फुलांचे असंख्य सुगंध आम्ही अनुभवतो. म्हार्दोळ हा फुलांचाच गाव म्हणून प्रसिध्द आहे. इथल्या अनेक लोकांचा व्यवसाय फुलांचा व जायांचा. कृतज्ञता म्हणून गावातील श्री महालसा देवीच्या मंदिरात वार्षिक सुप्रसिध्द जायांची महापूजा होते . जायांचा सुगंध व दिव्यत्वाचा परिणाम म्हणजे देवीचा प्रसाद जणू. ही प्रसादरूपी कंपने, स्पंदने अऩुभवायच असेल तर म्हार्दोळला जायांच्या पुजेला अवश्य चला.
दरवर्षी विशिष्ट वाहनात देवीची पूजा होते. देवीसाठी मयुरासन, शेषासन वा जे इतर निवडलेलं वाहन असते ते पूर्णपणे जाईच्या फुलांनी सजवलेले असतं. मंडपाच्या सर्व बाजूंनी जाईच्या फुलांच्या वेण्या दिमाखात लोंबत असतात.
हा सुगंधाचा सोहळा अनुभवणे हा जीवनातील एक विशेष क्षण ठरावा. देवीचे दर्शन घ्यायला रांगेत उभे राहिल्यावर जाईंच्या घमघमाटात, उदबत्ती, धूप यांच्या सुवासात व चाललेल्या भक्तिगायनाच्या भावरसात इतका पवित्र, सात्विक, दिव्य, आल्हाददायक अनुभव येतो की हलूच नये असं वाटतं पण मागे भक्त-भाविकांची रांग ताटकळलेली असते.
म्हार्दोळला जाईंचे मळे आहेत. संध्याकाळी जाई फुलतात व तेव्हाच त्यांचा प्रताप दिसून येतो. निसर्गाच्या विलक्षण किमयेची चाहूल या फुलांच्या गंधकोषी अलवारपणे होते. इवलेसे फूल पण फुलले की संपूर्ण आसमंत आकर्षित करून घेते. चोहोबाजूंना सुगंध व आनंद- जीव सुखासीन होतो. गणेश चतुर्थी वा इतर सणावेळी वा देवपुजेत, जाईंच्या फुलांना पहिला मान.
सौभाग्यवती स्त्रिया तर म्हार्दोळला थांबून जाईंची वेणी घेऊन माळतात व नंतर निघतात. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज खुलून चमकते. मात्र या उत्सवासाठी फुलकार चार दिवस जाईची फुले बाजारात विकत नाहीत. ती सर्व एकत्र करून देवीला अर्पण करतात. लाखो जाई! या जाई सुगंध-सोहळ्याची कल्पना करवणार नाही
शेकडो वर्षें झाली ही जायांची पूजा आत्यंतिक भक्तिभावाने चालू आहे. दरवर्षी पुजेनिमित्त भक्तिसंगीत गायन असतं. इथं गायन सेवा अर्पण करायला मिळाली हा आपणासाठी देवीचा फार मोठा आशीर्वाद असे गायक- गायिका मानतात. आजदेखील तिथे गायकांचे गायन असेल. तिथल्या वातावरणात संचारणारे, नाचणारे, विहरणारे स्वर व त्यात मिश्रित जायांचा अलौकिक सुगंध हा डोळे बंद करून ‘फिल’ करण्याचा अनुभव असतो.
महालसा मंदिराचा परिसर फार सुंदर आहे. स्वच्छ व सात्विक आहे. सगळे धार्मिक विधी, पूजा, आरती, प्रसाद वेळेवर शिस्तबध्द पध्दतीने साकार होतात. गर्दी असते. मुली माहेरी येतात. सर्व पिढ्यांतील प्रतिनिधित्व इथं जाया और छाया या मंडपात नजरेस पडतं. एकत्र येणं, भक्तिभावरस कवटाळणं, भेटणं, भगवंताशी जोडलं जाणं हे सुगंधी जाया घडवून आणतात.
अरूण शेणवी प्रियोळकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.