‘तृणमूल’चे तांबडे गोव्यात फुटेल?  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

‘तृणमूल’चे तांबडे गोव्यात फुटेल?

गोव्यातील आजवरच्या सर्व संघर्षमय चळवळींमध्ये लुईझिन फालेरो यांचा मोलाचा सहभाग होता.

सुहासिनी प्रभुगावकर

लुईझिन फालेरो (luizinho faleiro) राज्यसभेवर पोहोचले, पश्चिम बंगाल राज्याचे नेतृत्व करणार असले तरी त्यांची मातृभूमी गोव्याशी, गोमंतकीय संस्कृतीशी असलेली नाळ तुटणार नाही. त्यांना गोव्यापासून नित्य नसले तरी संसदीय तसेच तृणमूल काँग्रेसचे (TMC) पक्ष पातळीवरील कामकाज सांभाळण्यासाठी जुंपून घ्यावे लागेल. ममताजींनी त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आपल्या वक्तृत्वाने ते ज्यावेळी राज्यसभा दणाणून सोडतील, त्यावेळी त्यांची प्रतिमा आणखी झळाळेल. त्यांना महत्त्वाचे पदही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. फालेरो हे अभ्यासू, उच्चशिक्षित असल्यामुळे राज्यसभेतून त्यांचे भविष्य आणखी उज्ज्वल होईल, यात शंका नाही. गेल्या पाच - सात वर्षांत त्यांचा आक्रमकपणा थोडा कमी झाला होता; परंतु राज्यसभेत अधिक आक्रमक होण्याचे आदेश त्यांना ज्यावेळी ममताजी देतील, त्यावेळी ते गप्प बसणारे नाहीत, मौनीबाबाही होणार नाहीत. पश्चिम बंगाल, गोव्याच्याच नव्हे तर देश - विदेश पातळीवरील महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत त्यांना सहभागी व्हावे लागेल, सत्ताधाऱ्यांशी संघर्षही करावा लागेल, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन, चळवळ उभारावी लागेल.

लुईझिनबाब तसे चळवळी परंपरेतलेच. गोव्यातील आजवरच्या सर्व संघर्षमय चळवळींमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. राजभाषा आंदोलन, कोकण रेल्वेमार्गविरोधी लढा, रापणकारांचे आंदोलन, सेव्ह गोवा आंदोलनच नव्हे, तर कामगार नेते म्हणून राज्यातील धरणे, संप, मोर्चातही ते दिसले. कधी कामगारांचा आवाज बनून राहिले. राज्य विधानसभेतही प्रखर विरोधकांच्या भूमिकेत ते कमी पडलेले नाहीत. मागील साडेचार वर्षांत कोठेतरी ते दुखावलेले दिसले. त्यांचे आकांडतांडवही दिसत नव्हते. परंतु राज्यसभेतून त्यांच्या कर्तृत्वाचे विविध पैलू देशालाच नव्हे, जगालाही दिसतील, अशी आशा आहे.

गोव्यातील चळवळींच्या मुशीतून घडलेले फालेरो राज्यसभेत फक्त पश्चिम बंगालच नव्हे, तर गोव्यातील समस्यांना वाचा फोडतील, त्यांच्या वक्तृत्वाला धार चढेल, त्यावेळी त्यांना सत्ताधाऱ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागेल. आक्रस्ताळेपणा न करता समन्वय, सामंजस्याने, पाठपुराव्यातून समस्यांचे निराकारण करून घेण्यात ते मागे पडणार नाहीत. फालेरो एक प्रगल्भ नेते आहेत. आपल्या अभ्यासू वृत्तीने ते राज्यसभेतही सगळ्यांची मने जिंकून घेतील, अशी अपेक्षा आहे.

राज्यातील खाणबंदी, आर्थिक चणचण, म्हादई नदीचा विषय त्यांना प्राधान्यक्रमाने मांडता येईल. अन्य दुर्लक्षित विषयांतही त्यांना लक्ष घालणे शक्य आहे. उद्योजकांच्या अडचणी त्यांना अभ्यासाव्या लागतील. बदलत्या कामगार कायद्यात त्यांना डोकावावे लागेल. मनन, चिंतन करतानाच सुसंवादही साधावा लागेल. तेथेच ते आणखी जबाबदार होतील. राज्यात तसेच राज्यसभेत विरोधकांनाच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा फायदा होऊ शकतो, यात दुमत नाही.

राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून शिक्षण क्षेत्रात त्यांनी बहुमूल्य कामगिरी केली आहे. शैक्षणिक कार्यातही त्यांचा वाटा आहे आणि त्याचा उपयोग त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील समस्या धसास लावण्यासाठी होईल. फालेरो यांचा लढाऊ बाणा कायम आहे. ममताजींनी तो ओळखला असावा. त्यामुळे त्यांच्याकडे राज्यसभा सदस्यत्व आले असावे. ममताजींनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांना सार्थ ठरवावा लागेल. ममताजींच्या भावी आकांक्षापूर्तीसाठी झटून कामकाज करावे लागेल. पुढील दोन वर्षांत त्यांची खरी कसोटी आहे, तेथेच त्यांचे भविष्यातील यशही सामावलेले आहे.

माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर राज्यसभेवर पोचणारे ते गोव्याचे दुसरे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत. कै. पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यानंतर ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले होते तर फालेरो यांची पश्चिम बंगालमधून बिनविरोध निवड झाली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फालेरो यांची राज्यसभेवर बिनविरोध झालेली निवड तृणमूल काँग्रेससाठी राज्यात सुखावणारी, प्रोत्साहन देणारी आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे चित्र त्यातून बदलणार नाही ना? संथपणे सुरू झालेले तृणमूल काँग्रेसचे कार्य गतिमान होत आहे, तीच तृणमूलच्या देशपातळीवरील राजकारणाची नवी पहाट असू शकते, तीच तर लुईझिनबाब यांचीही नवी पहाट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT