलांचा त्रागा
भाजप महिला मोर्चाच्या डॉ. शितल नाईक, सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन तृणमूलच्या गृहलक्ष्मी योजनेखाली दोन लाखांपेक्षा जास्त महिलांची नोंदणी केल्याने हल्लाबोल केला आहे. काय तर म्हणे या महिलांची खाजगी माहिती हा पक्ष गोळा करत आहे. यावर सध्या चर्चेला ऊत आला आहे तो असा, की भाजपाच्या या रणरागिणी यापूर्वी आमदार मोन्सेरातपासून बायकांना भीती, कसिनोमुळे वाईट प्रवृत्तीना थारा, गॅस सिलिंडर वाढीमुळे बायका हवालदिल असा कांगावा करायच्या मग ते सगळं यांना आता सहन व्हायला लागलंय. पण, तृणमूलची योजना का बरे खटकतेय. आता या रणरागिणी काय उत्तर देतात बघू? ∙∙∙
लोबोंची धास्ती
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचा सुगावा लागल्याने त्या पक्षाचे माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आग्नेल फर्नांडिस यांनी हल्ली त्यांची फारच धास्ती घेतलेली आहे. लोबो यांचे राजकीय सहकारी असलेले साळगावमधील भाजपचे नेते केदार नाईक यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने व त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने फर्नांडिस यांचा पक्षनेत्यांवर राग आहे. दुसरे म्हणजे, आपण पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष असतानाही आपल्याला केदार नाईक यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याने त्यांच्या जखमेवर नेत्यांकडून मीठ चोळले गेले आहे. म्हणूनच सध्या ते कळंगूटमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, अमलीपदार्थांचा व्यवहार इत्यादी प्रकरणी लोबो यांच्यावर पत्रकार परिषदांच्या माध्यमातून तोंडसुख घेत आहेत. लोबो यांच्या विरोधात फायल तयार ठेवली असल्यानेच निवडणुका जाहीर झाल्यानंतरच ते काँग्रेसप्रवेश करतील असा बोलबाला आहे. परंतु, काही का असेना, काँग्रेस श्रेष्ठींच्या मनात आले तर काहीही होणे शक्य आहे, याचीही पुरेपूर जाणीव फर्नांडिस यांना झालेली असेल बहुधा. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.