पणजी : गोव्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला गोवा विधानसभेत 20 जागा मिळाल्या आहेत, तसंच अपक्ष आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप गोव्यात सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. मगोपनेही आपल्या पाठिंब्याचं पत्र भाजपला दिल्याचं गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलं आहे.
तब्बल 10 वर्षांनंतर गोव्यातील जनतेने भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत दिलं आहे. हे पंतप्रधान मोदींच्या डबल इंजिन सरकारचं यश आहे, असं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. गोव्यासह इतर राज्यातही भाजपचंच सरकार आल्याने हा जनतेचा आशीर्वाद असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. अपक्ष आणि मगोपच्या सहकार्याने आम्ही गोव्यात स्थिर सरकार देऊ, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
दरम्यान संपूर्ण देशात विश्वासार्हतेची मालिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केल्यामुळेच देशात पाचही राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाल्याचं वक्तव्य भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आमचे 21 आमदार निवडून आले तरी आम्ही अपक्षांना सोबत घेऊ असं आम्ही म्हटलं होतं. तसंच मगोपनेही (MGP) आम्हाला समर्थनपत्र दिलं आहे. त्यामुळे 25 आमदारांच्या संख्याबळाने आम्ही स्थीर आणि भक्कम सरकार बनवू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आम्हाला बहुमत मिळाल्यामुळे आम्हाला धावपळ करण्याची गरज नाही. काँग्रेसने कालच राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र काँग्रेसचं (Congress) कुणीही आज राज्यपालांच्या भेटीला जाऊ शकलं नाही, कारण लोकांनी काँग्रेसला नाकारलं आहे. हा गोव्याच्या टीमचा विजय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुढची पाच वर्ष गोव्याच्या समृद्धीची असतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आमच्या मनात पर्रीकरांच्या कुटुंबीयांबद्दल आदर आहे. आम्ही उत्पल पर्रीकरांना दुसऱ्या मतदारसंघात लढण्याची ऑफर दिली होती, मात्र ते पणजीतून लढण्यावरच अडून राहिले. त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा निर्णय भाजपच्या केंद्रीय समितीचा होता, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. तसंच लक्ष्मीकांत पार्सेकरांना पक्षाने सर्व पदं दिली तरीही त्यांनी बंड करणं दुख:दायक असल्याची टिप्पणीही फडणवीसांनी केली. बाबू आजगावकरांना चॅलेंजर म्हणून पक्षाने मडगावात पाठवलं होतं, त्यांनी चांगली फाईट दिली, असं वक्तव्यही देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.