7 मार्च रोजी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (UP Assembly Election 2022) निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. मात्र याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले असून त्यात योगी आदित्यनाथ यांचा पक्ष भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीबाबत पाकिस्तानी (Pakistan) वृत्तपत्रांनीही इंट्रेस्ट दाखवला आहे. युपीच्या एक्झिट पोलच्या (Exit Poll) निकालांवर पाकिस्तानी मीडियाही नजर ठेवून आहे. पाकिस्तानातील अनेक वृत्तपत्रांनी एक्झिट पोलच्या निकालाबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.
पाकिस्तानचे आघाडीचे वृत्तपत्र 'डॉन'ने काय म्हटले?
'डॉन'ने 'मोदींचा पक्ष उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज' या शीर्षकासह एक्झिट पोलच्या निकालांच्या आधारे आपला अहवाल दिला आहे. वृत्तपत्राने लिहिले की, 'नरेंद्र मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी पक्षाला उत्तर प्रदेश निवडणुकीत जबरदस्त विजयाची अपेक्षा होती, परंतु एक्झिट पोलच्या निकालावरून असे दिसून आले आहे की त्यांना बहुमत मिळत आहे परंतु गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत.' असे असताना पाकिस्तानी वृत्तपत्राने एक्झिट पोलच्या निकालांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
'भारतातील एक्झिट पोल नेहमीच विश्वासार्ह नसतात, परंतु सरासरी चार एक्झिट पोल घेतल्यास योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशमध्ये 240 जागा जिंकेल असे सूचित करण्यात येत आहे." असे डॉन वृत्तात लिहिले आहे. 403 जागांच्या उत्तर प्रदेशात बहुमतासाठी या जागा पुरेशा आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. 'भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने निवडणुकीत रोजगार आणि वाढती महागाईचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला, पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अखिलेश यादव यांचा पक्ष केवळ 150 जागांवरच गारद होईल,' असे सांगण्यात वृत्तपत्रात आले आहे. पुढच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील की नाही, हे यूपी विधानसभा निवडणुकीचे निकाल ठरवतील, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे डॉन वृत्तपत्राने लिहिले आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यूनने एक्झिट पोलच्या निकालावर दिली प्रतिक्रिया
पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने लिहिले आहे की, 'उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या मोदींच्या आकांक्षेला मोठा पाठिंबा मिळेल. त्यामुळे देशातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून मोदींची प्रतिमा पुन्हा मजबूत होईल. नरेंद्र मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना 403 पैकी 211-277 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. आणि हे पूर्ण बहुमत आहे. कोविड-19 महामारी योग्य प्रकारे हाताळण्यात असमर्थता, बेरोजगारीचा उच्च दर आणि शेतकरी आंदोलनामुळे उत्तर प्रदेश सरकारला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. पण भाजपने याला सामोरे जाण्यासाठी आपली धोरणे वापरली आणि महामारीच्या काळात लोकांना मोफत रेशन दिले, गुन्हेगारी कमी केली आणि हिंदूंमध्ये असलेल्या मोदींच्या लोकप्रियतेचा वापर केला. उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयामुळे मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाणारे योगी आदित्यनाथ यांच्या प्रभावात भर पडेल,' असे एक्झिट पोलच्या अंदाजांवर एक्सप्रेस ट्रिब्यूनने लिहिले आहे.
डेली टाइम्सने काय लिहिले?
'2017 च्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या, परंतु यावेळी एक्झिट पोलच्या निकालावरून दिसून येत आहे की या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल पण गेल्या वेळेइतक्या जागा मिळणार नाहीत. या निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळण्याची शक्यता आहे,' असे पाकिस्तानी वृत्तपत्र डेली टाईम्सने लिहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.