Independent MLA in Goa Assembly Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा विधानसभेतील ‘अपक्ष’ परंपरा

1963 ते 2017 पर्यंत 30 आमदार, फुग्रोंचा तीन वेळा अपक्ष आमदारकीचा विक्रम

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभेचे संख्याबळ आणि आमदार कोण असतील, याची निश्चिती पुढील महिन्यातील 10 मार्चला होईल. पक्षीय बलाबल महत्त्वाचे असेलच, त्याचवेळी अपक्ष आमदारही किंगमेकर बनू शकतात. 1963 पासून आतापर्यंतच्या प्रत्येक विधानसभेत अपक्ष आमदारांची परंपरा जपली गेली आहे. यावेळेस हा आकडा किती असेल याची उत्सुकता सध्या तरी कायम राहील. (Independent MLA in Goa Assembly News Updates)

मावळत्या विधानसभेत पर्वरीचे रोहन खंवटे, प्रियोळचे गोविंद गावडे आणि सांगेचे प्रसाद गावकर अपक्ष आमदार होते. मात्र नव्या विधानसभेत ते निवडून आल्यास भाजप (BJP) अथवा काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळेल. या निवडणुकीत खंवटे व गावडे भाजपचे, तर गावकर काँग्रेसचे उमेदवार आहेत. 1963 ते 2017 या कालावधीत झालेल्या निवडणुकीत तीस अपक्ष आमदार निवडून आले.

गोवा, दमण, दीव केंद्रशासित प्रदेश असताना 1963 च्या विधानसभेत दीव मतदार संघातून मामदाली जिवानी यांनी पहिले अपक्ष आमदार या नात्याने प्रवेश केला होता. 1984 पर्यंत दमण किंवा दीवमधून अपक्ष आमदारच विधानसभेत येत होता. 1987 साली गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला आणि नंतर 1989 पासून दमण-दीवचे विधानसभेतील अस्तित्व संपुष्टात आले.

नारायण फुग्रोचा विक्रम

दीवचे नारायण फुग्रो यांनी सलग तीन वेळा विधानसभेत अपक्ष आमदार बनण्याचा पराक्रम केला आहे. असा मान मिळविणारे ते एकमेव आहेत. फुग्रो यांनी दीव मतदारसंघाचे अनुक्रमे 1967, 1972 व 1977 मध्ये प्रतिनिधित्व केले. त्यांच्यानंतर रोहन खंवटे यांनी दोन वेळा अपक्ष आमदार या नात्याने काम केले. पर्वरी मतदारसंघाचे खंवटे अनुक्रमे 2012 व 2017 मधील निवडणुकीत अपक्ष निवडून आले. दुसऱ्या टर्ममध्ये ते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या मंत्रिमंडळात सदस्यही होते. दीव मतदार संघाचे चार वेळा (1963, 1967, 1972, 1977) अपक्ष आमदाराने प्रतिनिधित्व केले आहे.

सर्वाधिक पाच जण अपक्ष

2012 मधील राज्य विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक पाच जण अपक्ष आमदार या नात्याने निवडून आले. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. यामध्ये डिचोलीचे नरेश सावळ, पर्वरीचे रोहन खंवटे, फातोर्ड्याचे विजय सरदेसाई, नावेलीचे आवेर्तान फुर्तादो व वेळ्ळीचे बेंजामिन सिल्वा यांचा समावेश होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारात फुर्तादो मंत्री बनले. 1984 मधील निवडणुकीत विधानसभेत चौघे जण अपक्ष आमदार होते. यामध्ये फ्रान्सिस ब्रांको (सांताक्रूझ), लुईझिन फालेरो (नावेली) उदय भेंब्रे (मडगाव) व जीवनभाई प्रभाकर (दमण) यांचा समावेश होता. 2017 व्यतिरिक्त 1980 व 1994 मधील निवडणुकीत तिघे जण अपक्ष निवडून आले. 1980 मध्ये चंद्रकांत चोडणकर (शिवोली), विष्णू नाईक (पणजी), हरीश झांट्ये (डिचोली), तर 1994 मध्ये व्हिक्टोरिया फर्नांडिस (सांताक्रूझ), जॉन मान्युएल वाझ (मुरगाव), मानू फर्नांडिस (वेळ्ळी) हे अपक्ष आमदार होते.

फक्त एकच अपक्ष आमदार

1963 व 1972 मधील निवडणुकीव्यतिरिक्त 1999, 2002, 2007 च्या निवडणुकीनंतर विधानसभेत फक्त एकच अपक्ष आमदार होता. 1999 मध्ये इजिदोर फर्नांडिस पैंगीणचे, तर 2002 मध्ये फिलीप नेरी वेळ्ळीचे अपक्ष आमदार होते. 2007 मध्ये विश्वजित राणे (वाळपई) व अनिल साळगावकर (सावर्डे) यांनी अपक्ष या नात्याने निवडणूक जिंकली. नंतर विश्वजित यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व ते विधानसभेवर त्याच मतदारसंघातून काँग्रेस (Congress) पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले.

वेळ्ळीचे आगळे उदाहरण

वेळ्ळी मतदारसंघातून तीन वेळा अपक्ष आमदार निवडून आलेले आहेत. 1994 मध्ये मानू फर्नांडिस, 2002 मध्ये फिलीप नेरी रॉड्रिग्ज, तर 2012 मध्ये बेंजामिन सिल्वा वेळ्ळीतून अपक्ष आमदार होते. गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वाधिक वेळा अपक्ष उमेदवार निवडून येणारा वेळ्ळी एकमेव मतदारसंघ आहे. 1977 मध्ये दमण (मोराजी भाताला) व दीवचे (नारायण फुग्रो) आमदार अपक्ष होते. 1989 मध्ये कार्मो पेगादो (सांत आंद्रे) व बाबू नायक (मडगाव) असे दोघे अपक्ष आमदार निवडून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT