सुशांत कुंकळ्येकर
मडगाव: काँग्रेसला सत्तेचे सोपान चढायचे असेल त्यांना सासष्टी सर करावीच लागेल हे जे आम्ही सतत सांगत आलो होतो, ती गोष्ट शेवटी खरी ठरली. या तालुक्यातील आठ मतदारसंघात काँग्रेसला फक्त तीन जागाच मिळू शकल्या आणि राज्यातील त्यांच्या आमदारांची संख्या 11 वर पोहोचली. विजय सरदेसाई यांची साथ मिळाल्यामुळे त्यांची संख्या 12 वर पोहोचू शकली.
या उलट आपने या तालुक्यात चमकदार कामगिरी करताना बाणावली व वेळ्ळी या दोन जागा जिंकल्या. मतविभागणीचा फायदा उठवत भाजपने पहिल्यांदाच नावेलीत आपला उमेदवार निवडून आणला तर तृणमूल काँग्रेस ज्या दोन उमेदवारांवर आपली मदार ठेवून होता ते चर्चिल आणि वालांका हे आलेमाव पिता आणि कन्या या दोघांनाही लोकांनी घरी पाठविले. कुडतरीत अपेक्षेप्रमाणे आलेक्स रेजिनाल्ड जिंकून आले. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातच शेवटी काँग्रेस ढेपाळली.
मडगावात दिगंबर कामत यांनी आपला गढ राखून ठेवताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तब्बल 7794 मतांनी विजय मिळविला. नुवे मतदारसंघात आलेक्स सिक्वेरा यांनी आरजीचे अरविंद डिकॉस्ता यांच्यावर 3881 तर कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांनी भाजपचे क्लाफास डायस यांच्यावर 2289 मतांच्या आघाडीने विजय मिळविला.
‘आप’ची बाणावलीत चमकदार कामगिरी
बाणावली मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे आपचे व्हेंझी व्हिएगस यांनी चर्चिल आलेमाव यांच्यावर 1315 मतांनी विजय मिळविला तर वेळ्ळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मते विभागणी झाली त्याचा फायदा उठवीत आपचे क्रूझ सिल्वा यांनी सावियो डिसिल्वा यांच्यावर 212 मतांनी विजय मिळवीत सर्वांना धक्का दिला. कुडतरी अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांनी काँग्रेसचे मोरेन रिबेलो यांच्यावर 4599 मतांची आघाडी घेत एकतर्फी विजय मिळविला.
आरजी बाणावली नुवेतही लक्षवेधी
निवडणुकीच्या मतदानापर्यंत ज्या आरजी पक्षाला कुणी खिजगणतीत न धरलेल्या आरजीने चमक दाखविताना नुवे मतदारसंघात 3358 मते घेत दुसरे स्थान मिळवीत बाबाशान डीसा आणि मिकी पाशेको यांनाही मागे टाकले. वेळ्ळी मतदारसंघात आरजीच्या डेगली फेर्नांडिस यांनी 3604 मते मिळविली तर फातोर्डा येथे वलेरी फर्नांडिस या नवख्या उमेदवाराने 1490 मते मिळवीत सर्वांना आपली दखल घ्यायला लावली. बाणावलीतही त्यांची कामगिरी लक्षवेधी होती.
फातोर्ड्यात ‘विजय’ची हॅटट्रिक
गोवा फॉरवर्डचे विजयची सरदेसाई यांनी सतत तिसऱ्यांदा भाजपचे दामू नाईक यांचा पराभव करताना विजयाची हॅट्ट्रिक साधली. सरदेसाई यांना 10581 तर दामू नाईक यांना 9231 मते मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.