रोहन खंवटेना BJPमध्ये घेण्यासाठी मनोहर पर्रीकरही होते उत्सुक

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

रोहन खंवटेंना BJPमध्ये घेण्यासाठी मनोहर पर्रीकरही होते उत्सुक

भारतीय जनता पक्षाने आपल्या रेलगाडीला रोहन खंवटे नामक एक नवा डबा जोडण्याचे ठरवले आहे. काल परवापर्यंत भाजपाला लाखोली वाहाणारे खंवटे याना लोकसेवेची अचानक उबळ आली आणि त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापतींकडे सादर केला.

दैनिक गोमन्तक

अवघ्याच काही दिवसांआधी माजी मुख्यमंत्री आणि गोव्यातील बहुजन समाजाचे सांप्रतकालीन तारणहार रवी नाईक यानी लोकसेवेचा वसा घेताना आपल्या आमदारकीवर लाथ मारली होती. त्याही आधी निवडणूक (Goa Election) झाल्याझाल्या आमदारकीचा राजीनामा देत फेरनिवडणुकीला सामोरे गेलेले विश्वजीत राणे स्मरतात का? लोकसेवेची आत्यंतिक तळमळ असलेले लोकप्रतिनिधी असताना गोव्याच्या भविष्याबद्दल कुणी का म्हणून सचिंत व्हावे? केंद्रांत आणि राज्यांत सत्ता असेल तर डबल इंजिनचा जोर लागतो आणि सरकार धडाड धांवत सुटते अशी मखलाशी नेते आजवर करायचे. केंद्रातले मोदी नामक इंजिन तयारीचे नाही, असे म्हणण्याची आपली शामत नाही. स्थानिक इंजिनही तयारीचे असल्याची प्रशस्ती अमित शहांपासून देवेंद्र फडणविसांपर्यंत सगळेच न विसरता देत आले आहेत. तरी नवे जुने चित्रविचित्र डबे का जोडले जातायत? की स्थानिक इंजिन सक्षम असल्याची प्रशस्ती फक्त विश्वजीत राणेंचा स्वप्नभंग करण्यासाठी योजलेली होती?

बाकी भाजपाच्या सामाजिक अभियांत्रिकीला मानलेच पाहिजे. त्यानी गोव्यांतल्या दरेका समाजाला गोंजारायचा यत्न केलाय. आम आदमी पक्षाने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करायचे वचन देत तिढा टाकायचा अवकाश, रवी नाईकांना मागच्या बाकावरून पुढे आणले गेले. पर्रीकरांच्या पश्चात सारस्वतांना झाडलोट करून बाहेर फेकले जातेय अशी ओरड होत होती तर तिला रोहन खंवटेंच्या (Rohan Khaunte) रूपाने सुबक, देखणे उत्तर देण्यात आले आहे. तोंडी लावण्यास दाजी साळकरांची तजवीज केलीय. पणजीची प्रतिष्ठा बाबूश मॉन्सेरात यांच्याकडे सुपूर्द करून एकाच वेळी तिथला उच्चभ्रू किरिस्तांव आणि टेबलाखालाचें जाणणाऱ्या व्यवहारींना दिलासा दिलाय. गोविंद गावडेंना पावन करण्याचे बेत तडीस गेले आणि काणकोणांत इजिदोर याना भरीव निवृत्तीवेतन देत रमेश तवडकराना मुख्य प्रवाहात आणले की आद्य गोमंतकीय समाजही वश होईल. मुख्यमंत्र्यांमुळे मराठा समाज भरून पावल्याच्या भावनेत वावरतो आहेच, चवीपुरता थोडासा खारवी समाज सोबतीला आला की झाले सोशल इंजिनियरिंग सुफळ संपूर्ण! मग काय, मतेंच मतें!

रोहन खंवटेंच्या विधानसभेतल्या पोटतिडकीचे न-नाट्य पसंत केलेल्या गोमंतकियांची मात्र या नवप्रवेशाने गोची होणार आहे. सभागृहांतला त्यांचा राणा भीमदेवी थाट पाहून असे वाटायचे, मनोहर पर्रीकरांचा विरोधाचा वारसा चालवणारा नरपुंगव गोव्याला अवतरला असून आता गोव्याचे भविष्य सुरक्षित होईल. पर्यटन पट्ट्यातली हुन्हेगारी आटोक्यांत येईल गोमंतकीयांच्या जमिनी दिल्लीवाल्यांच्या घशांत जायची परंपरा खंडित होईल. त्यांच्या राजीनाम्याने असे काही होणार नाही, असे आडाखे बांधणेही योग्य नव्हे. अहो, ते तर गोव्याला वाचवण्यासाठीच भाजपात जायची तयारी करायला लागले आहेत. कल्पना करा, डॉ. प्रमोद सावंत, विश्वजीत राणे, मिलिंद नाईक, माविन गुदिन्हो, बाबूश मॉन्सेरात, रवी नाईक असे एकाहून एक अतिरथी व महारथी जेव्हा एकवटतात तेव्हा गोवा वाचलाच पाहिजे. रोहन खंवटेंची शक्ती या आद्य शक्तींपीठाना मिळाली तर मग गोव्याला काय कुणाची भीती? समयसुचकतेचा आदर्शपाठच रोहन खंवटे यानी आपल्या राजीनाम्याने घालून दिलेला आहे. शेवटी रोहन खंवटे वा अन्य कुणी राजकारणी राजकारण करतो तो गोवा संकटात आहे आणि आपल्या नेतृत्वकौशल्याची त्याला नितांत आवश्यकता आहे, याच प्रामाणिक वगैरे भावनेतून ना? खंवटेना आत घेण्यासाठी मनोहर पर्रीकरही उत्सुक होते. त्याना जे जमले नाही ते त्यांच्या वारसांनी लिलया करून दाखवलें, हेही लक्षांत घ्यायला हवे. पर्रीकरांची तुलना विद्यमान राजकारण्यांशी करत त्याना कमी लेखण्याची वाईट सवंय काही नतद्रष्ट लोकाना लागलीय. त्याना या खेळीने चपखल उत्तर मिळाले असेल. लोकसेवा करण्याच्या उच्च भावनेने झपाटलेला एखादा आमदार विधानसभेचा कालावधी संपलेला आहे आणि आपले निवृत्तीवेतन निश्चित झालेले आहे असे पाहून राजीनामा देतो, याचे विरळा उदाहरण गोव्याने महिन्याभरांतच दुसऱ्यांदा घालून दिलेले आहे. असंख्य राजकीय डावपेचांचे माहेरघर असलेल्या गोव्याच्या या नव्या योगदानाचा उचित गौरव पंतप्रधानानी त्यांच्या प्रस्तावित गोवा भेटींत आवर्जुन करायला हवा.

आम्हाला पर्वरी मतदारसंघाचा हेवा वाटतो आहे. खरा नेता तोच असतो जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. असाच नेता पर्वरी मतदारसंघ सातत्याने निवडून देत आला आहे. अनियंत्रीत शहरीकरणाच्या वेदना सोसणाऱ्या या मतदारसंघाने रोहन खंवटे यांच्यासारखा धडाडीचा आमदार निवडलाय. कॉंग्रेस त्यांच्या बंधूंना सांताक्रुझची तिकीट देत नाही म्हणून रागारागाने त्यानी भाजपाला जवळ केलंय, ह्या आरोपांत काही तथ्य असेल असे आम्हाला वाटत नाही. कॉंग्रेसला घराणेशाहीचे अजिबात वावडे नाही. पण तृणमूलने त्या पक्षाची गोची केलीय. अशा परिस्थितीत सांताक्रुझवर उमेदवार लादला तर पक्षाची उरलीसुरली लाजही उघड्यावर पडेल. खंवटे केवळ पर्वरीचा प्रस्ताव घेऊन आले असते तर एव्हाना कॉंग्रेसचे स्टार प्रचारक झाले असते. आता त्याना भाजपातल्या जुन्या खोडांकडून होणाऱ्या अंतर्गत विरोधांतून वाट काढावी लागेल, सांताक्रुझ दूरची गोष्ट झाली! पण हेही नसे थोडके. आतां खंवटे यांच्या लोकसेवेच्या उर्मिंना नवनवे परिमाण लाभतील. हमखास मंत्रीपद त्यांच्याकडे चालून येण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. मग विकासाला कोण रोखू शकेल?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT