
Nepal Political Crisis: नेपाळमधील राजकीय अस्थिरतेने आणि अभूतपूर्व हिंसाचाराने देशात अराजकाची स्थिती निर्माण झाली असताना काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह (Balendra Shah) हे आता नेपाळच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. दोन वर्षांपूर्वी 'बालेन इफेक्ट' (Balen Effect) मुळे समाजमाध्यमांवर प्रचंड प्रसिद्धी मिळालेले एक रॅपर, इंजिनिअर आणि राजकारणी असलेले बालेन्द्र शाह आता थेट देशाचे पंतप्रधानपद स्वीकारु शकतात, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून 'जनरेशन-झेड' (Gen-Z) तरुणाईने पुकारलेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला, तर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनीही पंतप्रधानपदाचा राजीनामा स्वीकारला. या हिंसाचारात आतापर्यंत 19 लोकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या सर्व गोंधळात बालेन्द्र शाह यांनी आंदोलकांना पाठिंबा देत नंतर शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेमुळे ते एक प्रभावी नेते म्हणून समोर आले आहेत.
बालेन्द्र शाह ज्यांना 'बालेन' नावानेही ओळखले जाते. त्यांची ओळख फक्त महापौर म्हणून नाही, तर एक भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी चेहरा म्हणून आहे. त्यांनी आपल्या रॅप गाण्यांमधून नेहमीच सामाजिक प्रश्न, तरुणाईची व्यथा आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. याच कारणामुळे त्यांनी 2022 च्या महापौर निवडणुकीत पारंपरिक राजकीय पक्षांना हरवून एक मोठी क्रांती घडवली. त्यांचे 'व्होकल फॉर लोकल' आणि 'झिरो टॉलरन्स ऑन करप्शन' हे धोरण तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
2023 मध्ये टाईम मासिकाने त्यांना 'टॉप 100 इमर्जिंग लीडर्स'च्या यादीत स्थान दिले होते. महापौर म्हणून त्यांनी काठमांडू शहरात अनेक सुधारणा घडवून आणल्या, ज्यामुळे ते तरुणाईचे 'हिरो' बनले. जुन्या आणि प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला कंटाळलेल्या नेपाळी जनतेला त्यांच्यात एक नवा आशावाद दिसतो.
पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर महापौर बालेन्द्र शाह यांनी तातडीने फेसबुकवर एक पोस्ट लिहून आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "प्रिय जेन-झेड तुमच्या मागणीनुसार सरकारने राजीनामा दिला आहे. आता संयम राखण्याची वेळ आली आहे."
त्यांनी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची तोडफोड आणि नुकसान न करण्याचे आवाहन केले. "देशाच्या संपत्तीचे नुकसान करणे, हे प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्याच मालमत्तेचे नुकसान आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी संयमाने वागणे आवश्यक आहे," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. त्यांनी तरुणांना भविष्यातील नेतृत्वासाठी विधायक मार्गाने काम करण्यास सांगितले आणि संसदेचे विसर्जन झाल्यावरच लष्करप्रमुखांसोबत चर्चा होऊ शकते, असे संकेत दिले. त्यांच्या या संयमित भूमिकेचे राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे.
पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील आंदोलक तरुणाईने आता थेट बालेन्द्र शाह यांनाच देशाचे पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालेन्द्र शाह नेपाळचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या 'क्लिन इमेज'मुळे ते एक योग्य पर्याय म्हणून पुढे येत आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसताना देशाचे नेतृत्व करणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान असेल.
बालेन्द्र शाह यांनी राजकारणात येण्याआधी एक प्रसिद्ध रॅपर आणि सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम केले आहे. त्यांच्या 'नेपाळीज गॉड्स' (Nepalese Gods) आणि 'भारत का दास' (India's Slave) यांसारख्या गाण्यांमुळे ते वादातही राहिले आहेत. त्यांनी भारतीय चित्रपट 'आदिपुरुष'ला विरोध करत तो नेपाळमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यामुळे पंतप्रधानपदी आल्यास भारतासोबतचे संबंध कसे असतील, याकडेही लक्ष लागून आहे.
बालेन्द्र शाह यांची भूमिका समोर येत असतानाही, देशातील हिंसाचार सुरुच आहे. आंदोलकांनी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बिष्णू पौडेल, संचार मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग आणि नेपाळ राष्ट्र बँकेचे गव्हर्नर बिस्व पौडेल यांच्या घरांवरही दगडफेक केली. तसेच, माजी गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. नेपाळी काँग्रेसच्या सनेपा येथील मध्यवर्ती कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याशिवाय, नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निवासस्थानावरही हल्ला करण्यात आला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (CPN-UML) च्या कार्यालयीन इमारतींचीही जाळपोळ झाली.
नेपाळ सध्या एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक संकटातून जात आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांनीही पद सोडल्यामुळे देशात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा वेळी रॅपर ते महापौर असा प्रवास केलेले बालेन्द्र शाह देशाला या संकटातून बाहेर काढू शकतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.