Nirav Modi Luxury Flat: पीएनबी घोटाळ्याचा मास्टरमाईंड नीरव मोदीला लंडन उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नीरव मोदीचा लंडनमधील आलिशान बंगला विकण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. नीरव मोदीचा हा आलिशान बंगला सेंट्रल लंडनमधील मेरीलेबोन येथे आहे. या बंगल्यात नीरव मोदी आपल्या कुटुंबासह राहतो. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, हा बंगला 5.25 दशलक्ष ब्रिटिश पाउंड (सुमारे 55 कोटी रुपये) पेक्षा कमी किमतीत विकला जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती मास्टर जेम्स ब्राइटवेल यांनी हा निर्णय दिला. लंडन उच्च न्यायालयाने नीरव मोदीचा आलिशान बंगला 2017 मध्ये एका ट्रस्टला विकण्याचा आदेश दिला होता.
दरम्यान, नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या थेमसाइड तुरुंगात बंद असल्याने सुनावणीच्या वेळी तो ऑनलाइन उपस्थित होता, तर हरीश साळवे या प्रकरणात ईडीच्या वतीने हजर झाले होते. सिंगापूरची कंपनी ट्रायडंट ट्रस्टही या प्रकरणात दावेदार आहे. या कंपनीने 103 मॅरेथॉन हाऊस विकण्याची मागणीही केली होती. दुसरीकडे, ईडीचा युक्तिवाद आहे की हा बंगला विकल्यानंतर मिळालेली रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जावी, कारण ट्रस्टची मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याच्या पैशातून खरेदी करण्यात आली आहे.
नीरव मोदी हा PNB घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. ईडी आणि सीबीआयने त्याच्यावर अनेक खटले दाखल केले असून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 2018 मध्ये त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, बँकेला पैसे परत न करता तो ब्रिटनला पळून गेला. यानंतर पीएनबीने नीरव मोदीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी सातत्याने केली आहे. नीरव मोदीला 2019 मध्ये अटक करण्यात आली. त्याचवेळी, 2021 मध्ये ब्रिटनच्या तत्कालीन गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. 2022 मध्ये नीरव मोदी सर्वोच्च न्यायालयातही हरला. हे प्रकरण सध्या लंडन उच्च न्यायालयात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.