Babu Kavalekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

बाबू कवळेकर: ‘मी भाजपशी प्रामाणिक’

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यावर सध्या जोरदार टीकास्त्र सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: आपल्या पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगेतून निवडणुकीत उभे केल्यावरून उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यावर सध्या जोरदार टीकास्त्र सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी आज ‘कोण काय बोलतात ते बोलू द्या, पण मी भाजपशी प्रामाणिक आहे.

माझ्या नशिबात काय आहे तेच मला मिळणार, त्यासाठी मी कधी लॉबिंग केलेले नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बाबू कवळेकर याना मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि त्या लालसेपोटीच त्यांनी आपली पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगेत अपक्ष म्हणून उभे केले असा आरोप भाजपचे सांगेचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांनी काल केला होता. सांगेतील भाजप उमेदवार सुभाष फळदेसाई यांना सध्या पराभव दिसू लागल्यानेच ते बाबू कवळेकर यांच्यावर टीका करून भाजप श्रेष्ठींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा मात्र सांगे भागात होऊ लागली आहे.

कुडचडेत नगराध्यक्ष बदलणार?

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नीलेश काब्राल यांची साथ सोडून गेलेले कुडचडे भाजप मंडळाचे माजी पदाधिकारी प्रदीप नाईक यांनी यावेळी शेवटच्या क्षणी काब्राल यांना आपला पाठिंबा जाहीर केला. याची अनेक अर्थपूर्ण कारणे असल्याचे कुडचडेत बोलले जाते.

त्यात खरे किती आणि खोटे किती हे फक्त काब्राल आणि प्रदीप यांनाच माहीत असेल. मात्र, आता निवडणुकीनंतर प्रदीप यांना निष्ठेचे फळ मिळणार असे सांगितले जाते. निवडणूक झाल्यानंतर सध्या नगराध्यक्षपदी असलेले विश्वास सावंत यांना बदलून त्याजागी प्रदीप नाईक यांची वर्णी लावली जाणार असे वृत्त कुडचडेत पसरले आहे. मात्र, त्यासाठी नीलेश काब्राल हे निवडून यायला हवेत, बरं का!

मिकी पुन्हा ‘कम बॅक’ करणार

2017 च्या निवडणुकीत बाबाशान यांच्याकडून नुवेत पराभव स्वीकारावा लागल्यावर मिकी पाशेको हे राजकीय वर्तुळातून जवळपास नाहीसे झाले होते. तसे आपण राजकीयदृष्ट्या जिवंत आहे हे दाखविण्यासाठी ते अधूनमधून पत्रकार परिषदा वगैरे घ्यायचे. मात्र, ते राजकीय विजनवासात गेल्याचे दिसत होते.

आता 2022 च्या निवडणुकीत मिकी पाशेको यांनी नुवेतून निवडणूक लढविली आहे. नुवेत एकाच ताकदीचे चार उमेदवार रिंगणात उभे असल्याने निकाल काहीही लागू शकतो असे सांगितले जाते. त्यामुळे मिकी गोव्याच्या राजकारणात पुन्हा कम बॅक करतात की ही निवडणूक त्यांचा राजकीय अवतार संपवेल ही चर्चा सध्या सासष्टीत चालू आहे. निकाल कळण्यासाठी आणखी 12 दिवस वाट पहावी लागणार आहे.

रमाकांतभाईंचा ‘कोकणी मोग’

मांद्रेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या रमाकांत खलप यांना त्यावेळी भाई म्हणून ओळखले जाई. मात्र, नंतरच्या कालखंडात भाई म्हणजे पर्रीकर असे समीकरण झाले व तेच कायम झाले, पण मुद्दा तो नाही, तर एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खलपांनी कोकणी संबंधाबाबत सांगितलेल्या आठवणींचा.

तसे पाहिले तर कोकणी राजभाषा विधेयकातही त्यांचे फार मोठे योगदान आहे असे जाणकार सांगतात. सदर विधेयकासाठीच्या विधानसभा अधिवेशनातून जरी खलप व अन्य म.गो. आमदारांनी सभात्याग केलेला असला तरी त्या विधेयकाचा मसुदा तयार करताना त्यांचीच मदत घेतली गेली होती असे म्हणतात. आहे की नाही खलपभाईंचा कोकणीशी पुरातन सबंध?

सुभाषबाबूंना राग का आला?

गोवा मनोरंजन सोसायटीवर काम केल्यानंतर सुभाष फळदेसाई यांचा स्वभाव बदलला असा काहींचा समज झाला होता, पण तो चुकीचा असल्याचे शुक्रवारचा त्यांचा आक्रस्ताळेपणा पाहून दिसून आले.

2017 तील निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांची अशीच चिडचिड झाली होती. काल परवापर्यंत सांगेत आपलाच विजय निश्चित असल्याचे छातीठोकपणे सांगणारे सुभाषबाबू आपल्याच उपमुख्यमंत्र्यांवर का बरे घसरले, त्यांना त्यांच्या विजयाबद्दल साशंकता वाटू लागली की काय असे प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनांत उभे ठाकले आहेत. मात्र, ते तरी काय करणार अनेक मतदारसंघांतील भाजप निष्ठावंतांची आज हीच अवस्था आहे. निष्ठावानापुढे हल्ली भाजपात उपऱ्यांनाच जास्त मान मिळू लागला आहे, हेच खरे. ∙∙∙

खोगीरभरती कुठे गेली?

पाण्याच्या उशिरा व एकदम दिल्या जाणाऱ्या तसेच प्रचंड रकमेच्या बिलांवरून संबंधित अभियंत्यांना नुकताच महिलावर्गाच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांनी जरी यावेळी सारवासारव करून वेळ मारून नेलेली असली, तरी सहा सहा महिन्यांची बिले एकदम कशी येतात तसेच ती भरमसाट कशी येतात त्याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते.

मागे 2007 च्या काळात या खात्यात इतक्या प्रचंड संख्येने मीटर रीडर घेतले गेले होते की त्यांना कामच नव्हते. इतके असूनही बिले नियमीत का दिली जात नाहीत याचे उत्तर मिळत नाही. हे खोगीरभरतीचे तट्टू एवढे बिनकामाचे का?

सिद्धेशबाब आपल्या सीमा ओळखा!

‘माणसाने अंथरुण पाहून पाय पसरावे’ अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. सिद्धेश भगत हे एक चुळबुळे व्यक्तिमत्व. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आके बायश पंचायतीचे सरपंच असताना ते सतत बातम्यांत असायचे. आता आपमध्ये गेल्यापासून सिद्धेशबाब स्थानिक नव्हेत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नावर भाष्य करतात.

रशिया व युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनात अडकून पडले आहेत त्यांना स्वदेशी आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपयश आले असून मोदी हे फक्त बोलतात करीत काही नाही अशी टीका त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. आता नेटिझनकडून सिद्धेश ट्रोल व्हायला लागले आहेत. ‘सिद्धेश... युद्धात फसलेल्यांना स्वदेशी आणणे म्हणजे लाडू खाण्याएवढे सोपे नाही,’ ‘सूर्यावर थुंकाल तर चेहऱ्यावरच पडणार’ असा उपदेश सिद्धेशला नेटीजन द्यायला लागले आहेत. सिद्धेशबाब दाढी वाढली म्हणून कोण शिवाजी होत नाही अशीही टिप्पणी काहीजण करत आहेत.

वीरप्पन आणि मोदी

वीरपन्नची मुलगी विद्याराणी हिने धाडसी विधान केले असून या विधानामुळे ती बरेच चर्चेत आली आहेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मला माझ्या पित्याची छबी दिसते, असे दोन वर्षांपूर्वी तिने भाजपमध्ये प्रवेश करताना सांगितले होते.

विशेष म्हणजे, आता पाच राज्यांतील निवडणुकांच्या काळात तोच व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वीरपन्न हा कुख्यात तस्कर होता, हे सर्वश्रुत आहे. नरेंद्र मोदी हे तर तस्कर नव्हते. मात्र वीरप्पनच्या मुलीने नरेंद्र मोदी यांच्यात मला वडिलांची छबी दिसते, असे उदगार काढण्याचे प्रयोजन काय? हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

फिलिप यांना लॉटरी फुटणार?

‘दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम’ असे म्हणतात ते खरे. काही लोक तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येतात. त्यातले एक म्हणजे माजी जलस्रोतमंत्री फिलिप नेरी रॉड्रीगीस. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी आमदार बनलेल्या फिलीप यांनी मौका पाहून भाजपाची साथ धरली व मंत्रिपद मिळविले. निवडणूक जवळ येताच त्यांनी भाजपाचा त्याग केला व राष्ट्रवादीचे घड्याळ स्वीकारले.

आता ते जर निवडणूक जिंकले, तर राष्ट्रवादीचा त्याग करून सत्तेवर येणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन मंत्रिपद मिळविण्यासही तयारच राहणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अपात्रता याचिकेवरही उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे ते खुशीत आहेत. यालाच म्हणतात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणे. ∙∙∙

तेव्हाही राजकारणी देवाचे आशीर्वाद घेत होते का?

जस जसे 10 मार्च जवळ पोहचत आहे, तस तसे सर्वच उमेदवार देव दर्शनासाठी जात आहेत. मडगावच्या बाबा नंतर साखळीचे डॉ. प्रमोद सावंतसुद्धा साई दर्शनाला गेलेत म्हणे. कॉंग्रेस पक्षाने तर आपल्या उमेदवारांना हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती देवांसमोर नेऊन निवडणुकीपूर्वीच शपथ घेतली आहे.

आता हे सर्व राजकारणी आपणच निवडून येवो हे गाऱ्हाणे घालण्यासाठी देवदर्शनाला जात आहेत हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही, पण प्रश्र्न पडतो तो हा की जेव्हा हे आमदार, मंत्री होते तेव्हा जो तथाकथित भ्रष्टाचार म्हणा किंवा नोकरी विकण्याचे काम म्हणा करीत, तेव्हा ते देवाचे आशीर्वाद घेत होते का? हा प्रश्र्न तमाम जनतेला पडला असला, तर त्यात नवल ते काय?

मुख्यमंत्रिपदासाठी वाट्टेल ते

सत्तेची हाव कुणाला नाही असा प्रश्न नेहमीच केला जातो आणि तेच वास्तव असल्याचा अनुभव गोमंतकीय गेले दोन महिने घेत आहेत. या काळात किती जणांनी किती कोलांट्या मारल्या त्याची मोजदादही करता येणार नाही. वास्तविक त्यामागे असतो व्यक्तिगत स्वार्थ, पण तोंडात जप असतो लोककल्याणाचा.

आता म.गो.चेच उदाहरण घ्या ना. त्यांनी तृणमूलशी युती केली. बंगाली पक्षाने मतदानानंतर आपले चंबूगबाळे गुंडाळल्यानंतर आता म.गो.वाले छोट्या खाशांबरोबर चुंबाचुंबी करत आहेत व त्याची कबुलीही देत आहेत याला काय म्हणावे? लवचिक राजकारण म्हणजे हेच का रे भाऊ?

बार्देशसम्राट कुठाय?

बार्देश तालुक्याच्या राजकारणासंदर्भात ‘टुगेदर फॉर बार्देश’ या मंचामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे भाजप सरकारातील माजी मंत्री तथा हल्लीच काँग्रेसमध्ये उडी मारलेले मायकल लोबो यांचा ‘बार्देशसम्राट’ असा उल्लेख या तालुक्यातील काँग्रेस समर्थकांकडून गेल्या महिनाभरापासून केला जातोय.

परंतु मतदानानंतरच्या काळात राज्यातील अन्य काही राजकारण्यांप्रमाणेच त्यांनीही राजकीय विषयावर फारशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीत. एरवी एक-दोन विषयांवरील त्यांची स्फोटक वक्तव्ये दररोज प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध व्हायची. ते नेमके काय बोलतात, याची उत्सुकता सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनाही लागून असायची. परंतु, मतदानानंतर ते अगदीच शांत शांत झाले आहेत. ∙∙∙

कुंकळ्ळीतील निवडणूक सर्व्हे

कुंकळ्ळीत कोण जिंकून येणार? यावर सध्या पैजा लावल्या जातात. कारण प्रत्येक उमेदवार हा आपणच जिंकून येणार, असे छातीठोकपणे सांगत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेला सर्व्हे. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप यांचा सर्व्हे सांगतो, की तिघाही उमेदवारांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे.

मात्र, लोक म्हणतात, या तिघांपैकी कोण तरी एकजण जिंकणार. मात्र, कुंकळ्ळीत अपक्ष उभे राहिलेले संतोष फळदेसाई हे म्हणतात, मी तब्बल ११ हजार मते घेऊन जिंकून येणार. कारण त्यांनी म्हणे मुंबईच्या एका एजन्सीकडून सर्व्हे करून घेतला आहे. त्यात म्हणे तेच जिंकणार, असे सांगितले आहे. हे गणित खरे होणार का? ∙∙∙

सर्वांचीच नजर मुख्यमंत्रिपदावर

एखादा माणुस जेव्हा लॉटरी विकत घेतो, तेव्हा त्याचा निकाल येईपर्यंत लॉटरी आपल्यालाच लागेल या तोऱ्यात वागतो. नंतर लॉटरीतून येणाऱ्या पैशांचा कसा विनियोग करेल याची आखणी करतो. तसेच अजून निवडणुकीचा निकाल लागायचाच आहे. तरीसुद्धा सर्व पक्षातील उमेदवारांना आमदार होण्याची सोडाच, त्यापलीकडे जाऊन मुख्यमंत्री होण्याची म्हणे स्वप्ने पडायला लागली आहेत.

ही स्वप्ने जास्त करून भाजप व कॉंग्रेस पक्षातील उमेदवारांना पडतात म्हणे. म्हणूनच ज्यांना ही स्वप्ने पडायला लागली आहेत ते म्हणे आपल्या पक्षाचे सोडाच विरोधी पक्षांतील उमेदवारांकडे संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असून त्यांना विविध प्रकारची आमिषे दाखविली जातात म्हणे. यातील 10 मार्च रोजी कोण जिंकतात व कोण घरी जातात ते पहावे लागेल. मात्र, हा ‘शितापुढे मीठ खाण्याचाच’ प्रकार दिसतो. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT