डिचोली: गणेशस्तवन, शारदा नृत्य, शंकासूर वध यासह शेकडो वर्षांची परंपरा असलेला डिचोलीतील ‘पारंपरिक काला’ रंगतदार झाला. आतीलपेठ येथील मठ मंदिरातील श्री शांतादुर्गा देवीच्या शुक्रवारी (ता.५) साजरा झालेल्या वार्षिक कालोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांनी लोककलेचा आविष्कार घडवितानाच, उत्कृष्ट सादरीकरण केले. पारंपरिक काला पाहण्यासाठी रसिकांनी यंदाही गर्दी केली होती.
या काल्यात विद्याधर शिरोडकर यांच्यासह नरेश कडकडे, प्रसाद नाटेकर, राजन कडकडे, प्रशांत कवळेकर, प्रशांत हिंदे, राजू आळवी, राहूल कवळेकर, प्रणय वालावलकर आदी कलाकारांनी भूमिका केल्या. त्यांना अजित वेळूस्कर आणि सुविशांत बोर्डेकर यांनी संगीतसाथ दिली. पारंपरिक काला हा एक लोककला प्रकार.
दशावतारी नाटकांमुळे म्हणा, किंवा बदलत्या काळानुसार म्हणा, काही गावातील पारंपरिक काल्याची प्रथा हळूहळू मागे पडली आहे. तरी डिचोली तालुक्यातील काही ठराविक गावांनी स्थानिक कलाकारांकडून पारंपरिक काला सादर करण्याची परंपरा अजूनही टिकून आहे. डिचोली शहरातील येथील पारंपरिक काल्याला तर मोठी परंपरा आहे.
बदलत्या काळानुसार डिचोली येथील काल्याच्या सादरीकरणात काहीसा बदल करण्यात आला असला, तरी परंपरा मात्र पूर्वीप्रमाणेच कायम आहे. या काल्याचे वैशिष्ट्य म्हणजे रिद्धी-सिद्धी ही स्त्री पात्रे पुरुष कलाकारांकडूनच सादर करण्यात येतात. मठ मंदिरात साजरा होणाऱ्या काल्याला दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
‘शंखासूर काला’ हा एक पारंपरिक लोककला प्रकार आहे. या लोककलेचे संवर्धन होण्याची गरज आहे. त्यासाठी आजच्या पिढीने ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. डिचोलीतील पारंपरिक काल्याला मिळणारा प्रतिसाद पाहता, ही परंपरा यापुढेही चालूच राहणार असल्याचा आशावाद आहे.
-विद्याधर शिरोडकर, ज्येष्ठ कलाकार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.