Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

ट्रम्प यांचा व्यापार-अण्वस्त्र हल्ला! जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार 'इम्पोर्ट ड्युटी'चे चटके - संपादकीय

Donald Trump: अनिश्चिततेच्या गर्तेत ट्रम्प जगाला लोटत आहेत. परंतु याचे तोटे केवळ उर्वरित जगाला बसतील आणि आपण सुरक्षित राहू, असा जर ट्रम्प यांचा समज झाला असेल तर ते भ्रमात वावरत आहेत.

Sameer Amunekar

बे लगाम वक्तव्ये, मनमानी धोरणे आणि निरंकुश कारभार ही अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षांची शैली एव्हाना सर्वांनाच माहीत झाली आहे आणि त्याचे कमी-जास्त फटकेही विविध देशांना बसत आहेत. ट्रम्पप्रणित व्यापारनीतीत जे अडथळे आणतील किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळण्यास नकार देतील, त्यांच्यावर बेछूट आरोप करण्यासही ट्रम्प मागेपुढे पाहात नाहीत.

भारताच्या बाबतीत त्यांची जी सातत्याने वटवट चालू आहे, ते याचेच ठळक उदाहरण. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारत आणि पाकिस्तान युद्धात मी हस्तक्षेप केला नसता, तर उभय देशांदरम्यान अणुयुद्धाचा भडका उडून साडेतीन कोटी लोक मृत्युमुखी पडले असते, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मला सांगितले’’, असा दावा त्यांनी केला आहे.

भारताला ३५० टक्के आयातशुल्क लावण्याची धमकी देऊन आपण हे युद्ध थांबवले, असे ट्रम्प म्हणतात. सर्वच प्रश्नांवर आयातशुल्क हा एकच उपाय असल्याचा ट्रम्प यांचा समज असावा. भारत-पाकिस्तानदरम्यान तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मान्य नसल्याची भूमिका अधोरेखित करीत भारताने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे यापूर्वीही फेटाळून लावले आहेत. पण ऐकून घेतील तर ते ट्रम्प कसले? सौरऊर्जा क्षेत्रात भारताने घेतलेल्या पुढाकारावर त्यांची वक्रदृष्टी गेलेली दिसते.

रशिया वगळता खनिज तेलसाठे असलेले अन्य देश अमेरिकेने आधीच अंकित करुन ठेवले आहेत. अमेरिकेची मालकी असलेल्या खनिज तेलाच्याच माध्यमातून जगभरातील ऊर्जेच्या गरजा भागवल्या जाव्यात आणि त्याचा छप्परफाड लाभ अमेरिकेच्या पदरात पडावा, हा त्यामागचा हेतू. अशा स्थितीत सौरऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जास्रोतांद्वारे १२० देशांच्या सहभागाची ‘सौर युती’ करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अकरा वर्षांपूर्वी भारताने घेतलेल्या पुढाकाराला त्यांनी जाणीवपूर्वक धक्का लावला आहे.

भारताला २०३०पर्यंत एक हजार अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह ऊर्जा गरजांच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने पंतप्रधान मोदी प्रयत्न करीत आहेत. परंतु भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या ‘सौर मॉड्युल’वर १२६ टक्क्यांचे शुल्क लावून अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा पर्याय खच्ची करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.

अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे भारताचे धोरण आहे. पण त्यावरच ट्रम्प प्रश्नचिन्ह लावू पाहात आहेत. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील पहिल्या दहा महिन्यांमध्ये भारत-पाकिस्तानसह इस्राईल-हमास, इस्राईल-इराण, इजिप्त-इथिओपिया, रवांडा-काँगो, आर्मेनिया-अझरबैजान, कंबोडिया आणि थायलंड, कोसोवो आणि सर्बिया या देशांदरम्यानची आठ युद्धे थांबवूनही शांततेच्या ‘नोबेल’पासून वंचित ठेवल्याची सल ट्रम्प यांना डाचते. या आठ युद्धांमध्ये भारत-पाक युद्धातील हस्तक्षेपाचा शिरपेच खोवला नाही तर जगात आपले महत्त्व वाढू शकत नाही, असे त्यांना वाटते.

पण ट्रम्प यांच्या युद्धे रोखल्याच्या विधानांचा अन्य राष्ट्रप्रमुखांवर प्रभाव पडलेला नाही. ट्रम्प यांनी ही युद्धे रोखली याला सबळ पुरावा नसला तरी ट्रम्प यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात जागतिक अर्थव्यवस्थेचा चालविलेला विद्ध्वंस सर्वांना दिसतो आहे. त्यांनी सरसकट सर्वच देशांवर उगारलेले आयातशुल्काचे अस्त्र म्हणजे एकप्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेवरील ‘अण्वस्त्रहल्ला’च ठरला आहे.

या विनाशकारी हल्ल्याच्या झळा १९५ देशांतील सव्वाआठ अब्ज लोकांना बसत आहेत. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची घोषणा देत अध्यक्षस्थानी पोचलेल्या ट्रम्प यांनी दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरलेले नाही. पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ट्रम्प यांनी जगभरातील अर्थव्यवस्थांवर चालविलेले हे बेकायदा ‘अण्वस्त्र’ निष्प्रभ ठरल्यामुळे ते अधिकच चवताळून उठले आहेत.

गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून आयातशुल्कापोटी १७५ ते २६४ अब्ज डॉलरची वसूल केलेली ‘खंडणी’ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे परत करण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. पण न्यायालयाच्या निकालाला न जुमानता आपल्या अधिकारात १० ते १५ टक्क्यांच्या अधिभारासह आयातशुल्क रेटण्याचा आणि त्यासाठी कलम २३२ आणि ३०१ चा वापर करुन दंडेली सुरूच ठेवण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला आहे.

ट्रम्प यांच्या या हिशेबात चीनला तूर्तास बाजूला ठेवले असून जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या भारताला लक्ष्य केले आहे. रशियाकडून तेलखरेदी केल्याबद्दल २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लावून त्यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लादले. अंतरिम व्यापार करारात ते १८ टक्क्यांवर आणले. पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी लावलेल्या १० ते १५ टक्क्यांच्या शुल्कामुळे भारताकडून अमेरिकेला केल्या जाणाऱ्या निर्यातीवर नेमके किती शुल्क लागेल, याविषयी संभ्रम आहे.

ट्रम्प यांनी जगातील खनिजतेलाच्या साठ्यांवर आधिपत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हेनेझुएलाचे तेलसाठे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मोर्चा इराणकडे वळविला आहे. अनिश्चिततेच्या गर्तेत ट्रम्प जगाला लोटत आहेत. परंतु याचे तोटे केवळ उर्वरित जगाला बसतील आणि आपण सुरक्षित राहू, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’च्या बाता मारू शकू, असा जर ट्रम्प यांचा समज झाला असेल तर ते भ्रमात वावरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT